सोन्यासारखी चमकणारी सोनाली
कल्याण - शिळफाटा रोड वरून प्रवास करताना दररोज एक सुखद क्षण अनुभवायला येतो. देसाई गाव च्या जवळ एका भल्यामोठ्या होर्डिंग वर "पु. ना. गाडगीळ ज्वेल्सर्स" ची जाहिरात आहे. सोनाली बेंद्रेचा भला मोठा अतिशय सुंदर मोहक फोटो आहे . गडद गुलाबी रंगाची साडी , केसांवर किंचित सोनेरी छटा , तसाच साधा सिम्पल सोनेरी मेकअप , चेहऱ्यावर एक ग्रेस आहे. त्यावर "पु. ना. गाडगीळ " चे नक्षीदार दागिने घातले आहेत. अतिशय लोभसवाणं रूप दिसतंय सोनालीचे. सकाळी कामावर जाताना ती जाहिरात पहिली कि काही वेळासाठी मन प्रसन्न होऊन जातं.
मग सहजच सोनालीची ९० च्या दशकातली " तुम हुस्न परी , तु जाने जहाँ " हि सौन्दर्य साबुन निरमा ची ऍड आठवते. मग " जो हाल दिल का " हे सरफरोश मधले गाणं ओठांवर येत. "हम साथ साथ है " मधली सोनाली बेंद्रे म्हणजे जबरदस्त cute होती. तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी संयत आणि सोज्वळ भूमिका होती ती. तेव्हा जर आता सारखी सोशलमीडिया असती तर दिव्या भारती, माधुरी आणि सोनाली चे फॉलोवर्स सर्वात जास्त असते. सोनाली ची बॉलीवूड मध्ये एन्ट्री "स्टारडस्ट" मॅगजीन च्या टॅलेंट हंट मधून झाली होती. १९९६ ला जेव्हा मायकल जॅक्सन मुंबईत आला होता तेव्हा त्याचे स्वागत राज साहेब ठाकरे आणि सोनालीने केले होते. मस्त भगव्या रंगाची नऊवारी साडी , नाकात नथ आणि केसांच्या अंबाडावर मोगऱ्याचा गजरा . अस्सल मराठमोळा लुक होता.
सोनालीचा बऱ्याच जणांना माहित नसलेला एक गुण म्हणजे ती उत्तम वाचक आहे. तिचा स्वतःचा " सोनाली'ज बुक क्लब " आहे. बॉलिवूड मध्ये बुक क्लब कॉमन होण्याआधीच तिने स्वतःची वाचक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तिने " The Modern Gurukul " हे पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. ज्यात तिने मॉडर्न पॅरेंटिंग बद्दल लिहिलंय , आई म्हणून तिचे अनुभव आणि चॅलेंजेस त्या पुस्तकात मांडलेत . अजून एक पुस्तक आहे तिचं " द बुक ऑफ बुकस " (The Book of Books ) ज्यात तिने वाचन संस्कृती बद्दल लिहिलंय.
२०१८ मध्ये सोनालीला कँसर च निदान झालं.
केमोने सोनालीचे केस गेले,
पण तिचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही.
स्टेज ४ कॅन्सरचे निदान झाले,
पण तिने स्वतःला जगापासून लपवले नाही.
उलट, खरे धैर्य म्हणजे काय हे तिने जगाला दाखवून दिले.
तिचे केस गेलेले फोटो अनेक स्त्रियांसाठी धैर्याचे प्रतीक बनले.
त्या कठीण काळात सुद्धया तिला तिच्या वाचनाच्या आवडीने हाथ दिला.
तिने उपचारांचे कठीण दिवस, हॉस्पिटलमधील क्षण, मनातील भीती, डोळ्यांतील अश्रू आणि आशेचा किरण — हे सर्व जगासमोर प्रामाणिकपणे मांडले.
कारण ती निर्भय होती म्हणून नाही,
तर तिची कहाणी कोणाच्या तरी अंधारलेल्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवू शकते याची तिला जाणीव होती.
कॅन्सरवर मात करणारे अनेक असतात,
पण संकटांना सन्मानाने, हसतमुखाने आणि जिद्दीने (gracefully) सामोरे कसे जायचे हे लाखो लोकांना शिकवणारे फारच थोडे असतात.
सोनाली बेंद्रेची सर्वात मोठी भूमिका पडद्यावर नव्हती.
ती होती आयुष्याने खचवण्याचा प्रयत्न केला तरी न खचता उभे राहण्याची.
म्हणूनच तिची कहाणी केवळ बॉलिवूडपुरती मर्यादित नाही,
तर ती लाखो लोकांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.
लोक सोनाली बेंद्रेला तिच्या सौंदर्यासाठी आणि ९० च्या दशकातील गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखतात. पण मला सर्वात जास्त प्रेरणा देते ती पडद्यामागची सोनाली.
वाचनाची आवड असलेली एक उत्साही वाचक, लेखिका, आई आणि कॅन्सरशी धैर्याने लढणारी योद्धा—जिने मौन बाळगण्याऐवजी धैर्याचा मार्ग निवडला. तिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळांपैकी एक काळ लाखो लोकांसाठी आशेचा आदर्श बनवला.
मुंबईत मायकेल जॅक्सनचे स्वागत करण्यापासून ते आपल्या बुक क्लबच्या माध्यमातून पुस्तकप्रेमींचा समुदाय उभारण्यापर्यंत, सोनालीचा प्रवास नेहमीच सौजन्य, प्रगती आणि जिद्दीचा राहिला आहे.
काही स्टार्स प्रसिद्धीमुळे चमकतात, तर काही आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे. सोनाली बेंद्रे ही निर्विवाद दुसऱ्या प्रकारातील स्टार आहे.
- अव्यक्त अभिजीत




0 टिप्पण्या