Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

काला पाणी | मराठी रिव्हियू | Kaala Pani | Marathi Review

" काला पाणी - वेबसिरीज - मराठी रिव्हियू  " 




जर तुमच्याकडे चांगली कथा आहे. त्याला अनुसरून भक्कम पटकथा आहे आणि अतिशय ताकदीचे कलाकार तुमच्या कडे आहेत तर तुम्ही काय करू शकता याच उत्तम उदाहरण म्हणजे "  काला पाणी " . एक खिळवून ठेवणारी , विचार करायला भाग पडणारी आणि सुन्न करून टाकणारी वेब सिरीज. 


मनुष्य प्राणी हा बाकी सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तो प्रकृती कडून , निसर्गाकडून नुसतं घेत असतो. देत काहीच नाही. आपण प्रगती , विकासाच्या नावाखाली निसर्गावर अगणित  अत्याचार केलेत. आणि जेव्हा निसर्ग आपल्याला उलटून उत्तर देईल तेव्हा काय होईल ? ह्याच उत्तर हवं असेल तर "काला पाणी "  पाहायलाच हवी. अमित गोलाणी आणि समीर सक्सेना ह्या जोडगोळीने हि सिरीज दिग्दर्शित केली आहे. आणि काय अफलातून रित्या त्यांनी पूर्ण सिरीज बांधून ठेवली आहे.   


"काला पाणी"  ची कथा अंदमान निकोबार बेटावर घडते. ती पण भविष्यात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती ती ह्याच बेटावर. सगळं छान  चाललं असत तिकडे. "स्वराज महोत्सव" सारखा एक मोठा महोत्सव होणार असतो. लाखो पर्यटक बेटावर आले असतात. आणि अचानक एका रात्री " ओराका " जमातीचे काही लोक पाण्याची भली मोठी पाइप लाईन एक भल्या मोठ्या दगडांने फोडतात. क्षणभर आपल्याला त्या जमातीचा राग येतो. पुढे घडत जाणाऱ्या घटनांचा तर्क लावत लावत एक भीषण घटना समोर येऊ लागते. जुन्या काळातल्या "प्लेग" सारख्या एका भयानक रोगाची साथ पसरते. त्या रोगाचे रुग्ण वाऱ्याच्या वेगाने वाढू लागतात आणि बेटाचा मेनलॅन्ड ( भारत ) शी संपर्क तोडला जातो. आणि संपूर्ण बेट आयसोलेट केले जाते.


डॉ. सिंग ज्यांना ह्या साथीच्या रोगाच्या भयावह धोक्याची कल्पना असते ती त्या रोगाच्या उगमाच्या मुळाशी जाता जात आपला जीव गमावते आणि हे कोडे अजून गुंतागुंतीचं बनत जाते. पुढची पूर्ण सिरीज मग उत्कंठा , कारुण्य , लोभ, त्याग , प्रेम अश्या सर्व मानवी गुणांनी , जीवन रसांनी भरून जाते.


ह्या मालिकेत प्रमुख कथेसोबत खूप साऱ्या पटकथा येतात. त्या अनुषंगाने खूप साऱ्या व्यक्तीरेखा येतात. एक सावला नावाचे  कुटुंब जे सहली साठी अंदमान ला आले आहे. पण मुलाच्या एका विचित्र हट्टामुळे त्यातले आई बाबा दुसऱ्या बेटावर अडकतात आणि तो मुलगा आणि त्याची लहानगी बहीण दुसऱ्या ठिकाणी अडकतात. एक चिरंजीवी उर्फ चिरू नावाचा स्थानिक गाईड जो ह्या कुटुंबाला टूर घडवणार असतो. त्याच्या कुटुंबाची एक वेगळी कथा आहे. त्याच्या भावाची मैत्रीण आहे जी नर्स आहे "ज्योत्स्ना" तिची वेगळी कथा आहे. एक भ्रष्ट पोलिसवाला आहे , एक स्वार्थी उद्योजक आहे , एक लेफ्टनंट गव्हर्नर आहे तो आपल्या तत्वांवर ठाम आहे. प्रत्येकाची स्वतंत्र कथा आहे. पण लेखकाची कमाल म्हणजे त्यानी ह्या सर्व कथा एकमेकात गुंफल्या आहेत , अगदी बेमालूम पद्धतीने आपण त्यात गुंतत जातो हे कथा लेखनाचं वैशिष्ट्य आहे.   एवढ्या साऱ्या व्यक्तिरेखा असून सुद्धा कुठेही गोंधळ उडत नाही प्रत्येक  व्यक्तिरेखा दुसऱ्या व्यक्तीरेखेच्या आयुष्यात अगदी सहज प्रवेश करते. म्हणूनच :काला पाणी" ची कथा हा ह्या मालिकेचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरतो.


मालिकेचा दुसरा प्लस पॉईंट म्हणजे अभिनय. सुकांत गोयल चा "चिरू" , आरुषी शर्मा ची " ज्योत्स्ना" , विकास कुमार चा "संतोष", अमेय वाघ चा " एसीपी  केतन कामत", आशुतोष गोवारीकर चा " गव्हर्नर", राधिका मेहरोत्रा ची "रितू" , चिन्मय मांडलेकर चे " डॉ. महाजन"  सर्व अफलातून जमले आहेत. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे. एक लहानगी आराध्या अजाना ची "कद्दू" मनात घर करून राहते. सर्व भावनिक प्रसंगात विकास कुमार , आणि सुकांत भाव खाऊन जातात. अमेय वाघ ने ग्रे शेड भूमिका इतक्या ताकदीने केली आहे कि खरोखर त्याला मनातून शिव्या द्यावाश्या वाटतात. मोना सिंग ने आपली छोटीशी भूमिका छान निभावली आहे . चिन्मय मांडलेकर आणि आशुतोष गोवारीकर आपआपल्या भूमिकेला मस्त न्याय देतात.  


"काला पाणी" मधले काही प्रसंग एकदम अफलातून जमले आहेत. उदा. संतोष आणि त्याची मुलगी कद्दू यांच्या भेटीचा प्रसंग. कितीही मन कठोर केलं तरी त्या प्रसंगात डोळ्यात पाणी येतच. चिरू ला आपल्या खऱ्या आईबदल कळतं तो प्रसंग ही मनात ठासून उतरतो. स्वस्ति गर्भवती आहे आणि ती सुधा त्या रोगाची बाधा झाली आहे हे कळल्यावर डॉक्टरांची अगतिकता चिन्मय मांडलेकर ने अगदी जिवंतपणे मांडली आहे.

एका प्रसंगात उद्योजक "वाणी " आणि पोलीस " केतन (अमेय) ह्यांच्या धारदार संवादातून आपणच आपल्या पर्यावरणाचा कसा नॅश करत चाललोय ते ठळकपणे जाणवते. आधुनिक राहणीच्या नावाखाली आपणच आपल्या निसर्ग देवतेची कशी नासधूस करत आहोत हे जाणवले तरी पुष्कळ झाले.  

मालिकेचे छायाचित्रण हि अजून एक जमेची बाजू आहे. खूप छान फ्रेम मध्ये मालिका चित्रित केली आहे. पार्श्वसंगीत सुद्धा उत्तम जमले आहे. प्रसंग भावनिक असो किंवा भीतीदायक " रचिता अरोरा" ने अतिशय समर्पक पार्श्व्संगीत दिले आहे. बऱ्याचदा त्या संगीतामुळे प्रसंग अंगावर येतो.

" काला पाणी " ची नकारात्मक बाजू म्हणजे काही वेळेला काही प्रसंग थोडे ताणले गेले आहेत. काही ठिकाणी कथेच्या मागणीनुसार वस्तुस्थितीला मुरड  घातली आहे. पण ते फारसे जाणवत नाही. त्यामुळे काही फरक पडत नाही.

" काला पाणी " चे एकूण ७ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड जवळपास एक तासाचा आहे. विशेष म्हणजे हि मालिका पहिल्या सीजन ला संपत नाही आहे. एका "क्लीफ हँगर' वर आणून थांबवलं आहे त्यामुळे नेटफ्लिक्स ने  पुढची उत्कंठता ताणून ठेवली आहे.   

एकूणच एका उत्तम कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी " काला पाणी " नक्की पाहायला हवी. 


वेबसिरीज : काला पाणी - Kaala Pani 

ओटीटी प्लॅटफॉर्म - OTT  Platform - नेटफ्लिक्स - Netflix  

⭐⭐⭐⭐

Rating : 4/5

अजून वाचण्यासारखे :-  हंबीरराव, ताराराणी आणि मी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या