Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

गदर - एक प्रेम कथा | Gadar - Ek Prem Katha | Marathi Review

गदर - एक प्रेम कथा

जस्ट इमॅजिन, पाकिस्तानातील लाहोर शहर ! एका भल्या मोठ्या मशिदी समोरच भले मोठे पटांगण, आजूबाजूला शेकडो पाकिस्तानी आणि मधोमध तुम्ही तुमच्या बायको मुलासोबत उभे आहात. तुमच्या समोर तुमच्या देशाचा अपमान होतोय... काय परिस्थिती असेल... किती तणाव असेल... असल्या कठीण परिस्थितीत एकच माणूस अढळ , निश्चल राहू शकतो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका "तारा सिंह" उर्फ "सनी देओल". 


नुकताच प्रदर्शित झालेल्या गदर 2 ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर गदर माजवली आहे. आतापर्यंत तब्बल ३८८ करोड चा आकडा पार केला आहे. मला पण गदर २ पाहायचा आहे. तत्पूर्वी पुन्हा उजळणी म्हणून परवा गदर १ म्हणजेच गदर - एक प्रेम कथा पाहिला. खर तर मी हा सिनेमा बऱ्याच वेळा पाहिलाय. माझ्या आवडीच्या काही चित्रपटांमधला हा एक चित्रपट. कथा, संवाद, गाणी, अभिनय, ॲक्शन सर्वच बाबतीत ठासून भरलेला एक मसाला एंटरटेनर. म्हणून मला या चित्रपटाबद्दल लिहायला हाथ शिवशिवू लागले.

गदर - एक प्रेम कथा हा चित्रपट आलेला २००१ साली. तब्बल २२ वर्षांपूर्वी . चित्रपटाच्या सुरुवातीलाच भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्यातील एक काळं पान समोर आणलं जातं. ते म्हणजे फाळणी. इंग्रजांनी जाता जाता अखंड हिंदुस्तानचे दोन तुकडे केले. आणि मग जाती द्वेषाने भारलेल्या माथेफिरू पाकिस्तानी लोकांनी हिंदुस्तान ला "आझादी चे तोहफे" पाठवायला सुरू केले.   भयानक कत्तल , कित्येक आयाबहिनी वर अत्याचार केले गेले. चित्रपटाचा नायक "तारा सिंग" याचं कुटुंब त्यात अडकत. 

पाकिस्तान सोडण्यापूर्वी तारा चे बाबा स्वतःच्या मुलींना विष देतात आणि सांगतात कोणाच्या हातात सापडलात तर आधी हे विष खा. एक बाप आपल्या मुलींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद न देता विष खायला सांगतो यावरून त्यावेळेची भीषण परिस्तिथी कळेल. त्या लोकांसाठी स्वातंत्र हा शाप होता. स्वातंत्र्य मिळालं नसत तर फाळणी झाली नसती आणि फाळणी नंतर च्या दुःखाच्या डागण्या हृदयाला मिळाल्या नसत्या. ह्या एका प्रसंगातूनच तेव्हाची भीषण परिस्थिती समोर येते. अंगावर काटा येतो. प्रेतांनी खचाखच भरलेली ट्रेन भारतात येते. सुन्न झालेल्या डोळ्यांनी तारा सिंग ती ट्रेन पाहतो. लोक वेडे होतात. आपल्या प्रियजनांच्या देहाची लक्तरे पाहून पेटून उठतात. आणि हिंदुस्थानात सुध्धा बदल्याची लाट उसळते. हातात नंगी तलवार घेऊन दंगलीत तारा सिंग पाकिस्तानात जाणाऱ्या मुसलमानांना कापत सुटतो.

मग अचानक एक दिवस त्याच्या समोर येते हातात एक काचेचा ताजमहाल घेतलेली मुलगी. तारा सिंग चा तलवार उगारलेला हाथ हवेतच थांबतो. त्याचे सोबतीचे लोक ओरडतात "ओय, ताऱ्या मार " पण तारा सिंग मारत नाही. ती मुलगी हाथ खाली घेते. तिची आणि तारा ची नजरानजर होते. ती असते "सकिना" उर्फ "मॅडमजी".

सकीना उर्फ सक्कु एका प्रतिष्ठित मुस्लिम व्यावसायिकाची, अश्रफ अली ची मुलगी. अशरफ अली जेवढा श्रीमंत तेवढाच हिंदुस्तान दवेष्टा. पाकिस्तान सोबतच पंजाब सुध्धा पाकिस्तानात यावा म्हणून मुस्लिम लीग ला लाखो रुपये पुरवणारा. अशरफ अली च्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला एक प्रसंग पुरतो. त्याच्यातला खलनायक पाच मिनिटाच्या सिन मध्ये पटकन इस्टॅब्लिश होतो.  हिंदुस्तानात सुध्धा मारकाट चालू झाल्यावर अशरफ अली आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानला पळायला निघतो. पण तेवढ्यात त्याच्या घरावर हल्ला होतो आणि जीव मुठीत घेऊन कसे बसे ते स्टेशन ल पोहचतात. पण ट्रेन पकडताना सकीना खालीच राहते. पडते. लोक तिला तुडवून निघून जातात. 

त्यांनतर तारा सिंग आणि सकिना ची प्रेम कथा सुरु होते. दोघांचे लग्न होते आणि एक मुलगा सुद्धा होतो. त्यांचं नाव चरणजित उर्फ "जिते". कालांतराने सकिनाला कळत कि तिचे आई वडील जिवंत आहेत . वडील पाकिस्तानात लाहोर चे महापौर आहेत. अशरफ अली मग फक्त आपल्या मुलीला धोक्याने पाकिस्तानात नेतात आणि अडकवतात. संयम संपल्यावर तारा सिंग बायकोला आणायला पाकिस्तानात जातो आणि मग सुरु होते खरी "गदर". अशी सर्वसाधारण कथा !   

सनी देओल चा इंटेन्स अभिनय पाहायचा असेल तर गदर एक प्रेम कथा बघायलाच हवा.  त्या आधीचे घायल , घातक, दामिनी, जीत सारख्या चित्रपटात त्याचा इंटेन्स अभिनय पाहायला मिळाला आहे , घातक आणि दामिनी मधला त्याचा अभिनय बेस्ट आहे. पण गदर मध्ये सुद्धा त्याने ताकतीचा परफॉर्मन्स दिलाय. सुरुवातीलाच त्याच्या डोळ्यात आपल्या कुटुंबाची अवहेलना पाहायला मिळते. पुढच्याच फ्रेम मध्ये संतापाने पेटून तलवार घेऊन कत्तल करत सुटलेला तारा सिंग त्याने बेमालूम रंगवलाय. खरतर आक्रमकपणा त्याच्या देहबोली ला साजेसा असतो. पण फ्लॅश बॅक मधल्या त्याच्या आणि सकीना च्या प्रसंगात तो गोड , निरागस वाटत राहतो. समाजाच्या रूढी परंपरांविरोधात उभा ठाकणारा बंडखोर तारा सिंग सुद्धा सनीने लीलया साकारलाय. पण चित्रपटाच्या उत्तरार्धात पाकिस्तानी लोकांना धु धु धुणारा , अश्रफ अलीला धमकी देणारा , पाकिस्तानच्या रस्त्यावर पाकिस्तानी पोलीसांची धूळदाण उडवणारा तारा सिंग जास्त लक्षात राहतो. ट्रक ड्रायव्हर चा बेदरकारपणा , सरदारजी चे आक्रमकपण सनी देओल जिवंत करतो. तारा सिंग म्हणून त्याच्या शिवाय दुसरा कोणी डोळ्यासमोर येऊच शकत नाही. 

कथा लेखकाने  सुद्धा सनी देओल ला डोळ्यासमोर ठेऊनच तारा सिंग चे कॅरॅक्टर लिहिलंय असं वाटते. तारा सिंग खऱ्या हिंदुस्थानी नागरिकच प्रतिनिधित्व करतो. धर्म जात न पाहता तो सकिनाची अब्रू वाचवतो. त्या साठी आपल्याच भाऊबंधाशी लढतो. घरात एक अबला सुंदर तरुणी आहे , ती अडचणीत आहे म्हणून तो तिचा फायदा उचलत नाही. तिला तिच्या पालकांना शोधायला सर्वतोपरी मदत करतो. आई बाप जिवंत आहे कळाल्यावर आपला व्हिसा नाही तरी तो बायकोला एकटीला त्यांना भेटायला पाठवतो. आणि त्याच बायकोला परत आणायला जीवावर उदार होऊन चक्क पाकिस्तानात जातो. तिथे तो बायकोसाठी आपला धर्म , देश सोडायला तयार होतो. पण जेव्हा गोष्ट देशाच्या सन्मानाची येते तेव्हा मात्र तो १०० मुंडकी उडवायला सुद्धा तयार होतो. जेव्हा तो ओरडतो तेव्हा ती डरकाळी वाघाच्या डरकाळी पेक्षा कमी नसते. हॅन्डपम्प उखडावा  तर तो सनी देओलनेच बाकी कोना येऱ्या गबाळ्याचे ते काम नोहे !

दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे सकीना. अमिषा पटेल चा हा दुसरा चित्रपट. पहिला "कहो ना प्यार है" सुपर डुपर हिट. त्यात तिने कोवळ्या कॉलेज तरुणीची भूमिका केलेली. तेव्हा ती लाखो दिलो कि सेंसेशन बनलेली. आणि दुसऱ्याच सिनेमात एक कॉम्प्लेक्स भूमिका तिच्या वाट्याला आली. तिने ती शिताफीने निभावली.  नाजूक साजूक , बड्या घराची मुस्लिम तरुणी तिने छान रंगवली. नाही म्हणायला काही रडारडी च्या सिन मध्ये ओव्हर एक्टिंग केली आहे पण उतना   चलता है.    कधी कधी रडून रडून तिला दम्याचा अटॅक आल्या सारखा वाटतो पण ती तिच्या भूमिकेची मागणी असल्याने जमून जाते. सुरुवातीला आई वडिलांसाठी रडणारी आणि नंतर नवरा आणि मुलासाठी रडणारी अशी रडकी भूमिका तिच्या वाट्याला आली आहे. पण चित्रपट पूर्णपणे तिच्याच भोवती गुंतला असल्याने तिची भूमिका महत्वाची ठरते. बापावर विश्वास ठेवून पाकिस्तानात जाणारी आणि फसगत झाल्यावर तळमळणारी भोळी सकीना अमिशा  ने मस्त साकारलीय.

पिक्चर चा हिरो कितीही बलाढ्य असू दे , डॅशिंग असू दे. त्याच्या हिरो पणाला तेव्हाच किंमत असते जेव्हा व्हिलन तगडा असतो. जेवढा खलनायक तगडा तेवढ हिरो च हिरोपण मोठं ! आणि जेव्हा खलनायक अमरीश पुरी असतो तेव्हा त्या तगडेपणाला एक वेगळच वलय मिळत. अमरीश पुरी सारखा खलनायक हिंदी चित्रपट सृष्टीत पुन्हा होणे नाही. त्यांच्या आवाजाचा बेसच भल्या भल्यांची बोबडी वळवायला पुरेसा आहे. अश्रफ अली सारखा श्रीमंत पण उद्दाम व्यावसायिक , हिंदुस्थान चा कट्टर वैरी अमरीश पुरी अतिशय यथासांग उभे करतात. कुटील नीती चेहऱ्यावर साफ झळकते. पण मुली साठी व्याकुळ झालेला बाप सुद्धा तेवढ्याच ताकतीने पडद्यावर उतरतो तो अमरीश पुरींमुळे. तारासिंग ला मुसलमान व्हायला सांगतानाचा कावेबाज पण डोळ्यात झळकत. तारा सिंग  मुसलमान  व्हायला तयार होतो , पाकिस्तान झिंदाबाद बोलतो तेव्हा आपला प्लॅन फसतोय हि अगतिकता ते चेहऱ्यावर आणतात आणि मग हिंदुस्थान मुर्दाबाद बोलायला लावतात हा अस्सल कपटपणा केवळ अमरीश पुरीचा जगू शकतात.  सिनेमाच्या शेवटी आपल्या हट्टापायी आपण मुलीला गमावतो कि काय ह्या भीतीने हताश बाप आणि तारा सिंग ची माफी मागणारा सासरा फक्त अमरीश पुरीच साकारू शकतात. मशिदी समोर तारा ने गदर माजवल्यानंतर एक मिनिट सर्व सुन्न होऊन जातात तेव्हा आपल्या खास शैलीत " अरे तुम लोगो को साप सुंघ  गया है क्या ?" म्हणत अशरफ अली प्रेक्षकांसकट सर्वाना भानावर आणतो.  

गदर मधले अजून दोन इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे दरमियाँ सिंग आणि अशरफ अली चा एक वेडसर पुतण्या . दरमिया सिंग म्हणजे तारा सिंग चा सच्चा यार. सुरुवातीचा दंगलीचा भाग सोडला तर अल्मोस्ट सर्व ठिकाणी तो तारा सिंग सोबत दिसतो. हि भूमिका साकारली आहे विवेक शौक यांनी. तसे त्याचे खूप सिनेमे आहेत पण दरमियाँ ची भूमिका आपल्या लक्षात राहते. आता हिरो चा मित्र म्हटल्यावर तो जरा विनोदी हवाच. वेगवेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या वाजवत दरमिया आपला विनोदी बाज पार पडत असतो पण पाकिस्तानात सुद्धा तो तारा सिंग सोबत पोहचतो. हिंदी सिनेमात साइड हिरो ला लास्ट ला का मारतात का मला कधीही न सुटलेला प्रश्न आहे. दरमिया सुद्धा तारा च्या रणसंग्रामात आपली आहुती देतो. त्या अगोदर एका डायलॉग ला हमखास टाळ्या घेतो " अरे बाप बाप होता है , आखिर तुम्हारा पाकिस्तान निकला तो हिंदुस्थान से हि है ना " म्हणत टाळ्या शिट्ट्या घेत दरमियाँ लक्षात राहतो. 

दुसरा अशरफ अली चा एक पुतण्या जो वेडसर आहे. त्याला हिंदुस्थान ची फाळणी झाल्याचं माहीतच नाही. तो मधूनच पाकिस्तानात असून सुद्धा हिंदुस्थान जिंदाबाद , चलेजाव अंग्रेजो , नेहरू आ रहे है क्या ? असे डायलॉग मारत असतो. तिरंगा घेऊन फिरत असतो. गाना बजाओ म्हटल्यावर "सारे जहाँ से अच्छा" गाणे गाऊ लागतो.  पण त्याने चित्रपटाला एक वेगळा फील येतो. खरतर त्याची व्यक्तिरेखा हि भारतीयातल्या सच्च्या मुसलमान वर्गाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ती खास लक्षात राहते.  

गदर चा मुख्य प्राण आहे त्याचे संवाद . एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉग्ज ने बॉक्स ऑफिस हलवून टाकले. मी हा मूवी चिपळूण ला "पद्मा" थिएटर ला पहिल्यांदा पहिला. त्या नंतर टीव्ही वर कित्येक वेळा पाहिला. पद्मा थिएटर ला तर तारा सिंग " हिंदुस्थान जिंदाबाद" बोलल्यावर पुढची १० मिनिट एकही डायलॉग ऐकू येत नव्हता. पूर्ण थिएटर मध्य फक्त आणि फक्त हिंदुस्थान जिंदाबाद , टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या. चित्रपटाची कथा आणि संवाद "शक्तिमान तलवार" यांनी लिहिलेत. ज्याच्या नावातच एवढी धार आहे तर लिखाणात किती असेल याची कल्पना येते. आजच्या " आदिपुरुष" च्या जमान्यात गदर चे संवाद अजून उठून दिसतात. 
एकदा गदर चे खालील डायलॉग वाचून बघा : 
१. आपका  पाकिस्तान जिंदाबाद है उससे हमी कोई दिक्कत नही , लेकिन हमारा हिंदुस्थान जिंदाबाद था , जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा ! 
२. बाप बनकर बेटी को विदा कर दीजिए, इसी में सबकी भलाई है, वरना अगर आज ये जट बिगड़ गया तो सैकड़ों को ले मरेगा.
३. एक कागज़ पर मोहर नहीं लगेगी तो क्या तारा पाकिस्तान नहीं जाएगा? मुझे मेरे बच्चे को उसकी मां से मिलाने से कोई ताकत, कोई सरहद नहीं रोक सकती.
४. दुनिया जानती है कि बंटवारे के वक्त हम लोगों ने आप लोगों को 65 करोड़ रुपये दिए थे तब जाकर आपके छत पर तिरपाल आई थी. बरसात से बचने की हैसियत नहीं और गोलीबारी की बात कर रहे हैं आप लोग!
५. अगर मैं अपने बीवी-बच्चे के लिए सर झुका सकता हूं, तो मैं सबके सर काट भी सकता हूं.
६. इस मुल्क से ज़्यादा मुसलमान हिन्दुस्तान में हैं. उनके होंठ और दिलों की धड़कनें हमेशा यही कहती हैं 'हिन्दुस्तान ज़िंदाबाद'. तो क्या वो पक्के मुसलमान नहीं हैं?
७. आदमी का सबसे बड़ा मज़हब है अपनी बीवी और बच्चों की हिफाज़त करना.
८. आखिर तुम्हारा पाकिस्तान निकला तो हिंदुस्थान से हि है.

अशे एका पेक्षा एक आयकॉनिक , हार्ड हीटिंग डायलॉग मुळे हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही.

गदर चा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे ह्या सिनेमा ची गाणी आणि पार्श्व संगीत. " मै निकला गड्डी लेके" " उड जा काले कावा " " हम जुदा हो गये " "मुसाफिर जाने वाले" सारखी श्रवणीय गाणी, त्यांची चित्रपटात योग्य जागी पेरणी यामुळे चित्रपट बांधेसूद होतो. उत्तम सिंग यांनी अतिशय उत्तम संगीत दिले आहे. सिनेमाचं पार्श्व संगीत अर्थात बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा मस्त आहे. त्यामुळे तारा सिंग च्या धमाकेदार ऍक्शन ला जान येते. ऍक्शन सिन बद्दल तर बोलायलाच नको. हापसा उखडायच्या आयकॉनिक सिन ला तोड नाही.

सरते शेवटी सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा याना मुजरा ! 
  
एकूणच गदर - एक प्रेम कथा मला खूप आवडलेला. ह्या चित्रपटाबद्दल सुरुवातीला समीक्षकांनी खूप निगेटिव्ह रिव्हियू दिलेले. पण जनता जनार्दन ने चित्रपटाला उचलून धरले आणि कमाईचे कित्येक रेकॉर्ड ह्या चित्रपटाने तोडले. 

अजून पण टाईमपास म्हणून तुम्ही यु ट्यूब ला हा चित्रपट पाहू शकता. गदर २ पाहिला कि त्याचा रिव्हियू लिहीन. तो पर्यंत " हिंदुस्थान जिंदाबाद !"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या