Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

इच्छापंख - गोष्ट एका भरारीची | Iccha Pankh | wings of will

इच्छापंख - गोष्ट एका भरारीची  | Iccha Pankh | wings of will 



ती घराच्या बाल्कनीत आली . चांगली हवेशीर होती जागा. बाकी रूम तिला आवडली होतीच पण ही हवेशीर बाल्कनी तिला फार आवडली. सौम्य शीतल हवेच्या झुळुकेने ती फ्रेश झाली . सकाळ पासूनचा  ताण थोडा कमी झाला . मनासारखी रूम भाड्याने मिळाली होती. इकडे तिकडे पाहता पाहता  तीच लक्ष समोरच्या झाडावर असलेल्या घरट्याकडे गेलं. एक चिमणीच बिऱ्हाड वस्तीला होत तिथे. चिमणा, चिमणी, आणि दोन इवली इवली पिल्लं.  छान चिव चिव चाललेली त्यांची .  ती निरीक्षण करत होती त्यात आईने आवाज दिला आणि ती आत गेली.

----

मागच्या काही दिवसापासून तिची आणि आईची खूप दमछाक झाली होती. मनासारखी रूम भाड्याने मिळत नव्हती. खूप पाठ पुरवठा केल्या नंतर तिला ही रूम मिळाली भाड्याने. घर मालक स्वभावाने चांगला म्हणून फार डिपॉजिट न घेता त्याने माय लेकिना रूम भाड्याने दिली. बाल्कनीत खुर्ची टाकून तिने खुर्चीवर पाठ टेकवली. डोळे मिटून मागच्या काही दिवसाचा विचार करू लागली. क्षणभरात तिच्या डोळ्यासमोर तो आठ दिवसापूर्वी चा प्रसंग उभा राहिला.

"तुला हे घर किंवा तुझं नाचकाम यातलं एक निवडावं लागेल" बाबांचा निर्वाणीचा स्वर लागला होता. तिला ते अनपेक्षित होत  असे नाही पण एवढ्या लगेच ऐकावं लागेल असे गृहीत नव्हतं धरलं तिने . तिला रडू कोसळलं ! नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण ! कलाकाराला त्याच्या कलेपासून तोडायच म्हणजे निष्प्राण देहाला व्हेंटिलेटरवर ठेवण्या सारखं ! तीची अगतीक तडफड पाहून आई पुढे आली.

"नाही सोडणार ती नृत्य ! काही झालं तरी माझ्या लेकीला तडजोड नाही करून देणार "

"मग तुमचा मार्ग मोकळा आहे ! माझ्या घरात तुमच्या थिल्लर नाचकामाला जागा नाही" बाबा नी निर्वाणीचा इशारा दिला.

"बाबा ! वाट्टेल ते बोललात तरी चालेल पण माझ्या कलेला थिल्लर पणा  बोलू नका." तिचा आवाज थरथरू लागला होता पाठी शोकेस मध्ये ठेवलेली नटराजाची मूर्ती हि थरथरत असल्याचं तिला जाणवलं ! कोणत्याही क्षणी नटराज आपल्या महादेव रुपात प्रकट होतील आणि आपले तिसरे नेत्र उघडतील एवढं तणाव त्या खोलीत निर्माण झाला.

बापा ने निर्दयी व्हायचं ठरवलं पण आई आई असते हो ; सगळ्या जगाच्या विरोधात उभी राहील पण माऊली आपल्या पोटच्या गोळ्याला साथ देईलच. 

" तुमचं घर तुम्हाला लखलाभ . उपाशी राहू पण तुमच्या या स्वार्थाच्या महालात एक क्षण नाही राहणार" आईने सुध्धा शड्डू  ठोकला.

पुन्हा आईच्या हाकेने तिची तंद्री तुटली. डोळे पुसत ती बाल्कनी तून आत आली.

जिद्दीने पेटलेल्या आईने दोन्ही मुलींना घेऊन घर सोडले आणि  आठच दिवसांनी नव्या भाड्याच्या घरात शिफ्ट झाली . त्याच घराच्या बाल्कनीत ती त्या चिमण्यांचा संसार न्याहळत होती. 

- - - -

लहान पणा पासून ती नाचण्यात तरबेज. बापाला लहानपणी कौतुक वाटायचं. पण जशी जशी ती मोठी होऊ लागली बापाच्या संकुचित मनाला तिचं नृत्य पचेना. ती लावणी स्पेशालिस्ट झाली म्हणून तिच्या बाबाना तीची कला खटकू लागली होती आणि वयात येत असलेल्या मुलीच नृत्य त्यांना "थिल्लर पणा " वाटू लागला .

मुळात थिल्लर पण हा वागणार्याच्या नव्हे तर पाहणाऱ्याच्या नजरेत असतो हे सत्य सामान्य विचाराच्या लोकांना कळणं अशक्य असत. त्यात घरातल्या मुलीने लावणी करावी म्हणजे त्यांना नसलेल्या इज्जतीची पर्वा वाटायला लागते.  

दुखावलेल्या मनाला सावरत तिने पुन्हा नृत्याकडे  लक्ष केंद्रित केले. बापाने हाथ वर केले ते सर्व बाबतीत. दोन मुली आणि स्वतः असा संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी तिच्या आईने पदर खोचला. आईने आपल्या पाक कौशल्याच्या जोरावर घरगुती खानावळ चालू केली आणि संसाराचा गाडा हाकू लागले. 


हळू हळू दिवस जात होते. तिने तालुका स्तरावर , जिल्हा स्तरावर नृत्यस्पर्धा गाजवायला सुरुवात केली. तिच्या अदा आणि लावणीतला ठेहराव पंचक्रोशीत नावारूपाला आला . लावणी म्हणजे जितके सहज वाटत तेवढं सहज नृत्य नाही. 

नृत्य आणि बिभात्सता यात एक अतिशय बारीक सीमारेषा असते. लावणी करताना ती सीमा ओलांडली तर लावणी अश्लीलतेकडे झुकू शकते. आजकाल काही नर्तकी चे असेच गाजलेले नृत्य तुम्हाला माहिती असेलच. पण तिने ती सीमारेषा ओलांडली नाही. त्यामुळेच ती बाकीच्यांपेक्षा उठून दिसू लागली. 


त्या घरट्यातली पिल्ले पण हळू हळू मोठी होत होती. फावल्या वेळेत बाल्कनीत येऊन त्या चिमण्यांचा संसार पाहण्यात तिला फार इंटरेस्ट वाटू लागला  ती स्वतःला त्या पिल्लांशी रिलेट करू लागली कारण आताशा चिमणा त्या घरट्यात दिसत नव्हता फक्त चिमणी त्या पिल्लांना भरवत असायची.  

- - - -

"अग तुझा फोन वाजतोय; उचल तरी" आईने तक्रारीच्या सुरात म्हटले.

" हॅलो , हो बोलतेय , हो नक्की आवडेल, थॅंक्यु सो मच " 

फोन ठेवतांना तिचे हरणा सारखे डोळे निखळ तेजाने चमकत होते.

"आई आई आई ," तिने किंचाळतच  आईला मिठी मारली . चक्क एक नावाजलेल्या टीव्ही वाहिनीच्या लावणी स्पर्धेत तिला प्रवेश भेटला होता ! तीच स्वप्न होत ते ! आईने देवा समोर साखर ठेवली. पोरीसाठी तिने केलेल्या त्यागाचे चीज व्हायची वेळ आली होती.


आज पहिले पाऊल टाकले तिने ! समोर खुल्या क्षितिजाची चाहूल तिला लागली ! 


पहिल्या दिवशी सेट वर गेल्यावर ती हरखून गेली. तिथला सेट चा झगमगाट, भव्यता पाहून तिच्या डोळ्याचे पारणे फिटले. परीक्षक म्हणून प्रसिद्ध लावणी विशारद मोहिनीताई आणि प्रसिद्ध लोक कलाकार झुंजार पाटील. त्यांची दाद मिळवणे म्हणजे येरा गबळ्याचे काम नोहे. पण तिने पण ठरवलं होत. ह्या संधीचे सोने करायचे.

सर्वस्व झोकून तिने स्पर्धा गाजवली प्रत्येक समीक्षक, परिक्षकांची वाहवा घेत होती. सोशल मीडिया वर तिच्या चाहत्यांनी धुमाकूळ घातला होता. बघता बघता तिने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला . ज्या बाबाना थिल्लर वाटत होतं त्याच लावणीच्या मुळे लोक बाबाना फोन करून मुलीचं कौतुक करत होते. पण बाबा वर ढिम्म परिणाम !


जेव्हा जेव्हा ती घरी असायची तेव्हा तेव्हा ती त्या चिमणी कडे आणि तिच्या पिल्ला कडे पाहत राही. मनातल्या मनात त्यांना आपले हित्तगुज सांगे. ती पिल्ल सुध्धा आपल्या इवल्याश्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत. आपल्या चोचीने चिवचिव करत जणु काही तिच्याशी बोलत आहेत.  


बघता बघता दोन दिवसावर अंतिम फेरी आली होती . डोक्यात गाण्याचा विचार करत ती बाल्कनीत चिमण्यांचा संसार बघत होती. ती पिल्लं आता मोठी झाली होती आणि पंख फडफडवत होतीत पण एक पिल्लू खूप आकांताने फडफड करत होत त्याचा एक पंख थोडा छोटा वाटत होता. तिच्या काळजात चर्रर्र झालं म्हणजे ही कधी उडू शकणार नाही का ? ती बावरली त्या पिल्लाच्या फडफडीने तिला अस्वस्थ केलं विचाराच्या तंद्रीत रिहर्सल ला निघाली आजचा दिवस खराबच होता पण समोरून येणाऱ्या बाईक चा तोल गेला आणि तिच्या पायावर आदळली ! 

फार मोठं एक्सीडन्ट नाही पण तिचा पाय मुरगळला पायाला सूज आली, त्यापेक्षा जास्त तिच्या हृदयाला धडधड वाढली. 2 दिवसावर अंतिम फेरी आणि आज पाय दुखावून बसलोय. डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली. रिहर्सल बोंबलली. 

"तुला जमणार नसेल तर उगाच रिस्क नको , तू नंतर ट्राय कर " टीव्ही वाहिनी च्या लोकांनी तिला समजायचं प्रयत्न केला . "अग वेळ गेलेली नाही पुढच्या पर्वात सहभागी हो !" 

"नाही . हीच वेळ आहे, ही वेळ गेली तर परत वर्ष भर थांबावं लागेल , माझ्या दैवाने मला ही संधी दिली आहे. मला बऱ्याच जणांना बरच काही सिद्ध करून दाखवायचय ! मी करेन , मी करेनच परफॉर्मन्स मला अडवू नका. हि संधी माझ्या पासून लांब नेऊ नका प्लिज  " तिने हट्टाने सांगितलं. तिच्या डोळ्यात अगतिकता आणि आत्मविश्वास दोन्ही एकाच वेळी दिसत होते.    


दिग्दर्शकाचा नाईलाज झाला पण त्याला तिची इच्छाशक्ती आवडली. आयोजकांनी परवानगी दिली. आईने रात्र भर जागून तिच्या पायाला मालिश केली. तरीही वेदना कमी होत नव्हत्या.पण जिद्दीने पेटलेल्या तिने दुखऱ्या पायाने स्टेज वर असा बहारदार परफॉर्मन्स दिला की सगळ्यांना स्टँडिंग ओवेशन द्यावच लागलं. दुखऱ्या पायाने तिने स्टेजवर अश्या गिरक्या घेतल्या की परीक्षकांचा काळजाचा ठोका चुकला. 


आणि  या पर्वाची विजेती आहे ........

सर्व प्रेक्षकांतून तिच्या नावाचा घोष झाला. आणि निवेदकाने ही तिचे नाव जाहीर केले. ती मटकन खाली बसली. तीने रंगमंचाला वाकून नमस्कार केला.  विजेती ट्रॉफी घेताना पायच्या वेदना कुठल्याकुठे पळल्या. आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या थेंबांची किंमत मात्र त्या ट्रॉफी हुन खूप जास्त होती ! टाळ्या , कौतुक आणि कॅमेऱ्याचा  लखलखाट तिच्या उज्ज्वल भवितव्याची जाणीव देत होता. 


दुसऱ्या दिवशी सकाळीच ती बाल्कनीत त्या पिल्लाला पाहायला गेली. त्या पिल्लाच्या पंखांची तिला काळजी वाटत होती. तिला राहवत नव्हतं. आपली ट्रॉफी त्या पिल्लाला दाखवावी असे तिला वाटत होत. ती बाल्कनीत आली. ते पिल्लू ही जणू तिचीच वाट बघत असल्या सारख पंख फडफडवू लागलं. 

दोघांची नजरानजर झाली  एक क्षण गेला आणि बघता बघता ते पिल्लू हवेत झेपावले सुरकन गिरकी मारून परत घरट्यात आलं आणि चिमणी आई कौतुकाने पिल्लाला पाहत होती. 

इच्छापंखांनी आज अजून एक आकाश काबीज केले होते. आता येणारी प्रत्येक भरारी अजून उंच आकाशात जाणारी असेल । इच्छा पंखांना अजून बळकटी येणार यात काहीच शंका नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या