Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

झाशीची राणी - राणी लक्ष्मीबाई- लहान मुलांसाठी मराठी भाषण | Queen of Jhansi - Speech for kids


झाशी ची राणी - राणी लक्ष्मीबाई 


भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक तेजस्वी तारे होऊन गेले. आपल्या तेजाने त्यांनी भारताचे स्वतंत्र व्हायचे स्वप्न तळपवून टाकले. पण ह्या दैदीप्यमान इतिहासात एक सळसळती, कडाडणारी वीज होती जिने इंग्रजांच्या साम्राज्याला डळमळीत करणारा तडाखा दिला होता.  एक अशी रणरागिणी जिने आपल्या तान्हा बाळाला पाठीशी बांधून रणांगणात इंग्रज सैन्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्या लखलखत्या विजेचे नाव म्हणजे " राणी लक्ष्मीबाई" म्हणजेच झाशीची राणी. 


दिनांक १९ नोव्हेंबर १८२८ साली एका तेजस्वी कन्येचा जन्म झाला.  राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई असे होते. मोरोपंतांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले "मनिकर्निका" . त्यांच्या नावाचा अर्थ होता " रत्नजडित कानातले" . आणि राणी होत्याच रत्नसारख्या तेजस्वी. काळेभोर केस, आखीव रेखीव चेहरा आणि विशाल डोळे यामुळे लक्ष्मीबाई उठून दिसत. घरी लाडाने सर्व त्यांना " मनू" म्हणत असत. मोरोपंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे खाजगी चिटणीस होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा रहिवास बाजीराव पेशव्यांच्या वाड्यातच होता. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे दत्तकपुत्र नानासाहेब , पांडुरंग टोपेंचा पुत्र तात्या टोपे आणि "मनू" एकत्र लहानाचे मोठे झाले. 


मनू लहानपणापासून हुशार आणि अतिशय तल्लख होती. बोलायला लागली लोक थक्क होऊन ऐकत राहत. मनू, नानासाहेब आणि तात्या टोपे यांचे शिक्षण एकत्र चालू होते. पण शिक्षणाव्यतिरिक्त  मनू घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदूक चालवणे, भालाफेक असे साहसी प्रशिक्षण सुद्धा चालू होते. त्यामुळे मनू लहानपणापासून पासून युद्ध कलेत तरबेज झाली होती. 


वयाच्या 13व्या वर्षी मनु चा झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाळकर  यांच्याशी विवाह झाला आणी मनू चे नाव बदलून "लक्ष्मीबाई" असे ठेवण्यात आले. मनीकर्णिकाची "झाशीची राणी लक्ष्मीबाई" झाली. त्या काळात मुलीचे लहान वयात लग्न होत असे. झाशीची राणी झाल्यावर सुद्धा " लक्ष्मीबाई" यांनी आपली युद्धकला सराव चालूच ठेवला. एवढाच नाही तर त्यांनी झाशीला आपल्या दास्याची मिळून एक महिलांची सैनिक तुकडी तयार केली. काशीबाई, सुंदर, मुंदर अश्या सहसी विरांगना त्या सैन्यात होत्या. 


त्या काळात इंग्रज भारतात आपले पाय रोवत होते. अनेक राज्यांची राजेशाही इंग्रजानी संपवली होती. इंग्रज्यांचा कुटील डाव लक्ष्मीबाई यांनी अगोदरच ओळखला होता आणि गंगाधर राव महाराजांना सांगितलं होता. कालांतराने "लक्ष्मीबाईना " राजपूत्र झाला त्याचे नाव दामोदरराव असे होते. संपूर्ण झाशी आनंदाने न्हाहून गेले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. एवढ्या चार महिन्याचे असताना दामोदरराव आजाराने वारले. 


महाराज गंगाधर राव सुद्धा आजारी पडू लागले. झाशीच्या गादीला वारस हवा होता अन्यथा इंग्रजानी झाशी राज्य सुद्धा खालसा केले असते हणून राणी आणी महाराज यांनी एक पुत्र दत्तक घेतला. आणी त्याचे नाव सुद्धा दामोदर राव ठेवले. पण दत्तक विधानाच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांचे निधन झाले आणी झाशीची जबाबदारी "राणी लक्ष्मीबाई" यांच्यावर येऊन पडली. 


झाशीच्या गादीचे वारस दामोदरराव आहेत. त्यांचे दत्तक विधान इंग्रजी अधिकाऱ्यांच्या समक्ष झाले आहे असा निरोप राणींनी कलकत्याला लॉर्ड डलहौसी याकडे पाठवला. त्यांचे उत्तर घेऊन एलीस नावाचा अधिकारी झाशीच्या दरबारात आला. त्याने सावधपणे जाहीरनामा वाचून दाखवला :

‘गव्हर्नर जनरलने झाशीचा दत्तक वारसा नामंजूर केला आहे. त्यामुळे भारत सरकारच्या (लॉर्ड डलहौसीच्या) दिनांक 7 मार्च 1854 च्या आदेशानुसार झाशी राज्याचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले असून ते राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे."


एकाएकी राणीच्या पडद्याआडून एक मधुर पण कणखर आवाज आला 

" नही... मै मेरी झाशी नही दूंगी "..

राणींचा सडेतोड जवाब ऐकून दिवाण -ए - खास थरारले. एलीस चपापला. झाशीच्या दरबारात सर्व जण रागाने लालबुंद झाले. परिस्थिती ओळखून एलीस ने तिथून काढता पाय घेतला. 


"प्रश्न फक्त झाशीचा नाही, अखिल हिंदुस्थानचा आहे. देशाचे स्वातंत्र्य इंग्रजांकडे गहान पडू नये म्हणून आपल्या सर्वांचा बळी द्यावा लागेल. आपल्याला त्या तयारीला लागावं लागेल " राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या. 


त्यानंतर 1857 मध्ये मेरठ ला इंग्रजविरुध्द उठाव झाला. क्रांतिकारकांनी इंग्रजाना सळो कि पळो करून सोडले. त्याचाफायदा उचलून लक्ष्मीबाईंनी किल्ल्यात सैन्य उभे केले. उठावात राणी क्रांतिकारकांना मदत करत होत्या. इंग्रजांचे आदेश माणण्यास राणीने नकार दिल्यामुळे इंग्रज संतापले. झाशी जिंकण्यासाठी खास "जनरल हयू रोझ" ह्या अधिकाऱ्याला इंग्लंड हुन बोलावण्यात आले. दरम्यान सदाशिवराव आणी नत्थेखान यांनी झाशीवर आक्रमण केले पण राणीच्या सैन्याने त्यांना पराभवाचे खडे चारले. 

23 मार्च 1858 रोजी रोझ च्या सैन्याने झाशीला वेढा घातला. त्याआधीच राणींनी आक्रमाणाचा धोका लक्षात घेऊन नानासाहेब आणी तात्या टोपे यांच्याकडे निरोप पाठवून मदत मागवली. किल्याची दुरुस्ती करून घेतली आणि आवश्यक सर्व गोष्टींचा साठा करून ठेवला. राणीने नानासाहेब आणि तात्यासाहेब टोपे यांच्याकडे मदतीसाठी निरोप पाठवला. 

हयू रोझ ने किल्ल्याचा वेढा वाढवला. लक्षमीबाई आणी त्यांच्या सैन्याने प्रखर लढा दिला. लक्ष्मीबाईनी वेढ्यातून बाहेर पडायचे ठरवले. त्यांनी दामोदरला पाठीशी बांधून आपल्या बादल घोड्यावरून गडावरून खाली उडी मारली. राणी आणि दामोदर वाचले पण घोडा वाचला नाही. महाराणीचा घोडा सुद्धा एवढा पराक्रमी होता कि राणीसाठी त्याने बलिदान दिले. 

वेढ्यातून बाहेर पडून महाराणी क्रांतिकारकांना जाऊन मिळाल्या आणि स्वातंत्र्य लढा अजून प्रखर केला. 

पण 18 जून 1858 मध्ये ग्वालिअर च्या लढाईत ही शूरवीर राणी रणांगणावर लढता लढता गंभीर घायाळ झाली. त्यातच त्यांचे निधन झाले. आपल्या मृत्यूनंतर इंग्रजांनी आपल्या शरीराला स्पर्श करू नये ही लक्ष्मीबाईंची ईच्छा होती म्हणून त्यांच्या साथीदारांनी इंग्रज सैनिक येण्यापूर्वी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. 

"खूब लडी मर्दानी वह झाँसी वाली राणी थी "

इंग्रजांनी आपल्या युद्धाच्या रिपोर्ट मध्ये सुध्धा लक्ष्मीबाई चा उल्लेख " रानी लक्ष्मीबाई "चतुर और सुंदर" हैं और वह "सभी भारतीय नेताओं में सबसे ख़तरनाक" हैं।" असा केला आहे. 

अश्या ह्या थोर राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा. 

अजून वाचण्यासारखे - सरदार वल्लभभाई पटेल




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या