मुंबई इंडियन्स चे कॉर्पोरेट धडे
Corporate lessons from Mumbai Indians
सरतेशेवटी मुंबई इंडियन्स चा आयपीएल २०२४ मधला प्रवास संपला. गुणतालिकेत अगदी तळावर राहून मुंबई चा बाजार उठला. मुंबई इंडियन्स च्या चाहत्यांसाठी हे पर्व म्हणजे क्लेशदायक होते. रोहित शर्माची कर्णधार पदावरून उचलबांगडी , हार्दिक ची नियुक्ती , सतत ची हार , बुमराह वगळता गोलंदाजीच्या उडालेल्या चिंध्या , वानखेडे स्टेडियम मधले निर्बंध , सर्व सर्व क्लेशदायक होत. आयपीएल च्या इतिहासातली सर्वांत यशस्वी टीम अशी तळागाळाला जात असताना पाहून मन विषन्न होत होते. रोहित कर्णधार नसल्याने मुंबई हरली ते बर झालं असं मनाला समजावत काही चाहते मनाची बाळबोध समज घालून घेत होते. पण ह्या सर्वातून खूप काही "कॉर्पोरेट धडे" शिकायला भेटले.
चांगल्या हसत्या खेळत्या कंपनीत मॅनेजमेंट ने आपल्या अतर्क्य डोक्यातून आलेल्या अचाट कल्पनेने कंपनीचा बाजार उठवला. जुना जाणता "रोहित" सारखा एम्प्लॉयी (कर्मचारी) जो सर्व स्टाफ ला मस्त एकत्र घेऊन चाललेला त्याला मेमो दिला. आधी ह्याच कंपनीत काम करत असलेला एक "हार्दिक" कर्मचारी , जो ह्याच कंपनीत काम शिकला , मोठा झाला दुसऱ्या कंपनीने जास्त CTC ची ऑफर दिली तसा राजीनामा देऊन बाहेर पडला. त्याला परत बोलावून कंपनीने पहिला पायावर धोंडा मारून घेतला. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी ह्या नवीन कर्मचाऱ्याला डायरेक्ट मॅनेजर ची पोस्ट देऊन टाकली. आणि मग स्वतःच्या डोक्यात धोंडा मारून घेतला. भले त्याने दुसऱ्या कंपनीचा टर्नओव्हर वाढवला होता. पण म्हणून त्याची खरंच किती कुवत आहे हे पुरेपूर न तपासता त्याला बाकी जुन्या स्टाफ च्या डोक्यावर आणून बसवले.
आता विचार करा कि जुन्या स्टाफ ला किती राग आला असेल. एकतर तुम्ही जुन्या मॅनेजर ला पदावरून काढलात. त्यात त्याला जो त्याचा जुनिअर होता त्याच्या हाताखाली काम करायला लावलात तर प्रोडक्टिव्हिटी चे तर तीन तेरा वाजणारच ना. बरं तुम्हाला मॅनेजर चेंज करायचंय तर त्याला तसं आधी सांगा तर ! तुमच्या कंपनीत अजून बाकी जुने जाणते लोक आहेत जे तुमच्या कंपनीशी किती वर्ष एकनिष्ठ आहेत , वफादार आहेत त्या असिस्टंट मॅनेजर ला संधी द्या . पण नाही आपल्या मॅनेजमेंट ला असे बाहेरून आलेल्या चमकोगिरी करणाऱ्या लोकांवर पटकन विश्वास बसतो. त्याला वाटेल तेवढी फी द्यायला तयार होतात. आणि वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या सूर्या , बुमराह सारख्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पान पुसली जातात. तोंडावर सगळे चांगले हसतात , बोलतात पण मनात कुढत असतात. पण एवढं मात्र नक्की की एवढं होऊन पण हे कर्मचारी आपलं काम इमान इतबारे करत राहतात.
नविन आलेला मॅनेजर सुध्धा "हुलेहुल जांग्या गुल " असतो. उगीच दररोज काहीतरी इंस्पिरेशन टॉक करायचे. मॅनेजमेंट समोर पुढेपुढ करायचं, शो शायनिंग मारायची यात त्याचा हातखंडा असला की झालं. मीटिंग मध्ये बाकीच्यांवर चडिंग घायची, नको नको त्या नवीन स्कीम काढायच्या, असले व्यर्थ धंदे त्यांना जमतात. पण खरंच जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ह्या "हार्दिक" कर्मचाऱ्याच्या तोंडाला फेस येतो. मग एखाद्या फसलेल्या टास्क च खापर तो बाकी कर्मचाऱ्यावर फोडतो. "तिलक ला डेड लाईन चा अंदाज नाही आला." वगैरे सारखी फुटकळ कारण देऊन अंग काढून घ्यायला बघतो. त्यात एखादा सटकू "तिलक" असला तर मग बाचाबाची व्हायला वेळ लागत नाही.
जगावेगळ्या स्ट्रटेजी वापरून हा मॅनेजर बाकी कर्मचारी वर्गाचे मोरल डाऊन करतो. इतकी वर्ष इमान इतबारे काम करण्याच्या जुन्या लोकांचं कामावरच मन उडत आणि कंपनीच्या अधोगती ची सुरुवात होते. होऊ दे लॉस आपलं काय काय जातंय ही भावना जुन्या कर्मचारी वर्गात घर करू लागते. एखाद्या अडचणीच्या वेळी " आता का ? आणला ना ह्याला ? घ्या आता " असे मनोमन विचार करत पण चेहऱ्यावर नकली त्रास , काळजी दाखवत जुने कर्मचारी कंपनीची आणि नवीन मॅनेजर ची मजा घेत असतात.
ह्या सगळ्या भानगडीत नुकसान कोणाचं होत माहितेय ? कंपनीचं ! कधी काळी भरधाव वेगाने धडाडत जाणारा रथ अचानक अडखळू लागतो. काय चुकतंय हे कळे कळे पर्यंत ७ सामने हरले जातात. वर अब्रूचे धिंडवडे निघतात ते वेगळे ! कधीं कधीं यश हे अतिशय हुशार माणसाला ही चुका करायला भाग पाडतात हे खरं. गरज नसताना जगावेगळे निर्णय घायचा आणि मग स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा..
विचार करून बघा ही सर्व मुंबई इंडियन्स ची कथा आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणारी आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या बाबतीत घडलेली असेल. एकूण काय तर मुंबई इंडियन्स च्या ह्या हंगामातल्या कामगिरी वरून आपल्याला खालील कॉर्पोरेट धडे शिकायला मिळतात.
१. कोण नाय कोणचा डाळ भात लोणचा ! (कंपनीत कोणी कोणचा नसतो. आप आपल आपण बघायचं.
२. कंपनी कधी कोणावर मनापासून प्रेम करत नाही. त्यामुळे आपण भलं आपलं काम भलं !
३. कानामागून येऊन तिखट झाली ( कोणीही नवखा कर्मचारी येऊन तुमच्या डोक्यावर बसू शकतो)
४. जिथे आपली किंमत नाही तिथून वेळीच बाहेर पडायचं. आपलं काम जास्त कोणाला शिकवायच नाही. आपली किंमत कमी होते.
अजून बरेच धडे तुम्ही शिकला असाल तर आम्हाला कळवा ! आणि पुढच्या मेगा ऑक्शन ची वाट पहा ! तो पर्यंत वर्ल्ड कप बघुया !
0 टिप्पण्या