Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

दाढीदीक्षित | Dadhidixit aka Beardo

 दाढीदीक्षित | Dadhidixit aka Beardo



गेल्या आठवड्यात गदिमांच्या "वाटेवरल्या सावल्या" वाचलं. खर तर त्यानंतरच मला पुन्हा एकदा लिखाण करायचं स्फुरण चढले. तर त्या पुस्तकात मी एक अनोखा शब्द वाचला "दाढीदीक्षित" . दाढीदीक्षित म्हणजे अर्थातच आधुनिक काळात " Beardo". 
मला तो शब्द भयानक आवडला. त्यातील यमक अलंकाराने असेल पण शब्द हटके वाटला. आणि मग मनात "केसकर्तन" बद्दल कायनुबायनु विचार येऊ लागले.

नर्तन आणि केसकर्तन हे मला खर तर खूप साम्य असल्यासारखे वाटतात. फक्त नर्तकात आणि केसकर्तकात कौशल्य ठासून भरलेलं पाहिजे. नर्तकात पद लालित्य हवं आणि केसकर्तकात हस्तलालित्य हवं.

माझ्या लहानपणी हेअरस्टाईल कशी ठेवायची याबद्दल काही चॉईस नव्हता. सरसकट बारीक केलेला गोलगोटा हा युनिव्हर्सल हेअरकट करणं यात गावच्या न्हाव्याचा हातखंडा होता. आम्ही शाळेतली पोरं  त्याला "नरेंद्र महाराज" कट म्हणत असू. पुढे आईने ब्युटी पार्लर खोलल्यावर  ५-६ वेळा आईनेच माझे आणि भावाचे केस कापून दिलेले.  असा बारीक केसांचा चमनगोटा करून गेलो की मित्रांचे हाथ आपसूकच शिवशिवायचे. दहावीला बोर्डाच्या परीक्षेच्या ओळखपत्रावर सुद्धा माझा असा चमन फोटो होता. 

कॉलेजला गेल्यावर मात्र मी तसे केस न कापण्याची शपथ घेतली होती. तेव्हाचे आमचे प्रेरणास्थान अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी सर्वच केस वाढवणारे. मग बळेच पुढचे केस मोठे ठेवून "अजय देवगण" वाला फील घेत होतो. नुकतीच फुटू लागली मिसरूड तेव्हा जीव की प्राण वाटू लागली होती. टीचभर मिशीला वळवण्याचा असफल प्रयत्न करत रहायचो. एवढं करून पण कॉलेजात एक पण पोरगी पटवू शकलो नाही हे माझं दुर्दैव की माझ्या दिसण्याची खासियत हे अजून कळलं नाही.

कॉलेज नंतर  कामासाठी चिपळूणला गेलो आणि मग ह्या केसकर्तन ह्या विषयावर माझं अनुभवा चे जग विस्ताराला लागले. पहिल्यांदा मी वेगळा हेअरकट कोणता ट्राय केला असेल तर तो "दिल चाहता है" मधला आमिर खान वाला कट. त्या दिवशी मला मी फार मॉडर्न असल्याचा फील आला. समाजाची ठरवून दिलेली चाकोरी मोडणाऱ्या बंडखोर तरुणाचा फील आला. 

तिथे "रॉयल पॅलेस" हॉटेल ला मी काम करायचो. हॉटेल मालकांचा भाऊ नाना आणि मेहुणा विवेक दोघे पण तिथे हॉटेल मॅनेज करायचे. दोघे पण माझे फार लाड करायचे. कारण तिथल्या स्टाफ मध्ये मी सर्वात लहान. बारावी करून लगेच कामाला लागलेला. ते दोघे पण दाढी वाले. पण "नाना" ची दाढी फुल्ल, लांब आणि "विवेक" ची दाढी फ्रेंच कट. तेव्हा मी बापडा किशोरवयीन , मी फार गोंधळून जायचो की मला भविष्यात कशी दाढी ठेवायची फुल्ल की फ्रेंच कट. 

पण कालांतराने जेव्हा दाढी बऱ्यापैकी वाढली तेव्हा मी पहिला फ्रेंच कटच मारला. त्याला ही कारण "अजय देवगन" च. कयामत सिनेमा मध्ये त्याने फ्रेंच कट मारला मग मी पण लगेच मारला. अजय देवगण चे काही फॅन्स मी असे पण पाहिलेत ज्यांनी पुढे केस छप्पर सारखे यावेत म्हणून कपाळा लागत चे चांगले केस वस्तर्याने काढून टाकलेत. हेअर स्टाईल च्या बाबतीत बॉलीवुड ला फॉलो करणे हे आपलं सर्वांचं कधीही न बदलणार सत्य आहे. 

नंतरच्या काळात माझ्या दाढीचा विकास माझ्या करिअर पेक्षा झपाट्याने झाला.  मी काही रेग्युलर शेव्ह करणारी व्यक्ती नाही. मुळात दाढी ठेवणे ह्या महान कलेचा शोध आळसातुन झाला असावा, मग ती दाढी रुबाबदार दिसू लागली आणि ती प्रथा पुढे प्रचलित झाली असावी असं मला वाटतं .

असो, मग माझ्या भरमसाठ वेगाने वाढणाऱ्या दाढी वर वेगवेगळे प्रयोग सुद्धा करून झाले. अगदी अभिनंदन कट पासून ते साऊथ च्या रजनीकांत पर्यंतचे कट मारून झाले. माझे काही सलून वाले मित्र फार इंटरेस्ट ने माझी वाट पाहायचे. त्यांना नवनविन प्रयोग करायला आयत खेती भेटायची. 

सध्या बहुतांश कारागीर हे उत्तर भारतीय असतात. पण मी माझ्या दाढीच्या सुरुवातीच्या काळात सर्व मराठी कारागिरांना भेटलो. आजकाल AC saloon, spa saloon ची चलती आहे. पण साध्या सलून मधल्या गप्पा या काही औरच असतात. बऱ्याच हिंदी चित्रपटातून हे सलून वाले पोलिसांचे खबरे का दाखवतात हे मला कळले. गप्पा मारता मारता तुमच्या मनातलं काढून घ्यायला ज्याला जमत तो खरा सलून वाला बाकी सर्व तोतये.

ह्या सलूनवाल्यांच वैशिष्ट्य म्हणजे मागच्या दाढी च्या वेळी तुम्ही काय बोलला होतात ते त्यांना पुढच्या दाढी पर्यंत लक्षात असतं. असच बोलता बोलता कधी तुम्हाला दाढी केसासोबत , क्लीनअप आणि फेशियल करायला भाग पाडतील ते कळणार पण नाही. 

बरं ह्यांच्याकडच गाण्याचं कलेक्शन म्हणजे दोन नंबर. एक नंबर च कलेक्शन असतं गावातल्या ट्रॅक्टरवाल्याकडे. सलून वाले ट्रॅक्टर वाल्यांना बिट नाही करू शकत पण काटे की टक्कर मात्र देऊ शकतात. मी अगदी येसुदास ची गाणी लावणारा सलून वाला पण पाहिलाय, कुमार सानू ची गाणी लावणारा आणि हनिसिंह ची लावणारा पण पाहिलाय

काही वर्षांपूर्वी सलून चा धंदा हा बिनभांडवली धंदा बोलला जायचा. 1 रुपयाचं ब्लेड , दोन कैची, 2 फणी आणि एक वस्तरा असला तरी सलून चालू करता यायचं. पण अचानक ह्या व्यवसायात खूप क्रांतिकारक बदल घडून आले. आणि पिंपळाच्या खाली बसणाऱ्या सलून वाल्या पासून आजच्या अत्याधुनिक फॅमिली स्पा सलून पर्यंत त्यांचं रूप बदललं. त्या प्रमाणे मग भांडवलही वाढलं असणार. शिवाय जुन्या काळात सलून च धंदा विशिष्ट जाती वाले करायचे पण आता आधुनिक काळात हा फरक सुद्धा मिटून गेला आहे.

मी पहिलं म्हटल्या प्रमाणे केशकर्तनात हस्त कौशल्याची, हस्त लालित्याची नितांत आवश्यकता असते. दाढी करताना वस्तरा चालवणारा हाथ हलका असावा लागतो. काही कारागीर अतिशय कुशलतेने असा वस्तरा फिरवतात की दाढी केलेली या गालाची त्या गालाला कळत नाही. पण जर हाथ जड असेल तर अगदी चामडी सोलल्या सारखी दाढी जळजळून निघते. केस कापताना ही काही कुशल कारागीर सफाईदारपणे कैची चालवतात. पण जर तो सराईत नसेल तर केस कैचीत चिमटुन चिमटुन जीव काढतात. आताशा ट्रिमर मुळे कारागिरांचे काम सोपे झाले आहे. एक नंबर, दोन नंबर की झिरो मशीन यावर सर्व अवलंबून असतं.

नेहमी दाढी ठेवणारा आपला एखादा मित्र गुळगुळीत करुन आला की तो मित्रांचा चेष्टेचा विषय ठरणारच. माझा एक मित्र क्लीन शेव्ह करून आला की मस्करित म्हणतो  "अरे जरा गोरा वाटतोय ना आता ".  खरंतर दाढी वाढवल्यामुळे माणूस matured वाटतो असं लोकांना वाटतं. पण ते धादांत खोटं आहे. माझे एक दाढी वाले मित्र "गुरव" अजून पण लहान मुला पेक्षा जास्त मस्ती करतात. आमच्या मित्रमंडळीत त्यांना " दाढीवाला छोटा मुलगा" म्हणतात किंवा मग " दत्तू मोरे" म्हणतात. माझे काही मित्र असे पण आहेत की पूर्ण वाढ झालेला "नर" असून पण दाढी च्या नावावर मस्करी म्हणून त्यांना देवाने मोजून 2-4 केस दिलेत, ते पण लांब लांब ! मी पण जेव्हा पहिल्यांदा गुळगुळीत दाढी केली अगदी मिशी सकट काढली होती तेव्हा मित्रांना सांगायचो की अरे सलून वाल्याने मिशीचा कट चुकवला म्हणून काढली. खर तर मला स्वतःलाच काढायची होती. पण आपण सामान्य माणसं समाजाची एवढी भीती बाळगतो कि आपल्या मनासारखं वागताना पण लोकांना घाबरून नको ती कारणं देत बसतो. 

दाढी वाढवून "दाढी दीक्षित" बनलेल्या पुरुषाला समाजात "दाढी", "दढीयल", "Beardo", "कबीर सिंग" " रॉकी भाय" "शिंदे सरकार", "बुवा" अशी एक ना अनेक टोपण नावे मिळतात. सध्या "दत्तू मोरे" हे नाव नवीन ॲड झाले आहे. 

तर दाढी वाढवून "दाढी दीक्षित" व्हायचे पण बरेच फायदे आहेत

१) दर 2 दिवसांनी दाढी करायचा खर्च आणि त्रास दोन्ही वाचतो.

2) गालाची त्वचा ऊन, वारा, पाऊस या पासून सुरक्षित राहते

3) लोकांना तुम्ही मॅच्युअर्ड वाटता ( जेव्हा की तुम्ही नसता) नव्या पिढीला कुल वाटता ( हे पण नसता तुम्ही).

4) लहान मुलांना दम द्यायला तुमचा उपयोग केला जातो. ( खरंतर हा तोटा म्हणायला हवा, लहान लहान निरागस मुलांना दम कशाला द्यायचा, पण काही जीव जाम डांबरट असतात, त्यांना दम द्यावाच लागतो)

5) उद्या कुठे काय लफडी झाली तर तुम्ही दाढी मिशी काढून टाकून तुमचा लूक चेंज करू शकता. 

6) तुम्हाला कबीर सिंग, रॉकी भाई अशी टोपण नाव मिळू शकतात. 

7) कोणी गालावर एखादी चमाट ठेऊन दिली तरी गाल लाल झालेला कोणाला समजत नाही. 

आता एवढं सगळं "दाढीदीक्षित" पुराण मी सांगितलं. दाढी ठेवायची की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. 

आणखी वाचा -: वारी आषाढी एकादशीची

- अव्यक्त अभिजित

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या