लोकलनामा - भाग ३
एक अस्वस्थ वास्तव


धावत्या लोकल ट्रेन मधून पडून 13 जण पडले. 5 जण मृत्यूमुखी पडले. बातमी वाचली आणि मन विषण्ण झाले. 
कधी आपण दिवाळीत जे बॉम्ब फोडतो ते बारकाईने पाहिलेत. आपण प्रथम त्या बॉम्ब ची वात पेटवतो. ती वात हळूहळू पेटत पेटत जाते आणि बॉम्बच्या आत आग घेऊन जाते. बॉम्बच्या आत मध्ये फटाक्याची दारू ठासून भरलेली असते. वातीसोबत आगीची ठिणगी तिच्या पर्यंत पोहचते आणि तो बॉम्ब फुटतो. आतली दारू बाहेरच्या सुतळीने घट्ट आवळलेल्या आवरणाच्या चिंध्या करते. जेवढं जास्त आवळलं असेल तितका जास्त मोठा आवाज होतो. 

आपण सर्व चाकरमानी सुध्धा अश्याच एका प्रचंड बॉम्बच्या वर जगत आहोत. वात पेटवलेली आहे. एका निद्रिस्त ज्वालामुखीच्या तोंडावर आपण जगत आहोत. कोणत्याही क्षणी मोठा धमाका होईल. हो , आपण मुंबई नामक एका ज्वालामुखीच्या तोंडावर जगत आहोत. माहित नाही कधी तिच्या आत ठासून भरलेली दारू पेटत्या वातीने सुलगेल आणि स्फोट होईल. लोकसंख्येच्या दाट सुतळीने मुंबईला आवळून ठेवलं आहे. हा ताण जेवढा जास्त होईल तेवढा धमाका मोठा होईल. एखाद्या मर्यादित भूभागावर किती ताण टाकणार. रबर कितीही लवचिक असला तरी मर्यादेपेक्षा जास्त ताणला जातो तेव्हा तो तुटतोच. 

"मुंबई" म्हणजे आता फक्त कुलाबा , फोर्ट किंवा दादर पर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तिचा विस्तार आता MMRDA च्या स्वरूपात विस्तारला आहे. पश्चिम रेल्वेवर पालघर, डहाणू पासून, मध्य रेल्वे वर खोपोली, कसारा पासून, हार्बर रेल्वे वर पनवेल, खारकोपर पर्यंत विस्तारला आहे. एवढ्या मोठ्या प्रदेशाचे दळणवळणाचे मुख्य साधन म्हणजे मुंबई लोकल. दररोज च्या दररोज ह्या मुंबई वर लोंढेच्या लोंढे लादले जात आहेत. तिचा भार साहजिकच मुंबई लोकल वर येत आहे. पीक अवर मध्ये कधी कोणती लोकल खाली गेलेली पाहिली आहे का कोणी ? जीव मुठीत घेऊन दररोज चाकरमानी प्रवास करत असतो. पण हिथें कोणाला पडली आहे त्याची ?. 

बदलापूर, कर्जत, विरार, वसई, कसारा, टिटवाळा वाले चाकरमानी सकाळी ६-७ ला घर सोडतात. रात्री ९-१० ला घरी येतात. घरातल्यांसोबत जास्तीत जास्त २ तास. ज्या कुटुंबाचे पोट भरायला चाकरमानी मर मर मरतो त्या कुटुंबाला वेळ द्यायला वेळ नाही त्याच्याकडे. गाव सोडून आला की इकडचाच होऊन जातो. त्याची तरी काय चूक ? सुट्टी मिळत नाही तर जाणार तरी कसा गावाला. लांबून लोकल चा प्रवास करणाऱ्या लोकांची अर्धी जिंदगी ट्रेन मध्येच निघून जाते. दिवसाला कामावर जाताना २ तास येताना २ तास प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काही करावं असं कोणत्या तरी सरकारच्या मनात आलंय का ? 

भरमसाठ प्रमाणात वाढत निघालेल्या मुंबईच्या घराच्या किमतींमुळे ठाणे, बोरिवलीच्या पल्याड लोकांचा ओघ वाढू लागला. बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, वसई, नालासोपारा, विरार हिकडे नवीन घरांचे पीक आले. चाकरमान्यांच्या बजेट मधली घर मिळू लागली आणि बघता बघता ही शहरे माणसांनी भरून गेली. पावसाळ्यात मोकळ्या माळरानावर गवत झपाट्याने उगवाव तसे अल्पावधीत ठाणे , बोरिवली च्या पलीकडील शहरे झपाट्याने भरत गेली. लोकांचे जॉब मुंबई, दादर, चर्चगेट ला आणि लोक राहायला बदलापूर, विरार, वसई ला. साहजिकच लोकल वरचा ताण कित्येक पटीने वाढला. 

मुळात मुंबई चे Town planning म्हणजे शहर रचनाच चुकीची आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी यांनी मला सांगितले की युरोप, अमेरिकेला शहर रचनेला फार महत्त्व आहे. तिथे प्लानिंग करताना असे केले जाते की औद्योगिक क्षेत्र बहुतांश शहराच्या मध्यभागी केंद्रित असते. त्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार पद्धतीने कर्मचाऱ्याची वसाहत किंवा राहण्याची घरे ही विकसित केली जातात. यामुळे सामान्य कामगार, कर्मचारी हा फार प्रवास न करता कामाच्या ठिकाणी पोहचू शकतो. आपल्याकडे हीच मोठी बोंब आहे. सर्व शासकीय , व्यावसायिक कार्यालये दक्षिण दिशेला म्हणजे मुंबई , दादर परिसरात आणि कर्मचारी राहतात कल्याण च्या पलीकडे. त्यामुळे दिवसा मुंबई गजबजलेली आणि रात्री उपनगर गजबजलेली. "पीक अवर" म्हणजे सकाळी मुंबईला जाणाऱ्या ट्रेन गच्च आणि संध्याकाळी बदलापूर ला जाणाऱ्या ट्रेन ला मुंगीला शिरायला ही जागा नाही. एवढ्या धकाधकीतुन कामावर जाऊन कर्मचारी काय घंटा प्रॉडक्टीविटी देणार ! बदलापूर वरून कांदिवली बोरिवली ल कामाला जाणारे मित्र पाहिले की मला गलबलून येते , कसं काय लोक एवढी ताकत आणतात , अश्या लोकांना त्रिवार मुजरा ! 

सध्या तुम्ही ठाण्याला कामासाठी जात असाल तर मधला मोठा पुल आणि त्याच्या पुढचा सीएसटी दिशेचा पुल पाहा. एक गाडी आली तर पुलावर चढायला तोबा गर्दी होते. त्यात दोन गाड्या एका वेळी आल्या तर पुल चढणारे आणि उतरणारे ह्यांच्यात दररोजच शक्ती तुरा चा सामना असतो. स्त्रियांचे दररोज किंचाळण्याचे आवाज येत राहतात. चेंगराचेंगरी पाहून अंगावर काटा येतो. भीती वाटते की ठाण्यात कधी ना कधी परळ पुलाच्या चेंगराचेंगरी ची पुनरावृत्ती होईल. बरं गर्दी पाहून मागे थांबून ही फायदा नाही. कारण ट्रेन अव्याहत पणे चालूच असतात आणि माणसे मुंग्यांसारखी अखंड चढत उतरत असतात. ठाण्यासारख्या महत्त्वाच्या स्थानकात चाललेली ही चेंगराचेंगरी रेल्वे प्रशासनाच्या ध्यानात येऊ नये ही संतापजनक बाब आहे. का प्रशासन फक्त एखादी दुर्दैवी घटना घडायची वाट पाहत आहे ? त्याशिवाय काही उपाययोजना करू नये अशीच मानसिक तयारी करून बसलेत का सर्व अधिकारी ? ठाणे स्टेशन ला एक स्वयंचलित जिना पण आहे पण त्यावर एकसाथ गर्दी झाली की तो हमखास बंद होतो मग त्याचा फायदा तरी काय ?  



हा व्हिडिओ पाहा म्हणजे ठाणे स्थानकावरील परिस्थिती लक्षात येईल. 

मागे बऱ्याच वेळा विनोद वाचले की कल्याण च्या पलीकडे राहणाऱ्या लोकांचे संसार जास्त टिकतात. कारण एवढा चेमुन चिरडून आलेला माणूस घरात काय भांडणार कर्म ! त्यात उभयतांस कामावर जाणारे असतील तर बघायलाच नको. लोकसंख्या नियंत्रण ठेवायला पण हा घटक प्रामुख्याने कारणीभूत आहे.  असा सर्व बाजूने चेपलेला चाकरमानी जेव्हा लोकल मध्ये अजून चेपला जातो तेव्हा मग भांडणाचा ज्वालामुखी उसळतो. शुल्लक धक्क्यावरून ट्रेन च वातावरण तापत. संध्याकाळी परतत असताना दिवसभर कामावर बॉसची मंत्रपुष्पांजली ऐकून वैतागलेला चाकरमानी ट्रेन मध्ये मग बाकी लोकांचे हवनकुंड करून टाकतो. माझा एक भाईंदर ला राहणारा मित्र आहे. त्याचे घरातले त्याला म्हणायचे तू लॉजवर ( म्हणजे घरी) आहेस का राहायला , फक्त झोपायला रात्री येतोस. 

आम्ही घाटकोपर ला राहायला होतो तेव्हा नवरा बायको दर एक दोन हफ्त्यानी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी फिरायला जायचो. डोंबिवली ला राहायला गेल्यावर प्रमाण आटलं आणि एक दोन महिन्यांनी जायचो. बदलापूर ला मुक्काम हलवला आणि आता दादर म्हटलं तरी आमच्या उभयतांच्या पोटात गोळा येतो. मरीन ड्राईव्ह तर मग ध्रुवीय प्रदेश ! गेल्या एक दोन वर्षात गिरगाव चौपाटी वरची वाळू काळी का पांढरी ती पण पाहिली नाही. माझे काका कांदिवली ला राहतात त्यांना वाटत पुतण्या आता मोठा शहाणा झाला म्हणून येत नाही भेटायला. म्हणून पुतण्या ला माहितेय शहाणा म्हणा नाही तर हाणा दोन पण एक दिवस भेटतो घरात त्या दिवशी लोकल ने प्रवासाला लावू नका. 

मला माहितेय कितीही बोललो तरी उद्या सकाळी उठून मला त्याचं लोकल ने मसाज करून घेत , घामाचे वास घेत , त्याच ठाण्याच्या पुलावर चेंगराचेंगरी करत कामावर जायचंय.

शेवटी आपण ठरलो चाकरमानी ! " परिस्थिती वाईट पण आमची कॉलर टाईट "

अजून वाचा - माझी मराठी