Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शाळेचं गॅदरिंग | वार्षिक स्नेहसंमेलन | The Annual Function




शाळेचं गॅदरिंग - The Annual Function 


डिसेंबर महिना म्हणजे शालेय जीवनातला सर्वात आनंदाचा महिना. दिवाळी नंतर अभ्यास कमी आणि मज्जा जास्त असं अनोख वातावरण असतं शाळेत. डिसेंबर महिन्याचं, कार्तिक मार्गशिर्ष महिन्याचं आल्हाददायक वातावरण आणि शाळेतला आनंदमेळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. 

साहमाहीची परीक्षा दिवाळी अगोदर संपलेली असते. दिवाळी सुट्टी खाऊन आलेल्या मुलांना अभ्यासाचा थोडा विसर पडला असतो. अशात डिसेंबर महिना येतो. शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या कि मग सर्वाना वेध लागतात गॅदरिंग अर्थात वार्षिक स्नेहसंमेलनाचे!

माझ्या कन्यचे स्नेहसंमेलन अर्थात गॅदरिंग तीन वर्ष बघतोय. गॅदरिंग जाहीर झाल्या दिवसापासून तिचा आनंद ओसंडून वाहत असतो. ह्या वर्षीचं तिचे गॅदरिंग झाले. मोहीम फत्ते झाली आणि मग माझ्या मनात गॅदरिंग बद्दल ब्लॉग डोकावू लागला.

लहान मुलांचे गॅदरिंग बघायचे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. अखंड ऊर्जेचा स्तोत्र असलेली हि चिमुकली पाखरे मस्त बागडत असतात आणि आपल्या मनाला पण एक वेगळा आनंद , वेगळा हुरूप देत असतात. मस्त मस्त ड्रेस घालून शाळेच्या आवारात उडणारी हि फुलपाखरे बघून मन उल्हसित होते. वेशभूषा पण एकापेक्षा एक ! कोणी मावळा बनून चॉकलेट खात बसला असतो,  कोणी कोळीण बनून स्टेजच्या पाठी धावत असते , काही चिमुरड्या मुली मस्त नऊवारी नेसून गळ्यात चमचमते दागीने घालून ऐटीत मुरडत असतात. कोणी लोकगीतात भाग घेतलेला गुबगुबीत पोर अंगापेक्षा मोठी घोंगडी अंगावर घेऊन टीचभर धोतर घालून मिरवत असतो. देशभक्तीपर गाण्यातली मुलं भारताची विविधतेतील एकता दाखवायला पंजाबी , दाक्षिणात्य , गुजराती अश्या हर तर्हेच्या कपड्याने सजलेली असतात . 




मला मज्जा येते त्या मुलांना बघायला ज्यांनी आपल्या दाढी मिश्या काळ्या रंगाने काढलेल्या असता . बेहद क्युट वाटतात हि पोरं .  शेतकरी बनलेली मुले डोक्याला मुंडासे बांधून येतात तेव्हा त्यांच्या इतका सुंदर शेतकरी जगात कुठेच नसतो.


कोळणी बनलेल्या मुलींना बघून त्याच्या टोपलीतले सगळे नकली मासे विकत घ्यायचा मोह होतो. शेतकरी बनलेल्या आखूड नऊवारी घातलेल्या चिटुकल्या मुलींच्या टोपलीतली खोटी खोटी भाजी भाकर खायला कोण नाही म्हणेल ?  शिवाजी महाराज , टिळक, आंबेडकर , गांधीजी बनलेल्या मुलांचा थाट औरच असतो.

शिवाजी महाराजांच्या नावाची जादू म्हणा किंवा ताकद  म्हणा किंवा ती अदृश्य ऊर्जा म्हणा पण शिवाजी महाराज बनलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असत. 

परी सारखे पांढरे शुभ्र , किंवा लाल किंवा गुलाबी ( पिंक) फरची फुगेरी फ्रॉक घातलेल्या मुली ह्या घोळक्याला ग्लॅमर आणतात. पांढरा कुर्ता पायजमा आणि वर भगवा फेटा बांधलेली मुलं आणि मुली गर्दीला पारंपरिक साज आणतात. श्री कृष्णा आणि राधा बनलेल्या मुलं मुलींची बातच और असते. खट्याळ पण ह्या राधा कृष्णा मध्ये ओसंडून वाहत असतो. गॅदरिंग ला अजून एक कॉमन दिसणारा ड्रेस म्हणजे सैनिकांचा ड्रेस. सैनिक बनलेली मुले हातात नकली धाय धाय वाजणाऱ्या बंदूक घेऊन मैदानभर शत्रूचा खात्मा करत फिरत असतात. 

अर्थात मैदानभर मि त्या शाळांसाठी बोलतोय ज्यांना स्वतःच स्वतंत्र पटांगण आहे. विस्तृत परिसर आहे. बऱ्याच शाळा आजकाल गॅदरिंग हॉल मध्ये घेतात आणि त्याचे पैसे पण पालकांनांकडून घेतात. असो पण पालकांच्या हौसेला मोल नसते. मुलांच्या गॅदरिंग ची धमाल ही आई बापासाठी एक टास्क असतो. गॅदरिंग जाहीर झाल्यापासून ह्यावटास्क ची सुरुवात होते. मुलाला कोणत्या गाण्यात घेतलंय हिथुन सुरुवात होते. मग त्या गाण्याला अनुसरून वेशभूषा अर्थात costume ची सोय करा हा एक अभूतपूर्व टास्क असतो. 

पांढराच कुर्ता हवा, 
हिरवीच साडी हवी, ती पण नऊवारी हवी,
त्यावर ब्लाउज लालच हवा
डिजाईन वाला चालेल का? 
नाही ओ तुमची मुलगी शेतकरीन बनली शेतकरीन बाई डिजाईनर ब्लाउज घालेल कां? 
लाईट पिंक फ्रॉक चालेल का?
नाही नाही सर्व मुलींचा सेम फ्रॉक हवा नाहीतर वेगळं दिसेल ते. 
एक ना हजार डिटेलिंग केल जात. हवा तसा ड्रेस शोधायला पालकांची त्रेधा तिरपीट उडते. कधी विकत घेतात तर कधी भाड्याने आणतात. पण मी म्हटलं तसं पालकांच्या हौसेला मोल नाही. अथक प्रयत्नांनानंतर गॅदरिंग साठी तयार झालेल्या आपल्या पाल्याला बघून आय बापाचा जीव अभिमानाने फुलून जातो. हेच ते जगातलं सर्वात सुंदर लेकरू. खटाखट सेल्फ्या काढल्या जातात. 

काम हिथेच संपत नाही. अहो गॅदरिंग चा परफॉर्मन्स शूट नको का करायला. मग मोबाईलचे कॅमेरे झूम करून करून व्हिडिओ बनवावे लागतात. मध्येच अडथळा करणाऱ्या लोकांना दोन शब्द ऐकवावे लागतात. तेव्हा कुठे व्हिडीओ बनववून होतो. 

पण तो दिवस मंतरलेला असतो. मुलं गॅदरिंग च्या खुशीत आणि आईबाप आपल्या मुलाला स्टेजवर पाहण्याच्या कौतुकात न्हाहून जातात. घरी परत येताना मुलं काहीतरी धमाल किस्सा सांगत असतात आणि आईबाप आपल्या बालपणात शाळेच्या गॅदरिंग च्या आठवणीत गुंतलेले असतात. 

- अव्यक्त अभिजीत 



अजून वाचण्यासारखे - माझे बालपण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या