गाव कधी ओसाड झालं कळलंच नाही
बघता बघता गाव कधी ओसाड झालं कळलंच नाही. ह्यावर्षी पालखीला गावी गेलो तेव्हा जाणवलं . कोकणात गणपती आणि होळी शिमग्याला गजबज असते. ट्रेन तुडुंब भरून लोक गावी जातात. गणपती झाले , शिमगा झाला , पालखी झाली कि परत आपल्या कामाच्या जागी मुंबई पुण्याला परततात. मग गावात राहतात घरातली म्हातारी माणसं. परत आपली माणसं येण्याची वाट बघत.
सुट्टी सोडून मध्येच कधी गावाला गेलो कि रस्तावर चिटपाखरू सुद्धा नसत. शेती पण करायची सोडली लोकांनी. जमीन च्या जमीन ओसाड पडली आहे. रानटी गवत वाढलेली. कवल तोडलेली बोडकी झाडं तशीच बोडकी झालेली गावं.
आम्ही गावाला शाळेत होतो तेव्हा दहावीला आमच्या हायस्कुल ला ४० -५० पट अश्या दोन तुकड्या होत्या दहावीच्या. आता अख्या शाळेत ३०-३५ मुलं आहेत. सावर्डे चिपळूण सारखी थोडी शहरीकरण झालेल्या गावात इंग्लिश मिडीयम शाळा उभ्या राहिल्या आणि गावातल्या मराठी शाळेकडे आहेत त्या लोकांनी पण पाठ फिरवली. आमचं तरी काय , आम्ही शिकलो , कामाला मुंबई पुणे गाठलं. हिकडे घर घेतलं , संसार थाटला . मुलांना हिकडेच शाळेत घातलं. आणि आता आम्हीच शाळेत पट नाही म्हणून गळा काढतोय.
शहरी झगमगाटाची सवय झाली कि मग गाव फक्त सुट्टीसाठी चांगला वाटायला लागतो. गावाला चांगल्या पगाराची नोकरी नाही. कोकणात शेतीला म्हणावं तस उत्पन्न नाही. मग कोकणातली गाव हि अशीच ओस पडत जाणार. गावात राहणार वयस्कर लोकांना मुबईच जीवन नको वाटत म्हणून ती मुलांकडे राहायला येत नाहीत त्यामुळे निदान गावात थोडीतरी माणसं शिल्लक आहेत. पण अगदी अडचणीच्या वेळी धावाधाव करायची तरी मुंबई पुण्यातून गावाला जायला ६-७ तास लागणार. कोकणात कोणत मोठं हॉस्पिटल नाही की मोठ्या आजाराचे उपचार तिथे होतील. अगदी रत्नागिरी सारख्या जिल्हाच्या ठिकाणी सुद्धा भरवश्याचं हॉस्पिटल नाही. अनुस सिरियस झाला तर त्याला मुंबई नाहीतर कोल्हापूरला हलवायला लागत. गावात राहिलेत त्यांना वाटत कि हे स्वतः शहरात गेलेत, वर्षभर मज्जा मारतात आणि गावाला आले कि आम्हाला गावाचं शहाणपण शिकवतात.
गावातल्या मुलींना पण लग्नासाठी असा मुलगा हवा जो मुंबई पुण्यात सेटल आहे. मुंबईत स्वतःच घर पाहिजे. हि मानसिकता कधी आणि कुठून वाढू लागली ह्याच उत्तर नाही कोणाकडे.
ह्यामध्ये चूक कोणाची हे कोणालाच सांगता येणार नाही. आणि ह्यावर उपाय काय तेही कोणाला सांगता येणार नाही. पण कोकणातली गावे ओसाड पडत आहेत हे ढळढळीत सत्य आहे जे कोणी नाकारू शकत नाही.
- अव्यक्त अभिजीत
Quote : “We never realized when our village slowly faded away.”


0 टिप्पण्या