Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

रोड-नामा : भाग १ | Road-Dairy : Part -1

 

Horn OK Please truck quote India



रोड-नामा : भाग १ | Road-Dairy  : Part -1

- अव्यक्त अभिजीत

गाड्यांच्या मागे लिहिलेल्या मजेशीर, भावनिक आणि attitude भरलेल्या वाक्यांमागचं खरं जग जाणून घ्या. "Horn OK Please", "बुरी नजर वाले तेरा मुँह काला" पासून "स्वच्छ भारत सुंदर भारत" पर्यंत—भारतीय रस्त्यांवरील या ओळी कशा सांगतात माणसांच्या भावना, विचार आणि कथा. एक वेगळा मराठी ब्लॉग अनुभव.

"रस्त्यावरून जाताना तुम्ही गाड्यांच्या मागे लिहिलेलं वाचता का?
कदाचित वाचता… पण कधी समजून घेतलंय?"

रोड-नामा : भाग १ | Road-Dairy  : Part -1

रस्त्याने प्रवास करताना अनेक जण काही ना काही करत असतात. काहींना गाणी ऐकायला आवडत. काहींना मोबाईल वर सिनेमा पाहायला आवडत, काही निवडक लोक वाचताना दिसतात. बरीचशी लोक झोप काढत असतात. आणि काही जणांना निरीक्षण करायला आवडत. मला वरच्या सर्व गोष्टी करायला आवडतात. पण निरीक्षण करायला सुरु केल्यावर एक एक नवीन विषय सुचू लागतो. असाच एक विषय सहज सुचला तो म्हणजे " गाड्यांच्या मागे लिहिलेली वाक्य"

रस्त्यावरून जाताना आपण अनेक गाड्या पाहतो. काही वेगाने निघून जातात, काही हळूच पुढे सरकतात. पण एक गोष्ट मात्र आपलं लक्ष वेधून घेते—गाडीच्या मागे लिहिलेलं काहीतरी. आपण गाडी ओलांडून पुढे जातो… पण कधी त्या ओळी वाचून थोडं हसू येतं, कधी विचार करायला लावतात. 

 

ट्रक , टेम्पो , रिक्षा अश्या वाहनांच्या पाठी सर्रास काही ना काही विलक्षण लिहिलेलं बघायला मिळत. सध्या SUV वगैरे सारख्या मोठ्या गाड्यांच्या पाठी काचेवर सुद्धा काही ना काही लिहिलेलं असत. अशीच एक गाडी ठाण्याला अगदी मोक्याच्या जंक्शन ला उभी होती. गाडीवर लिहिलं होत " आमची सुंदरा" . गाडी सुंदर होती ह्यात वाद नाही पण ती अश्या जागी उभी होती कि तिच्या मुळे झालेल्या ट्राफिकमुळे बाकीचे लोक "सुंदरा" च्या मालकाच्या कुळांचा उद्धार करत होते. 

एका पिकअप टेम्पोच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलं होत 

" दम  है तो पास  कर वरना बरदाश कर" 

माझ्यासमोरच १० गाड्या त्याला पास करून गेल्या आणि मग तो स्वतः बाकीच्यांना "बरदाश" करत होता. एक तर हे जे लिहिणारे कलाकार असतात त्यांच्या शुद्धलेखनाशी काही संबंध नसतो म्हणून मग "बरदाश्त" च "बरदाश" होत असत. 

Indian Truck slogan


एका मोठ्या ट्रक च्या मागे लिहिलं होत 

" स्वच्छ भारत सुंदर भारत" 

वाचून बर वाटलं. त्या गाडीला ओव्हरटेक करणार तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर तोंड बाहेर काढून पचकन थुंकला. मग माझा " बोले तैसा चाले " ह्या म्हणीवरचा विश्वासच उठला.  

" हॉर्न नॉट ओके " 

असे ठळकपणे लिहिलेल्या गाडीचा ड्रायव्हर ट्राफिक मध्ये "प्या प्या" करून हॉर्न वाजवत असतो. एकंदरीत गाडीवर जे लिहिलंय त्याचा आणि चालकांचा काही संबंध नसतो असा निष्कर्ष मी काढला.

 

पण काही काही गाड्यांवर खरंच फार मार्मिक लिहिलेलं असते. बदलापूर ला एका रिक्षावर लिहिलं होत

" सावकाश ये भावा , हफ्ते अजून बाकी आहेत".

वर वर  हे विनोदी वाटत पण त्याच्या खोलात गेल्यावर हफ्ते भरून त्या रिक्षावर आपलं पोट भरणाऱ्या त्या चालकाची व्यथा कळते.

Indian riksha Quotes


एका रिक्षावर लिहिलं होत

" तू जा पुढे जर तुला आहे घाई , माझी घरी वाट बघते माझी आई " ....

ह्या वाक्यापुढे मी निशब्द झालो. आशा करतो कि तो रिक्षावाला पण त्या वाक्याएवढाच भावुक आणि संवेदनशील असेल.

अजून एका रिक्षाच्या मागे लिहीत होत

" किरदार इमानदार रखना , जनाजा शानदार होगा "

उफ्फ ... एवढी कॅची लाईन ... कोणत्या तरी महान शायरने लिहिली असेल ...  गुगल करावं लागेल नाव पण शब्द अगदी मार्मिक होते  .

एका रिक्षावाला एक्दम दर्दी आशिक निघाला. त्याच्या रिक्षावर लिहिलं होते

"इसे रिक्षा ना समझना

ये तो रोड की रानी है

मैं इसका आशिक हूँ

और ये मेरी दीवानी है "

डायरेक्ट रिक्षाला "मेहबुबा " बनवून टाकलं. एका रिक्षावाला तर जगातला सगळ्यात मोठा तत्वज्ञ निघाला त्याच्या रिक्षा मागे लिहिलेलं

" दुनिया क्या बोलेगी ये मत सोचो, दुनिया मा#*%द है"

एवढं लिहून मी आजचा ब्लॉग संपवतो. रोड नामाच्या अजून गमती पुढच्या भागात. "तुम्हाला सगळ्यात भन्नाट गाडीवरचं वाक्य कोणतं दिसलंय?" मला कमेंट मध्ये नक्की कळवा. 

"पढेगा इंडिया तभी आगे बढेगा इंडिया "

- अव्यक्त अभिजीत 

#गाड्यांच्यामागेलिहिलेलं #IndianTruckQuotes #HornOKPlease #IndianRoads #मराठीब्लॉग #TruckArtIndia #DesiQuotes #HighwayStories #roaddiaries #traveldiaries



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या