Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

दुर्गा की महिषासूर ? | Durga or Mahishasur ?

 



जगातली प्रत्येक स्त्री 'दुर्गा' नसते, आणि जगातला प्रत्येक पुरुष 'महिषासूर' नसतो...


“Not every woman in the world is a ‘Durga,’ and not every man in the world is a ‘Mahishasura.’



घरात आलेल्या सुनेमध्ये स्वतःची मुलगी न पाहता, 

हुंड्यासाठी तिचा छळ करणारी, 

तिच्यावर हात उगारणारी, 

तिला जिवंत जाळणारी स्त्री... कधीच 'दुर्गा' नसते!


आपल्या पत्नीचा सन्मान जपणारा, 

तिच्या मनातलं दुःख ओळखणारा, 

तिच्या स्वप्नांना स्वतःची स्वप्नं मानणारा पुरुष... 

कधीच 'महिषासूर' नसतो!


आपल्या प्रियकराच्या साथीने स्वतःच्याच 

पतीच्या मृत्यूचा कट रचणारी स्त्री, 

नात्यांच्या पवित्रतेला काळिमा फासणारी स्त्री... 

कधीच 'दुर्गा' नसते!


आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारा, 

संकटांच्या वादळातही कुटुंबाची ढाल बनून 

उभा राहणारा पुरुष... कधीच 'महिषासूर' नसतो!


दोन पैशांच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलीचा सौदा करणारी स्त्री, 

तिच्या आयुष्याचा बाजार मांडणारी स्त्री... कधीच 'दुर्गा' नसते!


रक्ताचं नातं नसतानाही, ओळखदेख नसलेल्या मुलीच्या मदतीसाठी 

क्षणाचाही विचार न करता धावून जाणारा पुरुष... कधीच 'महिषासूर' नसतो!


स्वतः स्त्री म्हणून जन्माला येऊनही, 

आपल्याच पोटी मुलगी जन्माला येऊ नये, 

अशी इच्छा बाळगणारी स्त्री... 

तिच्यातल्या मातृत्वापेक्षा समाजाच्या विकृत विचारांना मोठं मानत असेल, 

तर तिला 'दुर्गा' कसं म्हणावं?


आणि एकुलती एक मुलगी असतानाही, 

तिलाच आपल्या वंशाचा दिवा मानून, तिच्या पंखांना बळ देणारा पुरुष... 

त्याला 'महिषासूर' तरी कसं म्हणावं?


कारण...


स्त्रीत्व म्हणजे नेहमीच पावित्र्य नसतं, आणि पुरुषत्व म्हणजे नेहमीच क्रौर्य नसतं!


कुणी चेहऱ्यावर देवत्वाचा मुखवटा घालून, माणुसकीचाच गळा घोटत असतं; 

तर कुणी जगाच्या नजरेत बदनाम असूनही, माणुसकीचं आभाळ आपल्या हृदयात जपत असतं...


देवपणाचा ठेका कुणा एका लिंगाकडे नाही, आणि दानवपणाचा शापही कुणा एकाच्या माथी नाही...


स्त्री असो वा पुरुष, मोठेपणा जन्माने मिळत नसतो; तो आपल्या कर्मातून सिद्ध करावा लागतो!


दुर्गा असणं ही स्त्रीची मक्तेदारी नाही, 

आणि महिषासूर असणं ही पुरुषाची नियती नाही; 

माणूस कोण आहे, हे त्याच्या लिंगावरून नाही... तर तो दुसऱ्या माणसाशी कसा वागतो, यावरून ठरत असतं!

— अव्यक्त अभिजीत



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या