Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

बालपण देगा देवा - भाग १ | Balpan Dega Deva

बालपण देगा देवा - भाग १ | Balpan Dega Deva


Balpan Dega Deva


२०१७ मध्ये जानेवारी महिन्यात प्रसिद्ध दिग्दर्शक "हेमंत ढोमे" ने "बघतोस काय मुजरा कर" ह्या सिनेमाच्या वेळी एक कॉन्टेस्ट फेसबुक वर चालू केली होती . एक टॉपिक ऑफ द डे देणार त्यावर तुम्हाला सुचेल ते लिहायचं . त्या स्पर्धेत ८ विजेत्या मधला मी एक होतो. माझ्या ज्या लेखा मुळे मी विजेता झालो तो लेख खाली देत आहे. खरंतर त्या स्पर्धेमुळे मी परत लिहायला सुरुवात केली. 

आजचा विषय बालपण त्यावर मला सुचलेले थोडंसं 

बालपण देगा देवा! 

हेमंत , तू सुरुवातीलाच काळजाला हाथ घातलास . बालपण , कस आणि किती लिहिणार रे यावर , माझा जन्म मुंबईला झाला . लोकांचा प्रवास गावाहून मुंबईला असा होतो . माझा उलट झाला . मुंबई - कोकण - मुंबई . 

इयत्ता ३री पर्यंत मुंबईत शिकलो , शाळेत पोहचत असताना रिक्षा स्लो झाली म्हणून मारलेली उडी अजून आठवते . थोड्याच वेळात सालपटलेली ढोपर बघून ढसाढसा हम्बरठा फोडणारा मी आणि एवढं होऊन "अरे मेल्या" म्हणून मलाच बदडणारी माझी आई , दफ्तर उडून बाजूच्या सुक्या गटारात गेलेला माझा टिफिन आणि वॉटरबॅग मला अजून आठवते. 

मग माझ्या धैर्यशील आईने थेट गाव गाठलं . मुंबईतील भाड्याचं घर तिला सोसत नव्हतं , वडील सरकारी नोकर असून काही फायदा नाही, सर्व मदिरा देवीची कृपा ! म्हणून म आईने गावाला घर बांधायचा निर्णय घेतला . एक वर्ष आजोळी राहिल्यावर आम्ही आमच्या गावाला शिफ्ट झालो. आईसोबत मेहनतीने साधं मातीच घर बांधलं . अजून पण तेच घर आहे आमचं साधं मातीच , पण तिथला गारवा हिथल्या ऑफिसमधल्या सेंट्रल ए सी ला धोबीपछाड देईल . आमच्या घराशेजारी एक मोठ्ठं आंब्याचे झाड आहे. त्याच फळ एकदम छोटुसं आहे. त्या झाडाच्या अवाढव्य आकाराला न शोभणारे ते फळ. त्याला आम्ही "बिटकी" आंबा म्हणतो. तर त्या विशाल वृक्षराज्या च्या सावलीत विसावलेले आमचे मातीचे घर.

इयत्ता ५ पासून १२ पर्यंत गावालाच शिकलो . बालपणी चा काळ सुखाचा असतो, माझा संमिश्र होता . पण हा , त्यात गरिबीत हि आम्ही श्रीमंती अनुभवली , आम्ही भावंडं म्हणजे गावात आदर्श , अभ्यास , वक्तृत्व आणि घरातली काम यात सर्वात पुढे. माझ्या धाकट्या भावाचे पराक्रम लिहायला बसलो तर पाने पुरायचे नाहीत . त्याचा एक स्वतंत्र अध्याय होईल. त्या एकट्याविरुद्ध मी आणि बहीण दोघे लॉबिंग करायचो . त्या भाईने एकदा तर अभ्यासाला बसल्यावर झोपेत पुस्तक चुलीत टाकलेलं . 

असो कोकण म्हटल्यावर त्यात सर्व आलच . निसर्ग आपल्या दोन्ही हातानी आपले विविध अवतार आम्हाला दाखवायचा . सहज डोळ्यासमोरून एक एक चित्र फ्लॅशबॅक मधून सरकत जात . तुम्ही चित्रपटात दाखवता ना तस्स . मुक्काम पोस्ट : कुटरे , तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी , देश भारत , खंड आशिया असा पत्ता सांगताना हाथाची ताठ घडी घालून उभा असायचो. पंधरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट (रा स्व सं ?) हा पोशाख आमचा . पांढऱ्या शर्ट ला निळं ( उजाला चार बुंदो वाला) घालून जास्त पांढरा दिसतो हा बालमनाला समज .

उन्हळ्यात सुकी नदी पार करणारे आम्ही पावसाळ्यात साकवावरून वळसा मारून शाळेत जायचो . मग घरी येताना आमचा ग्रुप नमनातली गाणी डब्यावर बडवत " हा हा हा " असा राक्षसाचा आवाज काढत ( संताकलौज चा नव्हे) घर गाठायचो . शेताच्या बांधाजवळ लावे शोधायचे. बैलांना वेगवेगळी नाव ठेवायची , जाळीतल्या करवंदांवर आडवा हाथ मारायचा , भर पावसात दुपारच्या सुट्टीत समोरच्या डोंगरावरच्या मैदानात आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यासाठी डब्बा छोट्या सुट्टीत संपवायचो आणि मोठ्या सुट्टीत धुडगूस. 

अशाच एका धुड्गुसीत माझा थ्रो स्टंप सदृश्य झाडामागे बसलेल्या एका मुलाच्या नाजूक जागी लागला आणि मग भांडायला आलेल्या त्याच्या बहिणीसोबत नाजूक विषयावर भांडताना मला फेफरे आलं . परीक्षेत उत्तर दाखवण्याच्या बदल्यात माझ्या एका मित्राने एक मोठी पिशवी भरून काजूच्या बिया आणून दिल्या ती माझ्या आयुष्यातली पहिली लाच होती हे आता कळतंय . आता व्हाट्स ऍप ग्रुप वर हेच मित्र कित्येक महिन्यात एकदाच प्रत्यक्ष भेटलोय . 

अजून बऱ्याच आठवणी आहेत . बालपण विषयच असा आहे कोणाला वेळ पुरेल ? तरी पण एक छोटासा रिकॅप . 

बालपण देगा देवा चा पुढचा भाग लवकरच येईल.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. हे वाचून मला पण माझ्या बालपणीच्या खूप काही गोष्टी आठवल्या😊😊😊

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच ते दिवसच वेगळे होते, वेळ दिला तर छोट्या छोट्या गोष्टी hi आठवतात 😂

    उत्तर द्याहटवा