हंबीर राव , ताराराणी आणि मी
रविवारची दुपार. उन्हं वर चढली होती आणि वातावरण थोडस आळशी झालेलं. सौभाग्यवती एका बारशाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या. आमचं कन्यारत्न मोबाईल वर काहीतरी फुटकळ यू ट्यूब शॉर्ट बघत बसलेली. मी हॉट स्टार वर " सरसेनापती हंबीरराव" लावून बसलेलो. कन्येला लागली भूक तिने कायनुबायनु खायला मागितलं. मी म्हटलं आता जेवूनच घेवूया. सौभाग्यवती ना फोन केला आणि ती बारश्या वरूनच जेवून येणार म्हटल्यावर आम्हाला जेवण करणे क्रमप्राप्त होते.
मस्त मटण , चपाती आणि भाताचा बेत होता. कन्येचे आणि माझे ताट वाढून घेतले. आमच्या कन्येचे आणि जेवणाचे राऊत - भाजप येवढे घनिष्ट संबंध आहेत. जेवण दिसले की तोंड मुरडायचा तिचा जन्मसिध्द हक्क आहे. त्यात आज तिच्या आईसाहेब घरी नसल्याने जेवण भरवायची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्या शिरावर आली होती. टिव्हीवर सरसेनापती रंगात आले होते. हंबीरराव हे मोहिते आडनाव मुळे आमच्या मोहिते खानदान चे पूर्वज असल्याचे माझ्या मनात खोल खोल रुतत चालेल होते.
ताराराणी आणि हंबिर रावांचा बाप लेकीचा प्रसंग चालू होता. हंबीरराव ताराराणी ना हादगा सोडून मैदानात सरावासाठी यायला बजावतात. आपल्या पत्नीला मूलीना कणखर बनवणे किती जरुरी आहे हे सांगतात. त्या दृश्यात मी हरवून जात होतो. मनात खोल सरसेनापती चा संदेश प्रभाव टाकत होता तेवढ्यात आमच्या तारामती ओरडल्या,
" तिखट झालंय, मला नको जेवायला"
दोनच सेकंदात त्या सिनेमॅटिक दृश्यातून वास्तवात आलो.
" कुठे तिखट झालंय ? बरोबर तर आहे " माझं लक्ष अजून पण टिव्ही कडेच होत.
" नाही बाबा, झालंय तिखट. मला नको जेवायला"
एकच क्षण गेला आणि माझ्या मुखातून अचानक वीज कोसळली
" गप्प खा ! एवढासा तिखट पण सहन नाही होत तुला. त्या ताराराणी बघ एवढी मोठी तलवार घेऊन सराव करताहेत. मैदानात सराव करताहेत. नीट जेवत नाहीस म्हणून बारीक झाली आहेस. गप गुमान एक चपाती सपवायची. "
माझ्यातले मोहिते अचानक जागे झाले होते. आवाज नेहमी चा बेस सोडून प्रवीण तर्डेंच्या बेसला पोहचला. दररोज च्या मराठी ला शिवकालीन गावरान मराठी चा तडका बसला होता. कन्येने आ वासला. टिव्हीवर एकदा तारा राणीकडे पाहिले तोंडातला घास पटपट चावून गिळला. पाण्याचे दोन घोट घेतले. आणि परत आ केले. माझ्या हातात मटण भरलेला चपाती चा घास गोळा भरलेल्या तोफेसारखा तयारच होता. एका पाठोपाठ एक करत पटपट चपाती संपली. आता भाताची पाळी होती. लेकीने आवंढा गिळत एकदा माझ्याकडे पाहिलं. टिव्हीवर सरसेनापती रंगात आले होते त्यामुळे माझा आवेश कमी व्हायचे काहीच चांसेस नव्हते.
अचानक दाराची कडी वाजली. घशाला कोरड पडलेल्या माणसाला पाण्याचा डोह दिसावा , रणरणत्या उन्हात तापून निघालेल्या वाटसरू ला नितळ सावलीचा वड मिळावा तशी लेकीची माऊली दारावर उभी होती. तिने धावत दरवाजा उघडला आणि तिचा बांध फुटला. आईसाहेबांना काळजी वाटली,
"काय झालं काय ?" माऊलीचा प्रेमळ त्रासिक सवाल ,
" मटण तिखट आहे." कन्येने आपला त्रास सांगितला.
" काय तिखट बिखट नाही झालंय . नुसती नाजूक झाली आहे. जरा पोटाला खायला नको . ताकत कशी येल अंगात. बघावं तेव्हा मुळू मुळु रडत बसायच. स्ट्राँग हो जरा." माझ्यातले मोहिते अजून शांत नव्हते झाले. मघाचाच टोन, मघाचेच बेअरींग.
सौभाग्यवती नी मला हातानेच खुणावल. लेकीला जवळ घेऊन प्रेमाने डोक्यावरून हाथ फिरवला. लेकीची समजूत काढत तिला भात भरवला. आमच्या सौभाग्यवती च एक बर आहे एरवी जेवत जेवत नाही म्हणून कांगावा करणारी ही माऊली आज लेकीच्या बाजूने उभी राहिली. हळू हळू वातावरण सौम्य झालं. लेक सुध्धा परत नॉर्मल झाली आणि youtube सोडून सरसेनापती बघत राहिली.
चित्रपटाच्या शेवटी हंबीर रावांच्या चीतेपुढे डोळ्यात आसवांचा पुर सांभाळत निर्धाराने ताराराणी एका हाताने तलवार उचलत होत्या. आणि माझी लेक माझ्याकडे बघत गालात हसत मागच्या युध्दाला विराम देत होती.
अभिजित मोहिते
11 टिप्पण्या
वा!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवावाचताना तुम्ही हे लिहिताना शिवकालीन आणि सध्याच्या युगात स्वैर बागडताना जाणवलात
छोट्या छोट्या गोष्टींच वर्णन केल्यामुळे तुमच्या कान्येच्या चेहऱ्यावर बाबा ओरडल्यावर काय हावभाव असतील हे सुद्धा डोळ्यासमोर आणू शकलो
तिला जेवण्यासाठी जे उदाहरण दिलत त्या पद्धतीची उदाहरणं सर्वच पालकांनी अधून मधून द्यायला हवीत
आपल्या पुढील लिखाणासाठी शुभेचछा
असच लिहीत रहा
खूप खूप धन्यवाद. लिहीत राहायचा नक्कीच प्रयत्न राहील
हटवाखूप छान. 👍👍 असेच लिहीन चालू ठेवा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद कल्पेश
हटवाखूप छान. 👍👍 असेच लिहीन चालू ठेवा.
उत्तर द्याहटवाअप्रतिम.....👌👌🙏🙏👍👍 वाक्यरचना आणी शब्दकोष खूप खूप छान सुरुवातीला वाचताना अस वाटलं की खर्च इतिहास वाचतोय शिवकालीन माहितेंचा वारसा शोभतात..
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद रमेश सर , असाच प्रेम असू द्या
हटवाछान..!!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर अभिप्रायवजा लेख.
अशाप्रकारे सर्वांनी चित्रपटातून बोध घेऊन अंगीकारला पाहिजे.
👍👍
उत्तर द्याहटवा