Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

माझा लाडका गणपतीबाप्पा | Maza Ladka Ganpati Bappa

 


|| माझा लाडका गणपतीबाप्पा ||

आपल्या भारतात, हिंदू संस्कृतीत असंख्य देव आहेत. सृष्टीतल्या जवळपास सर्व तत्वांची एक एक देवता आहे. प्रकृतीतल्या हरेक तत्वांना सामावून घेणाऱ्या ह्या सर्व देवतांमध्ये एक देव असा आहे जो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना प्रिय आहे, उत्तर खूप सोप्प आहे, आपला "सर्वांचा लाडका गणपती बाप्पा" !

सर्व विघ्नाचा नाश करणारा “विघ्नहर्ता”, भक्तांना सर्व सुख प्रदान करणारा “सुखकर्ता”, सर्वांना आनंद देणारा देव म्हणजे "गणपती बाप्पा". चौदा विद्या, चौसष्ट कलांचा स्वामी म्हणजे बाप्पा. सर्व गणांचा अधिपती म्हणजे आपला गणपती. कोणत्याही शुभकार्यात प्रथम मान गणेश पूजनाचा. त्याच्या पुजनाशिवाय तुमचे कोणतेही शुभकार्य फळाला जात नाही.

गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही सांगा. त्याचे रूप किती मोहक. गजमुखी मस्तक, मोठ्ठाले दोंद, मोठ्ठे मोठे कान, इवलेसे डोळे, मस्त झुलनारी सोंड किती मोहक वाटते. लहान मुलं तर बाप्पाची दिवानी असतात. अर्थात त्याला कारण बाल गणेश, माय फ्रेंड गणेशा असे एनिमेशनपट असतील. पण माझ्या लहानपणी असे चित्रपट, किंवा कार्टून आले नव्हते. तरीही बाप्पा बद्दल प्रचंड आकर्षण होते. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता त्यामुळे त्याची प्रार्थना केली की आपण हुशार होऊ असा एक बाळबोध समज मनात होता. शिवाय आपल्या पुराणातल्या सुरस अश्या अनेक गणेश कथांनी माझ्या बालमनाला गणेशाच्या प्रेमात पाडलं. केवळ आईच्या आज्ञेसाठी आपल मस्तक उडवून घेणारा "मातृभक्त" गणपती बाप्पा माझ्या हृदयात खोल रुजला. गणेशभक्ती कोवळ्या वयातच अंगात रुजली ती आजतागायत कायम आहे.

बाप्पा खूप आवडायचं अजून एक कारण म्हणजे "गणेशोत्सव". मी मूळचा चिपळूण तालुक्यातल्या "कुटरे" गावचा. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा म्हणजे जीव की प्राण. जगातल्या अनंत अडचणींवर मात करून कोकणातला चाकरमानी ह्या दोन सणाना गावाला जाणार म्हणजे जाणार. मग जगबुडी होऊ दे नाहीतर जागतिक महायुद्ध होऊ दे. कोरोना सारख्या जागतिक महामारीत सुद्धा आमच्या कोकणी बांधवांनी गणेशोत्सव साजरा केलाच. तुम्हाला खरे गणेशोत्सव आणि शिमगा पाहायचे असतील तर आवर्जून ह्या दिवसात एकदा कोकणात जा. अर्थात तुम्हाला रेल्वे च कन्फर्म तिकीट मिळाले तर ! कारण गणपती आणि शिमग्याला तिकीट मिळणं म्हणजे तुमच्या मागच्या बारा पिढ्यांनी काहीतरी मोठ्ठं पुण्यकर्म केले असल पाहिजे.

तर असा हा कोकणाला जीव की प्राण असलेला गणेशोत्सव सणामुळे मला बाप्पाची जास्त ओढ लागली. आपल्या घरी पाहुणा आला कि आपण त्याची किती उठाठेव करतो. हिथे तर चक्क देव आपल्याकडे पाहुणा येतो मग त्याच्या साठी किती तळमळीने आपण व्यवस्था करणार विचार करा. चक्क गणपती बाप्पा आपल्या घरी राहायला येतो ही भावनाच कित्ती रोमांचक आहे. भले तो दीड दिवस, पाच दिवस येवो की दहा दिवस येवो. माझ्या लहानपणी आम्ही आमच्या घरी गणपती आणत नसायचो. मग मी गणपतीला माझ्या आजोळी धूम ठोकायचो. माझं आजोळ "कारुळ" ला , गुहागर तालुक्यात!. माझा मामा म्हणजे एक इरसाल नमुना. स्वभावाने इरसाल पण कलेने अवलिया. त्याची चित्रकला अद्भुत होती. बसल्या बसल्या बॉलपेन ने सुद्धा तो कोणाचं ही चित्र सहज काढायचा. तोंड एक नंबर फटकळ. आम्हा भाच्यांना तो खूप पिडायचा. त्याचा तो हक्कच होता म्हणा. पण प्रेम सुद्धा खूप करायचा. तर अश्या या अतरंगी मामा सोबत माझी ड्युटी फिक्स होती. गणपती यायच्या आदल्या दिवशी पूर्ण रात्र जागून आम्ही डेकोरेशन करायचो.

"तुम्ही कितीही ठरवा, कितीही हातपाय मारा. पण गणपती डेकोरेशन हे आदल्या रात्रीच पूर्ण होते हा अलिखित शास्वत नियम आहे."

मग रात्रभर जागून , काळ्या चहावर काळा चहा ढोसून ढोसून आम्ही सजावट पूर्ण करायचो. कधी गोणपटाचे डोंगर दाखवायचो, त्यावर थोड धान्य टाकायचं म्हणजे दोन दिवसांनी त्याचे कोंब येतात आणि डोंगरावर झाडी तयार होते. कधी थर्माकोलचा मकर बनवायचो. त्याला माझ्या मामाच्या अभिनव चित्रकलेने इतकं सुंदर रूप यायचं की गणपतीच्या पाया पडायला येणारे भारावून जात. कधी कधी अस वाटायचं की त्या सजावटी मध्ये बसल्यावर आमचा गणपती बाप्पा पहिल्यापेक्षा जास्त खुशीने गालातल्या गालात हसतोय. एक वर्ष माझ्या मामाने आणि त्याच्या मित्रांनी मिळून फॅन ची मोटार वापरून फिरता मखर बनवला होता. त्या मखरात कृष्णरुपी निळ्या रंगाची बासरी वाजवणारी गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान होती. ती सजावट , ती गणेशमूर्ती इतक्या वर्ष नंतर सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. माझ्या मामाच्या आठवणीने सहज मग डोळे भरून येतात.

असो आपल्या आयुष्यात असे खूप व्यक्ती डोळ्यात पाणी ठेवून जातात. पण मनाच्या कोपऱ्यात ती सदैव वास्तव करत असतात. तर एवढी सजावट केल्यावर, त्यात विराजमान बाप्पाची मूर्ती पाहिली की मन प्रसन्न व्हायचं. वाटायचं की बाप्पा सदैव असाच आपल्या घरी विराजमान रहावा.  मग पुढचे पाच - सात दिवस अगदी मंतरल्या सारखे असायचे. गावाला वाडीतल्या प्रत्येक घरात आम्ही आरतीला जायचो. काही काही गावात जिथे मोठ्या मोठ्या वाड्या आहेत तिथे हा आरतीचा कार्यक्रम अगदी 2 - 3 तास चालतो. मला लहानपणी खूप इच्छा होती की आरतीला नाल वाजवायला मिळावी. वाजवता यावं. आजतागायत मला नाल वाजवायला जमलं नाही.  आजोळी रात्री जाखडी नाच असायचा. "गणा धाव रे" च्या तालावर आम्ही रात्रभर नाच नाच नाचायचो. स्त्रियांचे पण नाच असायचे. गणपतीचे दहा दिवस अख्खा गाव रात्री पण जागा असायचा.

आमच्या गावाला पण आरती खूप घुमवायचे. प्रत्येक घरात नेहमीच्या गणपतीची, शंकराची, देवीची, विठ्ठलाची, आरती झाली की मग एक दोन नवीन वेगळ्या चालीच्या आरत्या घ्यायचो. आरतीला गेल्यावर आधी लक्ष बाप्पासमोर ठेवलेल्या प्रसादावर असायचं. आरती नंतर कोणता प्रसाद भेटणार हे त्यावरून कळायचं. एखाद्या यजमान्याची मस्करी करण्यासाठी त्याच्या घरची आरती मुद्दाम मोठी घ्यायची. जेणेकरून तापलेल्या तामनाचे चटके बसून त्याने रुमाल मागावा. मग सगळे खुदुखुदू गालात हसायचे.

रात्री भजनाला, नाचाला गेल्यावर वाडीतल्या लोकांच्या वेलीवरच्या काकड्या चोरणे हा कोकणाचा राष्ट्रीय खेळ आहे. त्या काकडीच्या मालकाने स्वतःहून काकड्या काढून खायला दिल्या तर मज्जा येत नाही. पण चोरून खाल्लेल्या काकडीला एक जगावेगळी रुचकर चव असते. अश्याच काकडी चोरीच्या क्षणी जर घरमालकाला समजलं आणि बॅटरी घेऊन तो ओरडत बाहेर आला तर आम्हा मित्रांची जी धावपळ उडायची ती मजेदार असायची. एकदा असाच चोरीचा कार्यक्रम चालू असताना मालक शिव्या देत बाहेर आला आणि पळता पळता माझा एक मित्र शेणकीत पडला. शेणकी म्हणजे गुरांचे शेण एका खड्ड्यात जमा करून ठेवतात ती जागा. तो शेणकीत पडला आणि आम्हा मुलांची हसून हसून मुरकुंडी वळली.

आमच्या गावाला आम्ही गणपती जागरण करण्यासाठी "पट" खेळात असू. आमच्या वाडीत दोन "राजेशिर्के" यांची घरे आहेत. त्यांच्याकडे "पट" होता. "पट" म्हणजे पूर्वीच्या काळातील "द्युत". कवड्या टाकून सोंगट्या चालवायच्या. कौरव पांडव यांच्या मध्ये जो खेळ खेळला गेला होता. ज्यात पांडव आपले सर्वस्व हरले तो खेळ. अर्थात आम्ही काही पणाला लावून नाही खेळायचो. पण धमाल यायची. दर दिवशी वाडीतल्या एका घरात हा "पट" लागायचा. आणि रात्री वेगवेगळ्या खमंग पदार्थांचा नाष्टा असायचा. सोबत काळा चहा ! तो सगळा माहोल केवळ अवर्णनीय !

गणपती विसर्जनाला डोक्यावर गणपती घेऊन एका रांगेत निघालेले गणपती पाहिले कि कोकणातली शिस्त लक्षात येते. रस्त्यात चोंढ्यात मध्येच थांबून रपरपीत चिखलात "बाल्या" नाच केलेली कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच.

गणपती बाप्पा जगाला आनंद देत असतो म्हणतात ते म्हणूनच . त्याच्या आगमनाने आमचे विश्व आनंदाने, चैतन्याने बहरून जाते. मला नेहमी वाटायचं की बाप्पाशी शांत एकटं बसून गप्पा माराव्यात. जेव्हा मी २०१६ मध्ये माझ्या घरी गणपती बाप्पा आणला त्या रात्री मी ती इच्छा पूर्ण केली. 

सर्व जण जागरण करून उत्तररात्री पेंगुळले. मी बाप्पाच्या समोर जाऊन बसलो. बाकी सर्व लाइट्स बंद करून बाप्पा समोर चा मंद फोकस आणि शांत पणे तेवत असलेल्या समई च्या प्रकाशात बाप्पा खूप गोड दिसत होता. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर वाटलं की त्याला ही माझ्याशी गप्पा मारायची आतुरता होती. का माहीत नाही पण माझ्या डोळ्यात पाणी तरळल. 

बाप्पा म्हणाला " अरे वेड्या रडू नकोस , मी आलोय ना आता तुझ्या घरी . सर्व ठीक करेन मी. " 

मी म्हणालो " रडत नाही रे बाप्पा , तुज्याशी गप्पा मारायची इच्छा होती , ती आज

पुरी झाली , मग मनातला आनंद डोळ्यावाटे बाहेर येत होता. "

..मग आम्ही सुखदुःखाच्या खूप गप्पा मारल्या. तेव्हा पासून दरवर्षी मी न चुकता माझ्या बाप्पाशी गप्पा मारतो. त्याला माझे प्लॅन सांगतो. त्याच्याकडे शक्ती मागतो. आणि तो सुद्धा मला सर्वकाही देतो. न मागितलेले सुद्धा ! 

आणखी वाचा -: रक्षाबंधन | Raksha Bandhan

मला कळत नाही की बाप्पा माझा लाडका आहे की मी बाप्पा चा लाडका आहे. . .

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या