श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवले "सुवर्ण" !
हंगझाऊ (चीन) येथे चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट च्या २० षटकांच्या क्रीडा प्रकारात आज भारतीय महिला संघाने श्रीलंकन महिला संघाचा १९ धावांनी धुव्वा उडवत "सुवर्ण" पदकाला गवसणी घातली आहे. काही दिवसापूर्वी भारतीय पुरुष संघाने "आशिया चषक" च्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला मानहानीकारक पद्धतीने धूळ चारत "आशिया चषक" आठव्यांदा भारताच्या खिशात टाकला होता. आता महिला संघाने सुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेत तसाच पराक्रम करत "गोल्ड मेडल" खिशात टाकले आहे. त्यामुळे भारताच्या पदतालिकेत आता एकूण ११ पदके झाली आहेत.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने २० षटकात सात बाद ११६ धावा केल्या. खरतर टी -ट्वेंटी सामन्यात ११६ धावा म्हणजे काहीच नाही. फक्त ५.८ च्या सरासरीने भारताने ११६ धावा केल्या. पण खेळपट्टी नक्कीच गोलंदाजीला साथ देणारी होती. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधाना ने ४५ चेंडूत ४६ धावा ठोकल्या त्यात चार चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोकला. भारताची लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी " शेफाली वर्मा" चौथ्याच षटकात अवघ्या ९ धावांवर तंबूत परतली. पण जेमिमा रॉड्रिग्ज ने स्मृती मंधना सोबत भारताचा डाव सावरला. जेमिमाने ४० चेंडूत ४२ धाव ठोकल्या त्यात तिने सुंदर असे ५ चौकार ठोकले. १५ व्या षटकापर्यंत ह्या दोघीनी ७३ धावांची भागीदारी करत धावफलक हलता ठेवला पण रणवीरा च्या एका चेंडूवर फटका मारायच्या नादात स्मृती बाद झाली. आणि भारताचा डाव गडगडला. पंधरा षटकात ८९/२ वरून भारताचा डाव वीस षटकात ११६/७ असा गडगडला. रिचा घोष , कर्णधार हरमनप्रीत , पूजा वस्त्रकार स्वस्तात बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभी करायचे भारताचे स्वप्न भंगले. श्रीलंकेकडून प्रबोधिनी , सुंगंधीका कुमारी आणि रणवीरा यांनी प्रत्येकी २ - २ बळी घेऊन भारताला थोडक्यात रोखायचे काम केले.
अवघ्या ११७ धावांचे लक्ष्य घेऊन उतरणाऱ्या श्रीलंका संघाने सावध सुरुवात केली. ११७ धावा करण्यासाठी त्यांना फक्त षटकमागे ६ धावाची धावगती राखत धावा करायच्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ खरतर दबावाखाली होता. लंकेने २ षटकात १३ धावा करत सुरुवात सुध्धा चांगली केली. पण भारताची जलदगती गोलंदाज "तितास साधू" ह्या फक्त १८ वर्षीय मुलीने भेदक गोलंदाजी करत लंकेच्या डावाला खिंडार पाडले. डावाच्या तिसऱ्या आणि स्वतःच्या दुसऱ्याच षटकात तिने अनुष्का संजीवनी ला हरमनप्रीत कडे झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर दोनच चेंडू नंतर तिने विष्मी गुनरत्ने चा दांडका उडवत लंकेला बॅकफुट वर ढकलले. पुढच्याच षटकात श्रीलंकन कर्णधार आणि सर्वात अनुभवी चमारी अटापटू ला दीप्ती शर्माकरवी झेलबाद करत लंकेच्या डावाला भगदाड पाडले. साधूने आपल्या पहिल्या ३ षटकात अवघ्या २ धावा देत ३ गडी बाद केले. त्यात एक निर्धाव षटक टाकले.
गडबडलेल्या लंकेचा डाव हसिनी परेरा आणि निलक्षी डिसिल्वा ने सावरला. चौथ्या विकेट साठी ३६ धावा जोडत त्यांनी धावसंख्या ५० वर पोहचवली. दहाव्या षटकात भारताची अनुभवी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड ने आपला अनुभव पणाला लावत हसिनीला बाद केले आणि पुन्हा श्रीलंका दबावात आली. हसिनिने २२ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकार ठोकत २५ धावा केल्या. त्यानंतर १६ व्या षटकात पूजा वस्त्रकार ने नीलक्षी चा मोठा अडसर दूर केला. नीलाक्षी चा त्रिफळा उडवत पुजाने भारताच्या विजयाची खात्री केली. निलाक्षी ने एक चौकार आणि एक षटकार यांच्या सोबत ३४ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतर मग उरलेले सोपस्कार दीप्ती शर्मा, देविका वैद्य यांनी पार पाडले. रणशिंघे ला १९ आणि दिल्हारी ला ५ धावांवर बाद केले. शेवटच्या ५ षटकात ४३ धावांचे लक्ष्य असताना तीतास साधू ने आपल्या शेवटच्या षटकात एवढ्या ४ धावा दिल्या. श्रीलंकेला शेवटच्या २ षटकात ३० धावा हव्या. पण देविका वैद्य ने १९ व्या षटकात ५ धावात एक गडी बाद केला तर राजेश्वरी ने अखेरच्या षटकात फक्त ५ धावा दिल्या आणि भारताच्या "सुवर्ण पदक" वर शिक्कमोर्तब केले. भारतातर्फे तितास साधूने ३, राजेश्वरी ने २ गडी टिपले. तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, देविका वैद्य ने एक - एक गडी तंबूत पाठवला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट मध्ये श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेश ला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताला सुवर्ण पदक देत असताना प्रेक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत भारतीय महिला संघाचे कौतुक केले. ह्या स्पर्धेत जेमिमा रॉड्रिग्ज ने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या तर पूजा वस्त्रकर ने सर्वाधिक विकेट घेतल्या.
आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे सामने ३ ऑक्टोबर ला सुरू होतील.
अजून वाचा : मुंबईचे गणपती
1 टिप्पण्या
महिला संघाने अप्रतिम कामगिरी केली.लयभारी सलाम त्या महिला क्रिकेट महिलांना जबरदस्त
उत्तर द्याहटवा