Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लोकलनामा | Mumbai Local

"लोकल नामा" च्या भाग  मध्ये आपण Mumbai Local मधल्या ग्रुप ची वैशिष्ट वाचली. तीच पुढे चालू करुया : 

लोकलनामा, Mumbai Local

बारक्या, काका - मामा, दादा - बाहुबली, सप्लायर आणि स्टँड अप कॉमेडियन अशी अफलातून वल्ली आपण वाचल्यात. 

ग्रुप चे बाकी मेंबर मध्ये काहीजण असतात "राजकीय विश्लेषक". एकूणच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती म्हणजे ह्या मेंबरसाठी अगदी पोषक जमीन. मग या जमिनीवर उगवते त्याची अफाट राजकीय विश्लेषणाची पिके. काही कट्टर , काही खंदे आणि काही तटस्थ. मग दादा काका साहेब ह्यांच्या भांडणात अख्ख्या डब्ब्याला आयता टाईमपास मिळतो.

आमचे एक मित्र शिंदे आडनावाचे. फक्त आडनाव हेच साधर्म्य. पण अख्ख्या डब्याला ते आपले कार्यकर्ते समजतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बारवी डॅम पासुन मुंब्रा खाडी पर्यंत सर्व जागा आपल्या कार्यकर्त्यांना वाटून टाकल्या आहेत. ( मला सुद्धा लाभार्थी करून टाकलंय). छत्रपती शिवाजी टर्मिनस ला बसलेल्या लोकांना ठाण्याला उठायला लावून उभ्या प्रवाश्यांना बसायला देणे हे त्याचं आद्य कर्त्यव्य. त्यासाठी साम - दंड वापरून, वेळेस समोरच्याशी दोन हाथ करून आपलं कर्तव्य पार पाडणार. एका पोराचा बाप असून पण मस्ती एवढी की त्याचा पोरगा पण करत नसेल. पांचट पना ठासून भरलेला, आणि एक एक मराठी शब्द प्रयोग ऐकाल तर नवीन डीक्शनरी उघडावी लागेल (उदा. हातगोळे, अजगर, डॉबरमॅन)  स्टेशन ला उतरल्यावर ट्रॅक वरून जाताना कुत्र्यांना पिटाळत जायचं हा त्यांचा आवडीचा छंद. पण मैत्री साठी सदैव तत्पर ! 

ग्रुप चा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे " द्वारपाल" उर्फ "डोअर वाले"! अतिशय चपळ, लवचिक अशी गुणवैशिष्ट्ये असतील तरच ह्या जागेसाठी तुम्ही पात्र असता. साधारण एक ते दीड मीटर लांब उभे राहून तिथून डोअर पकडून यायला जे अचूक टायमिंग लागते ते तुम्हाला विराट कोहली च्या बॅटिंग मध्ये पण पाहायला मिळणार नाही. ह्या डोअर किपर चं पहिलं काम दीड मीटर वरून डोअर पकडून येणे आणि आपल्या डोअरच्या ग्रुपला जागा ठेवणे. त्याचा आवाज करडा असायला हवा. ग्रुप व्यतिरिक्त कोणी प्रवासी आला तर त्याला दम देता आला पाहिजे असा. शिवाय मधल्या सगळ्या स्टेशन " ए चल भाय, अंदर चल" अशी हाकारी द्यायची असते. 

"द्वारपाल नंबर दोन" हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक असतो. पहिला द्वारपाल पुढे आणि 2 नंबर च द्वारपाल पाठी असतो. त्याच्याकडे स्पायडर मॅन सारखी बोटांच्या आधारावर हवेत लटकायची ताकद असते. आणि गाडी फुल्ल झाली की उलट फिरून "हल्क" सारखी सर्वांना आत ढकलायची पण ताकद असते. गाडी प्लॅटफॉर्म ला टच झाली की डोअर सोडून प्लॅटफॉर्म वरून चालत येऊन परत डोअर पकडायचे कला नैपुण्य ह्यांच्याकडे खचाखच भरलेले असते. 

मी डोंबिवली वरून ठाण्याला जायला टिटवाळ्या वरुन येणारी स्लो ट्रेन पकडायचो तेव्हा त्या गाडीचा द्वारपाल होता विवेक आणि विनीत. दोघे माझ्यासाठी डोअर ला टिटवाळा हून जागा ठेऊन आणायचे.  दोघेही पक्के अक्करमाशी. एकदा मी डोंबिवलीला ट्रेन मध्ये चढलो तर हे दोघे एका इसमाशी भांडत होते. 

"तुम्हाला बोललो ना आमचा माणूस येणार आहे. आत मध्ये जावा"

"ही काय तुमच्या घरची ट्रेन आहे का ? नाही जात जा, बघतो काय करता" ती व्यक्ती पण हटायला तयार नव्हती. 

"आला आमचा माणूस चला जागा द्या. उगाच लफडी नको" 

" येऊ दे, कोण आहे बघतो मी" भडकून ती व्यक्ती तावातावाने म्हणाली.

एरवी मी सुध्धा तावातावाने त्या व्यक्ती शी भांडलो असतो पण त्यांना बघून मी गपगार झालो. आमच्या शेजारचे पाटील काका होते ते. एरवी बिल्डिंग मध्ये शांत असणारा मी , आणि माझे ट्रेनचे मित्र एवढे अतरंगी असतील अस त्यांना पण अपेक्षित नव्हतं. ठाकुर्ली ते डोंबिवली चाललेल्या त्या चकमकिवर अखेर माझ्या ओळखीने विराम मिळाला. जेव्हा की ती चकमक माझ्यासाठीच चालू झालेली. नंतरचा प्रवासात मात्र काकांना आमच्या ग्रुप ने "खास अतिथी" चे आदरातिथ्य दिलं. पण नंतर बरेच दिवस पाटील काकांनी बिल्डिंग मध्ये तो विषय चवीचवीने चघळला.

असो, कबड्डी मध्ये जसा कॉर्नर वाल्याला आपल्या सोबत साखळी (कव्हर) लागत तसा द्वारपाल ला कव्हर असतं. एक त्याच्या मागे जो डोअर च तोंड कव्हर करेल. अजून एक आत मध्ये जो विरुद्ध डोअर वरून येणारा प्रेशर रोखेल. हा पण एक महत्त्वाचा घटक असतो. द्वारपाल वर जास्त दबाव येऊ नये ही त्याची जिम्मेदारी असते. ट्रॅक वर गाडी थोडा टर्न मारेल तेव्हा झोत कुठे मारेल हे त्याला अचूक माहीत असायला हवं. त्या हिशोबाने तो आपले बायसेप ट्रायसेप मधली ताकद adjust करत असतो. 

ह्या व्यतिरिक्त मग उरतात ते सर्वसाधारण सभासद. त्यांनी फक्त गाडी पकडायची. आल्यावर बाकीच्यांना नमस्कार चमत्कार करायचे आणि जे चालू आहे त्यात सहभागी व्हायचं. 

"दसरा" हा लोकल प्रवाशांच्या दृष्टीने सर्वात मोठा सण असतो. मुंबई लोकल मध्ये दसरा हा नवमीला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी साजरा होतो. ही प्रथा कुणी चालू केली, कधी चालू केली हे सर्व अज्ञात आहे पण फार पूर्वी पासून चालत आलेली प्रथा आहे हे नक्की. 

तर दसरा म्हणजे सर्व ग्रुप साठी पर्वणी असते. आपल्या आपल्या वॉर्ड ला सजवणे हे गृपच काम. छान पताके, झिरमिळ्या, तोरणं, हार वगैरे लावून गाडीला सजवले जाते. दरवाज्याला हार घातला जातो. अंबेमातेचा फोटो लावला जातो. त्या खाली ग्रुपचे आणि गाडीचे नाव लिहिलेली प्रिंट लावतात. प्रत्येक ग्रुप गाडीला हार घालतात. गाडीसमोर नारळ फोडला जातो. मोटारमनला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ दिले जातात. एरवी मोटरमनला गाडी लेट झाली म्हणून शिव्या हासडणारे लोक मोटारमन चा मानसन्मान करतात. 

पण ते दृश्य फार विहंगम असतं. हार फुलांनी नटलेली गाडी, आनंदी प्रवासी, अंबेमातेची आरती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार सगळं वातावरण मंत्रमुग्ध करणार. मग प्रवाशांसाठी खोबरं, पेढे वाटप असतं. सर्व ग्रुप साठी काँट्रो काढून एक एक बॉक्स आणला जातो. त्यात समोसा, ढोकळा, वेफर्स, फ्रुटी अस काही ना काही नाश्ता आयटम असतो. काही ग्रुप स्वतःसाठी काही भेटवस्तू घेतात. रुमाल , पेन, सदरा अस काहीतरी.

सदरा वरून आठवलं. मघाशी सांगितलेल्या टिटवाळा ट्रेन ला एक वर्ष सर्वांनी पैसे काढून भगवे सदरे आणले होते. विवेक आणि साहिल कडे कॉन्ट्रॅक्ट होत ते. भारतीय इतिहासातला एक मोठा घोटाळा मी तेव्हा पाहिला. सर्वांना आणलेले सदरे आणि विवेक, साहिल चे सदरे वेगळे होते. मला तर माझ्या मापाचा पण आणला नाही. मी माझा घरचा सदरा घालून आलेलो. ह्या दोघांचे सदरे क्वालिटी चांगली आणि बाकीच्यांचे पकाव. नंतर कळाले की त्यांनी सदरयाला काँट्री पण नाही दिली. बाकी 20- 25 सदरयांवर ह्या दोघांचे सदरे फ्री होते. मुंबई लोकलच्या इतिहासातला हा एक मोठा सदरा घोटाळा म्हणून ओळखला जाईल याची मला खात्री आहे.

पण माझा दुसरा एक बदलापूर वाला ग्रुप मात्र वेगळा. ही आमची संध्याकाळची ट्रेन. मी गेल्या दसऱ्याला काही कारणामुळे गाडीला जाऊ शकलो नाही. पण अतुल दादा , राहुल दादा ने माझा बॉक्स अगदी घरापर्यंत पोहचवला. 

गाडीत सर्व हवी तशी मजा, मस्ती, मस्करी, कुस्करी करतील. पण खरंच जेव्हा एखाद्या मेंबर ला गरज असेल तेव्हा त्यांच्या मागे तत्परतेने उभे राहतील. एकदा संध्याकाळी घरी येत असताना मला फोन आला की माझी मुलगी पडली. थोडी unconscious झाली. गाडीतून उतरे पर्यंत माझा जीव कासावीस झाला. घरी पोहचून तिला डॉक्टर कडे नेई पर्यंत सर्व मित्रांचे फोन चालू होते. अगदी रात्री 1 वाजे पर्यंत. हीच आपली संपत्ती. पैसा बिसा काय, आहे काय नाही काय, पण जोडलेली माणसं यांच्या सारखी संपत्ती नाही...

अशी संपत्ती मी मुंबईत आल्या पासुन गडगंज कमावली. घाटकोपर पासून ते टिटवाळा , कर्जत पासून ते बदलापूर पर्यंत ही माझी Assets विखुरलेली आहे. मी पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटलं होतं, ही अनोखळी माणसं कधी जिवश्च कंठश्च होऊन जातात कळत सुद्धा नाही. 

अजुन बरंच आहे अव्यक्त ते पुढच्या भागात....

लोकलनामा - भाग ३ - एक अस्वस्थ वास्तव

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या