Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

ड्रीम इलेव्हन - स्वप्न करोडपती व्हायचं | Dream XI - Dream to be a millionaire




ड्रीम इलेव्हन 

स्वप्न "करोडपती" व्हायचं !

 

२२ मार्च ची संध्याकाळ , वेळ ७ ते ७.१५ ची असेल. मी लोकल ने घरी जातो होतो. अचानक फोन वाजला , पाहिलं तर डोंबिवलीतल्या माझ्या मित्रांच्या WhatsApp group वर ग्रुप कॉल आलेला. जवळपास वर्षभराने असा कॉल आलेला. मी आधी आश्चर्यचकित झालो. परत थोडासा घाबरलो कारण ग्रुप कॉल ह्या वेळी म्हणजे काहीतरी इमर्जन्सी असणार अशी शंका आली. मी फोन उचलला . अजून २-३ मित्र पण कॉल वर जॉईन झालेले. मी थोड्या काळजीने विचारलं " काय रे राक्या, काय झालं ?"

तो जे बोलला ते ऐकून माझी पायाखालची जमीन सरकली. धावत्या ट्रेन ला अचानक ब्रेक मारून धक्का बसावा तसा धक्का मला बसला. मोबाईल सकट हाथ थरथरू लागला. डोक्याला असंख्य मुंग्यांनी एकसाथ चालावे तसा भास झाला.

राक्याचे शब्द होते " अरे रांडचानो, टीम लावा, ७.३० वाजायला आले"

 

हो जवळपास वर्षभराने मित्राने ग्रुप कॉल केला तो हे सांगायला की ड्रीम इलेव्हनला लीग लावली आहे त्यात टीम लावा. ७.३० वाजत आले आहेत. मग मी गप फोन कट केला आणि लीग जॉईन केली.

आयपीएल आली की ड्रीम इलेव्हन हा अतिशय जास्त वापरला जाणारा शब्द बनतो. ड्रीम इलेव्हनच्या यशाच खर गुपित त्यांच्या नावातच दडलंय .

ड्रीम म्हणजे स्वप्न . स्वप्न करोडपती होण्याचं !

सामान्य माणसाला करोडपती व्हायचं असेल तर ड्रीम इलेव्हन शिवाय दुसरा पर्याय नाही. ३० -४० रुपये लावायचे आणि करोडपती व्हायचं  इतका सरळ साधा करोडपती होण्याचा दुसरा कोणताच मार्ग दुसऱ्या कुठे सांगितला नाही आहे. आणि तो पण पूर्णपणे कायदेशीर !

 

शिवाय क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण ! अन्न , वस्त्र,निवारा , मोबाईल आणि क्रिकेट ह्या भारतीयांच्या मूलभूत गरजा आहेत. भारतात क्रिकेट न आवडणाऱ्या लोकांची संख्या लायझोल ने न मारलेल्या किटाणू एवढी म्हणजे ०. ०१% एवढी पण नसेल. हिथे गल्ली गल्लीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ऍनालिसिस्ट, जागतिक दर्जाचे प्रशिक्षक भेटतील. भले त्यांच्या बॅट ला जिंदगीत कधी बॉल चा स्पर्श झाला नसेल पण रोहित शर्मा ने शॉट कसा मारायला हवा हे सांगणारे लाखो लोक भारतात पडीक आहेत.

 

तर विषय हा की भारतीयांना क्रिकेटच अफाट ज्ञान आहे. आणि त्याचा फायदा घेऊन ५९ रुपयात करोडपती व्हायचा चान्स भेटत असेल तर तो कोणी का सोडेल. आयपीएल आली की हा चान्स दररोजच्या दररोज मिळत असेल तर कोणी का सोडेल ? मग सगळीकडे तीच चर्चा असते. ऑफिसमध्ये , ट्रेनमध्ये, कट्ट्यावर, टपरीवर, WhatsApp वर, स्टेटस वर .. सगळीकडे तीच चर्चा

"टीम लावली का ?" "कॅप्टन कोण होता तुझा ?" "किती आले ?"

 

मी सुध्दा सामान्य माणूस आहे. मी पण जनप्रवाहाच्या विरोधात जायचं धाडस करत नाही. समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन मी माझं स्वतःचं अस्तित्व नाही दाखवून देत त्यामुळे नव्या समाजाच्या नव्या रीतिरिवाजानुसार मी सुध्धा ड्रीम इलेव्हन डाऊनलोड केले. मला सुध्दा करोडपती व्हायचंय यार. मला सुद्धा कळतं क्रिकेट मधलं. मग काय केली सुरुवात टीम लावायला.

 

सर्वात पहिल्यांदा माझ्या मनाला आवडलेल्या खेळाडूंना घेऊन टीम बनवली. आवडीचा खेळाडू कॅप्टन केला. आशेने मॅच बघायला बसलो. ४ ओवर्स नंतर कळलं की ह्या मॅचमध्ये पैसे नाही येणार कारण कॅप्टन आऊट झाला. नेक्स्ट मॅचला नावडता खेळाडू कॅप्टन केला तो पण लवकर आऊट झाला फक्त तो नावडता होता म्हणून मला फार दुःख नाही झालं. पुढच्या मॅचला मी मागच्या दोन सामन्यात भारी खेळलेल्या खेळाडू  ला कॅप्टन केला तर तो नावाजलेला गुरव देवळात हगला. मग मी वेगवेगळे फंडे वापरले. मी जेव्हा ओपनिंग वाले बॅटसमन घ्यायचो तेव्हा मिडल ऑर्डर वाले खेळायचे आणि मिडल ऑर्डर वाले घेतले तर ओपनिंग वाले खेळायचे. मी मुंबईचा किपर घेतला तर RCB वाला कीपर रन करायचा आणि RCB वाला निवडला की मुंबईवाला सेंच्युरी मारायचा. जो बॉलर विकेट घ्यायचा तो माझ्या टीम मध्ये नसायचा. जो असायचा त्याचा विकेट कॉलम चा अतापता नसायचा.

 

मग मी ठरवलं बस झाल ! अशी मनाला वाटेल ती मनमानी नाही करायची. अंदाधुंद फटकेबाजी नाही करायची. डोळे झाकून सिक्स मारायला नाही जायचं. जे काही करायचं ते शास्त्रशुद्ध पद्धतीने , व्यवस्थित प्लान करून बॅटिंग करायची. प्लान करून विकेट काढायची.  मग मी मॅच चे रिव्ह्यु वाचायला लागलो.  पिच रिपोर्ट बघायला लागलो. खेळपट्टी वर कोणता बॉलर चालेल ह्याची माहिती घेऊ लागलो. प्लेअर्स चे मागचे परफॉर्मन्स चेक करू लागलो. पीच रिपोर्ट मध्ये एक्स्पर्ट ने सांगितलं की खेळपट्टी स्पिनर ला चांगली आहे. मी टीम मध्ये ३ स्पिनर घेतले. मॅच चालू झाली आणि फास्टर बॉलर नी पहिल्या १० षटकात ५-६ विकेट घेतल्या. स्पिनर बॉलिंग ला येई पर्यंत त्याला विकेट शिल्लक नाही राहिल्या. खेळपट्टी फलंदाज धार्जिणी सांगितली म्हणून जास्त फलंदाज घेतले की हमखास फलंदाज तंबूत परतणार. वैतागून मी पीच रिपोर्ट च्या विरूध्द टीम लावली तर त्या दिवशी पीच रिपोर्ट तंतोतंत बरोबर आला.

 

एकूणच मी एक करोड जिंकावे अशी नियतीची ईच्छा नव्हती. पण मी पण काही कमी जिद्दी नाही. म्हटलं नशिबात असा लिहिलं असेल की १०० वेळा प्रयत्न केला तर नक्की जिंकेन आणि ९९ व्या प्रयत्नात डाव सोडला तर म्हणून मी पुन्हा कामाला लागलो. ह्या वेळी  मी यूट्यूब telegram अश्या चॅनल वर टीम शोधायला लागलो. पण तो ही उपाय चालेना. उगीच फालतूचे चॅनेल सबस्क्राइब झाले.

अगदीच फालतू प्लेअर ला कॅप्टन करू लागलो तर तो त्या मॅचला खरचं फालतू निघायचा. माझी अवस्था अशी होती की मॅच चालू होण्यापूर्वी मी करोडपतीच स्वप्न पहायचो आणि मॅच चालू झाली की २ षटकानंतर वाटायचं लावलेले पैसे तरी परत यावेत.

 

मग आमच्या मित्रा मित्रात लीग लावायला चालू केल्या निदान आपला पैसा आपल्याच सर्कल मध्ये रहावा याकरता. हळू हळू करोडपती पेक्षा मॅच ला ५० रुपये आले तरी लय झालं असं वाटू लागलं. उत्साह आटत चालला. थोड्याच दिवसात ॲप अनइंस्टॉल होण्याची लक्षण दिसू लागली. पण अचानक माझ्या मेहुण्याच्या मित्राने एक लाख जिंकले. काही दिवसांनी अजून एका मित्राच्या मित्राच्या मित्राने वीस हजार जिंकले.

माझं विश्वामित्र बनत चाललेलं मन पुन्हा ड्रीम इलेव्हनच्या मेनके कडे आकृष्ट होऊ लागलं. अश्या एका मागोमाग एक बऱ्याच आयपीएल गेल्या. पण मी करोड, लाख सोडा साधी माझी बॅलन्सशिट प्रॉफिट मध्ये पण नाही आणू शकलो.

 

मग सहज मी ड्रीम XI चा प्रॉफिट चा विचार केला. ५९ रुपये ची ग्रँड लीग , त्यात १ करोड ६७ लाख १० हजार ४३२ लोक सहभागी होतात. प्रत्येकी ५९ रुपये प्रमाणे जमा रक्कम होते ९८ करोड ५९ लाख १५ हजार ४८८ एवढी. त्यातले एकूण बक्षीस वाटप होते ७० करोड म्हणजे ग्रँड लीग चा एका दिवसात नफा आहे २८ करोड फक्त.  ही झाली फक्त एक लीग बाकी बारीक सारीक कितीतरी लीग असतात. माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. धंदा करना है तो बडा करो पुरुषोत्तम भाई वरना करो मत.

 

एकूणच मी नियती समोर सर्व शरणागती पत्करून आलीया भोगासी असावे सादर म्हणत ड्रीम इलेव्हन चा नाद सोडला. पण परवाच बातमी पहिली कि कोल्हापूर च्या एका मुलाने १ करोड जिंकले. मग माझी अवस्था मुन्ना भाई MBBS  मधल्या गाण्यासारखी झाली

 

"अगले दिन अपने मोहल्ले मी ऐश्वर्या आई .... ओ हो हो !"


अजून वाचा :- छत्रीनामा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या