"माझी अभिजात मराठी"
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज दिनांक ०८/०१/२०२५ रोजी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. उदय सामंत हे अभिजात भाषेची अधिसूचना स्वीकारण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले होते.
गोष्ट
अगदी अलीकडची आहे. माझी कन्या
"जान्हवी" वय वर्षे सहा,
इयत्ता पहिली ला आहे. ती
जिथे शिकवणी ला जाते तिथल्या
शिकवणी घेणाऱ्या बाईंकडे माझ्या सौभाग्यवती ने जान्हवी च्या
अभ्यासाबद्दल चौकशी केली.
" जान्हवी
करते का नीट अभ्यास
?" इति. सौभाग्यवती
" हो
, तुमची जान्हवी हुशार आहे. तिची Grasping power छान आहे.
पण तुम्ही असे का केलेत
?" इति. बाई
" असे
म्हणजे कसे ?
" तिला
इंग्रजी मिडीयम ला नाहीतर CBSE बोर्डला
शाळेत प्रवेश घ्यायला हवा होता, मराठी
मिडीयम ला का घेतलात
?"
" आमचा
हट्ट होता, मुलीला मराठी माध्यमातच शिकवायचे"
"अच्छा.
नाही ती खूप हुशार
आहे म्हणून म्हटलं , तिला इंग्रजी मिडीयम
इझी गेलं असतं"
हा संवाद खरतर हिथे तात्पुरता
संपला. पण एक विषय
अधोरेखित झाला. तो म्हणजे "मराठी
माध्यमातून शिक्षण".
जेव्हा
आम्हाला मुलगी झाली तेव्हाच आम्ही
नवरा बायकोने ठरवलं होते मुलीला मराठी
माध्यमातून शिकवायचे. नाही म्हणायला बायकोने
थोडा विरोध केला पण मी
ठाम होतो. आमचे दोघांचे शिक्षण
मराठीतूनच झाले. जर आज मला
मराठीतून शिकण्याचा पश्चात्ताप होत नाही तर
मी मुलीला मराठीतून का शिकवू नये
?. घरात आम्ही मराठीच बोलतो. त्यामुळे तिला मराठीचा लळा
आहे.
मराठी
भाषेचा आपला वारसा पण
किती समृद्ध आहे. जवळपास २४००
वर्ष जुनी आपली मराठी
भाषा ! इ.स. १२७८
मध्ये म्हाइंभट यांनी “लिळाचरित्र” हा ग्रंथ मराठीत
लिहिलेला आहे. तर इ.
स. १२९० मध्ये संतश्रेष्ठ श्री
ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अवीट गोड मराठी
भाषेत "ज्ञानेश्वरी" लिहिली. एवढा जुना वारसा
असलेली आपली "माय मराठी".
कोकणी , खानदेशी,
अहिराणी, कोल्हापुरी , सातारी, वऱ्हाडी, आगरी हरतर्हेने बोलली जाणारी माझी मराठी .
विविधतेने नटलेली
, पण एका रंगात रंगलेली
माझी मराठी.
हिच्या
भजन , कीर्तनाला भक्तीचा निर्मल रंग आहे. जात्यावरच्या ओव्याना
मायेची ऊब आहे. सह्याद्रीच्या
कणाकणात घुमणाऱ्या पोवड्याना शौर्याचा दिमाख आहे. नखशिखांत देखण्या
लावणीला शृंगाराचा साज आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानाचे अमृत आहे. अशी
गौरवशाली आणि समृद्ध भाषा
जगात खचितच पाहायला , ऐकायला , बोलायला मिळेल. " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " हे सुरेश भटांनी
उगीच म्हटलेले नाही . माझ्या कन्येला लहानपणी "ट्वीनकल ट्वीनकल" ऐकायची पण "चांदोमामा चांदोमामा भागलास का " ह्यात ती जास्त रमायची.
इंग्रजीतून कितीहि अपशब्द वापरा मन शांत तेव्हाच
होईल जेव्हा एखादी अस्सल मराठी शिवी देता येईल.
कवी
कुसुमाग्रज , पु. ल. देशपांडे
, ग. दि. माडगूळकर , प्र.
के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर,
शांता शेळके
, इंदिरा संत अश्या कितीतरी
साहित्यिकांनी आपल्या अभिजात साहित्यातुंन मराठीला घरोघरी पोहचवले.
एवढ्या संपन्न भाषेचा वारसा आपल्याला लाभला असताना आपण केवळ जागतिकीकरणाच्या फसव्या बुडबुड्यासारखे असलेल्या केवळ इंगजी च्या मागे धावणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे नाही का ? उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची राजभाषा म्हणून त्यांनी "मराठी" ची निवड केली. फारसी भाषेचे अमराठी शब्द स्वराज्याच्या राज्यकारभारात नको म्हणून महाराजांनी १४०० मराठी शब्दांचा राजव्यवहारकोश तयार करून घेतला तो मराठी दिमाखात मिरवावी या साठीच. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली. त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले मग आपल्याला मराठीची लाज का वाटावी ?
मराठी
टिकावी म्हणून फक्त राज्य शासनाच्या
निर्णयावर अवलंबून राहावे कशासाठी ? महात्मा गांधी म्हणायचे " जगात जे बदल
तुम्हाला हवे आहेत त्याची
सुरुवात स्वतःपासून करा" मग मराठी साठी
आपण स्वतः का पावले उचलू
नयेत ? आपल्या
मुलांना मराठी माध्यमात शिकवणे हि काळाची गरज
आहे . ९० च्या दशकात
इंग्रजी टंकलेखनाला सरकारी नोकरीत खूप खूप भाव
होता. त्या नंतर मराठी
भाषा कार्यालयीन कामकाजासाठी अनिवार्य झाली आणि मराठी
टंकलेखन शिकण्याला सोन्याचे दिवस आले. जेव्हा
लाभ असेल फक्त तेव्हाच
मराठी अंगीकारावी का आपण मराठी
माणसांनी ?
खूप
सोप्या सोप्या मार्गानी आपण मराठी चा
मान वाढवू शकतो. मुलांना मराठी माध्यमात शिकवणे , दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करणे. संवादासाठी मराठी भाषा वापरणे , मराठी
चित्रपट , नाटक पाहणे , मराठी
साहित्य वाचणे व त्यांचा प्रचार
करणे. अश्या साध्या सध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप प्रभावी ठरू
शकतात. नवीन पिढी कडे
आपल्या अभिजात "माय मराठी"
चा वारसा पोहचवणे हे आपल्या सर्वांचे
कर्त्यव्य आहे.
हे सर्व घडेल तेव्हाच
अभिमानाने सांगू शकू "माझा मराठी चा
बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी
अक्षरे रसिके।मेळवीन"
अजून वाचा : रक्षाबंधन | Raksha Bandhan
0 टिप्पण्या