Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

वारी आषाढी एकादशीची | आषाढी एकादशी | Ashadhi Ekadashi

वारी आषाढी एकादशी | आषाढी एकादशी | Ashadhi Ekadashi

वारी आषाढी एकादशी, आषाढी एकादशी, Ashadhi Ekadashi

नामदेव घरातून धावतच बाहेर पडला. सकाळचे 7.50 झाले होते आणि त्याला 8.10 ची बदलापूर गाडी पकडायची होती. आज ऑफिसला वेळेत पोहचायला पाहिजे होते.  कालच्या सगळ्या प्रकरणात त्याची सुट्टी झाली होती. त्यामुळे ऑफिस ला लवकर पोहचल पाहिजे होते. बराच वेळ रिक्षांची वाट पाहून शेवटी त्याला रिक्षा मिळाली. रस्त्यावरील असंख्य खड्डे आणि दूनियभरचे स्पीड ब्रेकर वर आदळत आपटत शेवटी रिक्षा स्टेशन ला पोचली. गाडी निघायला 2 मिनिट शिल्लक होती. नामदेवांनी धावत जिना गाठला पण अचानक थबकला.

तिकीट काऊंटर च्या समोर सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुध्धा आषाढी एकादशी निमित्त भजनाचा आणि दिंडीचा सोहळा चालू होता. " अरे हो, आज आषाढी एकादशी! " नामदेवाच्या मनाची घालमेल झाली. मनाच्या खोल डोहातून एक अतृप्त इच्छेचा बुडबुडा वर आला.

"गेल्या कित्येक वर्षापासून आपली आषाढी ला पंढरीला जायची इच्छा तशीच राहिली आहे"

जिन्याच्या पायऱ्या चढत असताना नामदेवाच्या मनात विचारांचं मोहोळ उठल.

" ह्या वर्षी जायचं नक्की ठरवलं होते. पण यश ला गेल्या महिन्यात हॉस्पिटल ला ऍडमिट करावं लागलं आणि 10 दिवस सुट्टी झाली. एवढासा मुलगा माझा तापाने फणफणला होता"

नामदेव पायऱ्या उतरून कधी प्लॅटफॉर्मला आला त्याला कळलच नाही. विचारांच्या तंद्रीत तो गाडी कडे झेपावला. त्याच वेळी गाडी निघाली. झोपेतून माणूस दचकून उठावा तसा नामदेव तंद्रीतून बाहेर आला. ट्रेन पकडायला तो  दरवाजाच्या मधला रॉड पकडायला गेला पण गाडीने अचानक वेग घेतला.

नामदेवाच्या पायाचा अंदाज चुकला. गाडीच्या वेगाने हातला झटका बसला. एक क्षण प्लॅटफॉर्म वरचे सर्व ओरडले. स्वतः नामदेव च्या डोळ्यासमोर अंधारी आली. एकच क्षण गेला तेवढ्यात अचानक एका मजबूत हाताने नामदेव च हाथ धरून  आत खेचले. नामदेव चा घशात अडकला श्वास परत फुफ्फुसात आला.

त्याच्या समोर एक सावळा, हसतमुख तरुण उभा होता. त्याचे डोळे तेजस्वी होते. चेहऱ्यावर एक आत्मिक समाधानाचं हास्य होत. तो अजून पण नामदेव चा हाथ धरून उभा होता. नामदेव चा श्वास अजून थाऱ्यावर नव्हता. त्या तरुणाने बॅगेतून पाणी बॉटल काढून नामदेव ला दिली.

"काय भाऊ लक्ष कुठे होत ? झालं असतं आज तुम्हाला विठ्ठल दर्शन " तो तरुण हसत म्हणाला.

"खरं आहे भाऊ तुमचं, तुम्ही हाथ पकडला नसता तर. . . ." नामदेव थोडा थांबला.

"अहो माणूसच माणसाच्या मदतीला येणार " तो तरुण बोलत असताना सुध्धा त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य कायम राहत होत. " पण लक्ष कुठे होते तुमचं ?"

माहित नाही का पण नामदेव का तो अगदी जवळचा मित्र असल्यासारखा वाटला.

" थोडा विचारात होतो भाऊ, काल माझ्या सोबत एक नको ती घटना घडली , त्याने डिस्टर्ब होतो.” नामदेव आता मनमोकळा होत होता.

" जीवा पेक्षा मोठा काय इश्यू नसतो जगात , आपला जीव आपल्या फॅमिली साठी महत्त्वाचा" तो तरुण  म्हणाला.

" हो ते आहेच म्हणा, पण काल ट्रेन मध्ये माझी बॅग चोरीला गेली"

" बॅग च गेली ना, पाकीट पण होत का त्यात "

" हो"

"जाऊ द्या गेलं तर, कितीसे पैसे होते असे हजार दीड हजार साठी एवढं टेन्शन का घेताय ?"

" पस्तीस हजार होते" नामदेव ने कोरडा श्वास सोडला.

आता मात्र आश्चर्य चकित व्हायची पाळी त्या तरुणाची होती.

"काय ? पस्तीस हजार कॅश घेऊन फिरता तुम्ही ?"

" माझा मुलगा यश च्या ऍडमिशन साठी काढले होते. उद्या शाळेत भरायचे होते."

नामदेव शून्यात नजर लावून सांगू लागला

" चांगल्या शाळेत एडमिशन घेतलं होत. पन्नास हजार भरायचे होते. कसे बसे सुरुवातीला पंधरा हजार जमा केले. शिक्षकांना सांगून एक महिन्याची मुदत घेतली बाकीचे पस्तीस हजार भरायला.

“मित्रा कडून थोडे उसने घेऊन पैसे जमवले तर हे असं घडलं. आता 2 दिवस उरलेत. पैसे नाही भरले तर एडमिशन कॅन्सल करतील. " नामदेव हताश पणे म्हणाला.

" होईल ओ काहीतरी , पोलीस कंप्लेंट केली का ?”

" हो केली ना , त्यातच तर काल सुट्टी झाली , पण तुम्हाला तर माहितेय परत भेटेल बॅग आणि पैसे हि आशा नाही. पोलीस म्हणाले अश्या दिवसाला किती बॅग्स  जातात "

" आता काय करणार म भाऊ ?" त्या तरुणाने विचारलं

" बघू आता , पंढरीनाथा च्या हवाली सगळं " नामदेवाने विठ्ठलावर टाकलं सर्व .

" विठ्ठल काय करणार त्यावर , तो काय जाऊन चोराला पकडणार ? देव देव म्हणता मगाशी गेला असतात ट्रेन खाली, कसला पांडुरंग आणि कसलं काय " आता मात्र त्या तरुणाचा चेहरा कडवट होत होता.

 " असं नका म्हणू , त्या पांडुरंग ने मला वेळोवेळी तारलंय , मी पण तुमच्या सरखाच होतो पहिला . देवाला दुरून नमस्कार करणारा . गणपतीत फक्त आरती पुरता देवा समोर उभा राहणारा.

पण माझ्या यश च्या जन्माच्या वेळी देवाने माझी परीक्षा पाहिली. अवघा दीड किलो वजनाचा जन्माला मुलगा माझा. फुफ्फुस कमजोर होत. डॉक्टरांनी काचेत ठेवला पोराला. श्वास घायला जमत नव्हतं"

नामदेवाच्या डोळ्यात मोती तरळले.

" डॉक्टर म्हणाले पांडुरंगावर विश्वास ठेवा. होईल सर्व नीट. माझे आई बाप गावाकडचे . विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा. बाबानी माळ घेऊन पांडुरंगाचा धावा सुरु केला.

त्या हॉस्पिटल च्या प्रवेश द्वारावर कमरेवर हाथ ठेऊन उभ्या असलेल्या कानडा राजाच्या मूर्ती समोर जाऊन उभा राहिलो. हाथ जोडले डोळे मिटले आणि म्हणालो " माउली , माझ्या पिल्लाला वाचवा "

"त्याचाच ऍडमिशन चा लोचा झालाय ना ?" त्या तरुणाने खोचकपणे विचारलं " अहो ते सर्व डॉक्टरांचं यश ! विठ्ठल थोडी आलेला ट्रीटमेंट करायला "

नामदेवाला राग आला पण त्या तरुणाने आपला प्राण वाचवला हे जाणून तो शांतपणे म्हणाला

" त्या दिवस पासून आषाढी ला पंढरीला जाईन  म्हणतोय "

" मग का नाही गेलात ? आज आषाढीच आहे "

" हो ह्या वर्षी जायचं नक्की केलेलं , पण मागच्या महिन्यात यशला पुन्हा टायफॉईड झाला . ८ दिवस सुट्टी हॉस्पिटल ला गेली , त्यात हे काल पैसे गेले, हॉस्पिटल ला ४० हजार खर्च झाला तो वेगळाच , खरचं  आज जायची खूप इच्छा होती जायची. "

" जाऊ द्या ओ , आई बाप, बायका , मुलांसाठी आयुष्य वेचायच हीच आपली पंढरी ची वारी. आणि तुम्ही म्हणताय ना,  तो पांडुरंग आहे तुमच्या सोबत तर होईल सर्व नीट , कोणी सांगावं स्टेशन ला उतरलं आणि कळेल कि तो चोर सापडला , बघू तरी तुमचा विठ्ठल काय चमत्कार करतो का "

" जाऊ द्या भाऊ , प्रत्येक गोष्टीत कशाला पांडुरंगाला त्रास द्या. मीच काल लक्ष द्यायला हवं होत बॅगेकडे. पाणी नीट उकळून , गाळून घेतलं असत तर कशाला यश ला टायफॉईड झाला असता. पांडुरंगाने माझ्या पिल्लाचे प्राण वाचवले तेच खूप झालं" नामदेवाने डोळे मिटून मनातल्या मनात विठ्ठलाला नमस्कार घातला. पण मनातून तो नाराज होता , आज पंढरीला जावे आणि त्या विठू माउलीला डोळे भरून पाहता येत नाही म्हणून मन चुकचुकत होत. यश च ऍडमिशन , ती बॅग , पैसे या पेक्षा ही या क्षणाला आपल्याला पांडुरंगाला भेटता नाही आलं हि आर्तता जास्त होती . ती त्याच्या डोळ्यातून नकळत वाहत होती

" चला ठाणे आलं , उतरणार आहात का ? " तरुणाने विषय विषय आटोपता घेतला हसत हसत.

" हो तर , चला भाई ठाणे , ठाणे "

ठाण्याला उतरल्यावर नामदेव त्या तरुणाला हाथ करत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. मॅनेजर चा फोन होता

" नामदेव , अरे आपल्या ऑफिस च्या मेडिक्लेम मधून तुझ्या यशच हॉस्पिटलचं बिल अप्रूव्ह  झालय. आला कि अकाउंट्स मध्ये जाऊन भेट"

नामदेव ला धक्का बसला. आता पर्यंत त्याला एम्लॉईस साठी ऑफिस मध्ये मेडिक्लेम आहे हे सुद्धा माहित नव्हतं आणि आज मॅनेजर सांगताहेत अप्रूव्ह झालं.

तो तरुण त्या म्हणाला " चला , निघतो आता "

" अहो थांबा, तुम्ही माझा जीव वाचवला . एक ... " पण तेवढ्यात त्याचा फोन परत वाजला .

" नामदेव साहेब , ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन वरून पवार बोलतोय , तुमची बॅग चोरणारा माणूस सापडला , येऊन जावा स्टेशन ला "

आता मात्र नामदेवला काही कळेना. त्या तरुणाला शोधू लागला , तो तरुण वळून बघत मघा सारखाच प्रसन्न हसत होता , हाथ हलवत होता

" अहो नाव तर सांगा तुमचं "

"श्रीरंग , नामदेव जा आता"

नामदेवाचा विश्वास बसेना त्या तरुणाच्या कानाची मकर कुंडले चमकताना दिसली आणि कपाळावरचा केसरी गंध तळपलेला वाटला. गर्दीत अचानक तो अदृश्य झाला.

" पुन्हा भेटू कधी तरी हे बोलायचं राहूनच गेलं " नामदेव पुटपुटला


आणखी वाचा -: हंबीरराव, ताराराणी आणि मी


👉 अव्यक्त अभिजित

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. पांडुरंगाचं हे रूपडं खूपच भावलं.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद कल्पेश , तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळे जमतंय हे . लव्ह यु

    उत्तर द्याहटवा
  3. आज तोच तर मार्ग दाखवत आहे, रुप फक्त्त बदलय पाठबळ नाही सरळ , म्हणूनच नामदेव ला श्रीरंगा च्या रूपाने साक्षात पांडुरंग भेटला.....रामकृष्ण हरी .... खूप छान लिहीलं आहेस ...अभिजीत.... असाच लिहत रहा ....!

    उत्तर द्याहटवा
  4. सुरेख लिखाण, उत्कृष्ट मांडणी, unexpected story, आणि पहिल्यांदाच दुसरे charactar घेऊनही डोळ्यांसमोर जिवंत केले,

    Keep writing 🙏🏽❤️❤️❤️

    उत्तर द्याहटवा