"आत्मसन्मानापेक्षा मोठं काही नाही जगात ! तो जपा !"
"Nothing Is Greater Than Self-Respect. Never Compromise!"
काही लोक विक्षिप्त स्वभावाचे धनी असतात. वयाच्या उमेदीच्या काळात ताकद आणि पैसा ह्यामुळे रगेल आणि अडेलपणे वागतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्पयावर त्यांना ह्या कर्माची फळं मिळूनही उतारवयात त्याच्या हाच विक्षिप्तपणा कायम असेल तर त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुटुंबियांवर त्याचा फार परिणाम होत असतो. विशेषतः स्त्रियांना ह्याचा फार त्रास होत राहतो.
खरतर स्त्रियांवर हाथ उचलणे , त्यांना शिवीगाळ करणे हे "नामर्दपणा"चे वागणे त्या लोकांना "मर्दपणा"चे लक्षण वाटते. ज्या लोकांना स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नसतो ते लोक स्त्रियांवर आपले वर्चस्व दाखवायचा नेहमी प्रयत्न करत असतात. कारण त्यांच्या साठी त्या सॉफ्ट टार्गेट असतात. घराबाहेच्या भांडणाचा राग घातल्या लक्ष्मी वर काढायचे फॅड आपल्या कडे फार पूर्वीपासून आहे.
ह्या मध्ये थोडीफार चूक त्या स्त्रियांची पण आहे असं मला वाटत. खरं तर हि चूक नाही त्यांची पण म्हणून शकत. चूक आहे आमच्या समाजाच्या संस्कारांची, चालीरीतींची आणि शिकवणुकीची. "बदनामी" ची भीती नेहमी स्त्रियांना दाखवली गेली आहे. पुरुषांना नाही. ह्या बदनामीच्या भीतीखाली कित्येक स्त्रिया अश्या खोकल्या मर्द बनून फिरणाऱ्या पुरुषांचे अन्याय सहन करत राहतात. "लोक काय बोलतील" ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या रोगाला त्या बळी पडतात. आणि त्याच्या ह्या मानसिक दुर्बलतेचा फायदा उचलतात विक्षिप्त मानसिकतेचे पुरुष.
ज्या दिवशी ती स्त्री "खड्ड्यात गेले लोक " हा विचार करेल त्या दिवशी त्या विक्षिप्त माणसांची अर्धी ताकद नष्ट होईल. बदनामी माझी होईल तर बदनामी तुझी पण होईल असं जेव्हा त्या पुरुषला ठणकावून सांगतील तेव्हा त्या उसनं आणलेल्या मर्दपणाचा फुगा फुटून आतला नामर्दपणा बाहेर येईल. तो चार कानाखाली मारेल ते तुम्ही सहन कराल पण तुमच्या एका थापडीत त्याला चंद्र तारे दिसतील नक्कीच.
सगळं खेळ मानण्याचा आहे , स्वतःवरच्या विश्वासाचा आहे. आत्मसन्मानाचा आहे. लोक म्हणतात कि वरती गेल्यावर पाप आणि पुण्याचा हिशोब द्यावा लागतो. मला वाटत कि वरती गेल्यावर आत्मसन्मान , स्वाभिमान जपण्यासाठी आपण काय केलं ह्याचा पण हिशोब द्यावा लागतो. तुम्ही स्वतःच जर स्वतःच्या स्वाभिमानासाठी आत्मसन्मानासाठी काही करत नसाल तर दुसरा कोणी येऊन तुमचा आत्मसन्मान कशाला जपेल ?
आत्मसन्मानापेक्षा मोठं काही नाही जगात ! तो जपा .
- अव्यक्त अभिजीत
अजून वाचा : स्वतःवरचा प्रेमाच्या शोधात - The art of self Love

0 टिप्पण्या