15 ऑगस्ट स्वातंत्रदिवस
आजचे प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षक वृंद , आणि माझ्या बालमित्रांनो ,
आज १५ ऑगस्ट , भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वाढदिवस.
आज आपण गर्वाने सांगतो " सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा". पण तब्बल दोनशे वर्षापूर्वी अशी परिस्थीती नव्हती. सन १७५७ मध्ये व्यापाराच्या बहाण्याने ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिश कंपनी भारतात आली. हिथल्या जमिनीवर व्यापार करता करता ब्रिटिशांनी हिथली परिस्थिती जाणली. लोकांमध्ये एकी नाही, भेदभाव आहेत, स्थानिक राज्यकर्ते एकमेकांशी भांडणात गुंतले होते. ब्रिटिशांनी ह्या गोष्टीचा फायदा उचलला आणि हळू हळू आपलं सैनिकी बळ वाढवायला सुरू केले. अठराव्या शतकात इंग्रजांनी प्लासी ची लढाई जिंकली. त्यानंतर त्यांनी बक्सर ची लढाई जिंकली. टिपू सुलतानाला पराभव करत इंग्रजांनी दक्षिण भारत ताब्यात घेतला. त्यानंतर मराठा साम्राज्य आणि पंजाब चा पराभव करत इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतला. आणि बघता बघता इंग्रज हिथले राज्यकर्ते बनले.
इंग्रज सत्तेत आल्यावर आपल्या भारतीय जनतेवर खूप जुलूम चालू केले. लोकांवर अन्याय अत्याचार चालू केले. काही भारतीय राज्यकर्ते इंग्रजांचे मांडलिक झाले. ते सुध्धा गद्दार होऊन इंग्रजांना आपल्याच लोकांविरुद्ध मदत करू लागले.
पण पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच. तस्संच घडलं आणि १८५७ मध्ये लोकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. इंग्रजांच्या सैन्यात असलेल्या भारतीय सैनिकांच्या धार्मिक भावना इंग्रजांनी दुखावल्या. मंगल पांडे ह्या सैनिकाने भारतीय जनतेच्या असंतोषाला वाचा फोडली. १८५७ चा उठाव हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिला अंक होता. भारतीय जनता आक्रमक झाली आणि इंग्रजां विरुद्ध लढ्याची सुरुवात झाली. इंग्रजांनी मंगल पांडे यांना तोफेच्या तोंडी दिले. उठाव दडपण्यासाठी सर्व बळ वापरले. उठाव दडपला पण भारतीयांची स्वातंत्र्याची भावना प्रबळ झाली. शेकडो क्रांतिकारी वीरांच्या बलिदानाने राष्ट्रप्रेम जागृत झाले. मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी देशासाठी आपले प्राण दिले. सैनिक, कामगार आणि शेतकरी यांनी ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न केले.
त्यानंतर "लाल बाल पाल" म्हणजे लाला लजपतराय, लोकमान्य टिळक आणि बंकिमचंद्र पाल यांनी स्वराज्याची मोहीम तीव्र केली. टिळकांनी आपल्या अग्रलेखातून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले.
नंतरच्या काळात महात्मा गांधीजींनी ह्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्या अहिसंक आंदोलनांनी स्वातंत्र्य लढ्याला अजून बळ दिले. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, यांनी इंग्रजांवर हल्लाबोल केला. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू कोवळ्या वयात भारतभूमी साठी हसत हसत फासावर गेले. स्वातंत्रवीर विनायक सावरकर, सुभाषचंद्र बोस ह्यांनी आपल्या जहाल पद्धतीने इंग्रजांच्या नाकीनऊ आणले. सुभाषचंद्र बोस यांनी तर आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांशी युद्ध पुकारले.
इंग्रज सरकार त्यानंतर खूप आक्रमक झाले. क्रांतिकारकांना पकडुन फाशी देऊ लागले. चकमकीत क्रांतिकारकांना ठार मारू लागले. पण भारतीय जनता स्वातंत्र्याच्या विचारांनी भारावून गेली होती. "एकच तारा समोर आणि पायतळी अंधार" अशी सर्वांची परिस्थिती होती. गुलामगिरी चे साखळदंड तोडण्यासाठी जनतेच्या अंगी बारा हत्तींचे बळ आले होते. गुलामगिरीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून स्वातंत्र्याच्या आकाशात त्यांना मुक्त उडायचे होते. सविनय कायदेभंग, चले जाव अश्या आंदोलनातून भारताचा स्वातंत्र्य लढा प्रखर होत गेला. कित्येक लोकांनी आपल्या परिवाराची, घराची पर्वा न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आपला जीव आपल्या भारतभूमी साठी खर्च करताना त्यांनी किंचितही विचार केला नाही.
अखेर भारताच्या ह्या प्रखर स्वातंत्र्य लढ्यापुढे ब्रिटिशांनी गुडघे टेकले. २० फेब्रुवारी १९४७ ला ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा केली. आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लालकिल्ल्यावरून पहिले भाषण केले आणि सर्व जनतेला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या.
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो आहे हे कित्येक दिवसांच्या लढ्याच फळ आहे. आपल्या स्वांतत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. हे स्वातंत्र्य टिकवणे हे आपल्या हातात आहे. आपला देश महान कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. त्या साठी आपल्याला फार काही कष्ट घ्यायचे नाही आहेत. त्या साठी आपण विद्यार्थ्यांनी देशावर प्रेम केले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कोणीही घाण केली नाही तरच आपल्या देशाचं सौंदर्य टिकून राहील. आपण खूप शिकून देशाची सेवा केली पाहिजे. वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य मिळवून देशाचं नाव मोठं केलं पाहिजे. राष्ट्रीय झेंड्याचा कधीही अपमान नाही केला पाहिजे. ह्या झेंड्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे.
जर आपण सर्वांनी असे वागायची शपथ घेतली तरच आपण अभिमानाने म्हणू शकू " सारे जहाँ से अच्छा , हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी, ये है गुलसिता हमारा "
जय हिंद
जय महाराष्ट्र!
0 टिप्पण्या