Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज - लहान मुलांसाठी शिवजयंती निमित्त पोवाडा / Shivaji Maharaj Powada for Kids

 


छत्रपती शिवाजी महाराज - लहान मुलांसाठी शिवजयंती निमित्त पोवाडा  


१९ फेब्रुवारी रोजी सर्व जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार साजरी केली जाते. अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व हिंदूंचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची जयंती म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी सण आहे. त्यानिमित्ताने आमच्या लहान मित्रांसाठी सादर करता यावा असा पोवाडा खाली देत आहोत. 

महाराजांची काय थोरवी ....
महाराजांची काय थोरवी
ऐसा राजा नसे भू वरी 
स्वराज्याचा झेंडा फडकवी
वेळू नेला गगनावरी ...
गाजली भगव्याची शिवशाही जी हो जी||

शिवरायांनी स्वराज उभारले .. 
रयतेला सुखी केले. 
पण त्या अगोदर रयतेची हालत कशी होती ?
पाची पातशाह्यांच्या जुलमाने रयत त्रासलेली होती..
 देवधर्माची नासाडी झाली होती.. 
आयाबहिनांची इज्जत धोक्यात आली होती. 
जुलमाच्या अंधारात रयत भरडली जात होती. 
ह्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी
राजमाता जिजाऊंच्या पोटी.. 
शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी तारा जन्मला.. 
शिवशंभू चा अवतार प्रकटला ..

घेई शिवशंभू अवतार 
धगधगता जणू अंगार 
हाती घेऊन भवानी तलवार 
करी दुर्जनांचा संहार जी हो जी ||

महाराजांनी दुर्जनांचा संहार केला. महाराजांचा पराक्रम तरी काय वर्णावा , वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. मग्रूर सत्तेच्या उरत धडकी भरवली. महाराजांचा पराक्रम कसा होता ...
पाची पातशाह गाडले..
शाहिस्त्याची बोटे छाटले..
सुरतेचे वैभव मिळविले ..
गनिमी काव्याने झुंजविले 
अफजल खानाला उभे फाडीले.. जी हो जी || 

महाराजांच्या पराक्रमाला साथ होती मावळ्यांची, त्यांच्या मित्रांची, त्यांच्या आऊसाहेबांची ... स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आई साहेब. 
धन्य धन्य जिजाऊ माउली 
तिची स्वराज्यास सावली 
धन्य थोर वीर मावळे 
स्वराज्यास रक्त सांडले 
गर्जती सह्याद्रीचे कडे ।। जी हो जी ।।

अश्या महापराक्रमी महाराजांचे, प्रजाहितदक्ष जाणत्या राजाचे स्मरण करू तेवढे कमीच.
महाराजांचे करू स्मरण 
त्यांच्या चरणासी वंदन 
आपण घेऊ त्यांची शिकवण 
करू स्वराज्याचे रक्षण 
वाढवू महाराष्ट्राची शान ।। जी हो जी ।।

रचनाकार - अव्यक्त अभिजीत

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या