भाग १
ऑगस्ट महिन्याचा
पहिला रविवार हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षी म्हणजे
०६ ऑगस्ट २०२३ रोजी " आंतरराष्ट्रीय मैत्री दिन" म्हणजेच
"International friendship day" साजरा होत आहे.
आई, वडील, भाऊ
, बहीण, काका , काकी, मामा , मामी, मुले, आजी , आजोबा, आत्या, मावशी अशी खूप सारी रक्ताची
नाती घेऊनच माणूस जन्माला येतो. पण आयुष्यभर ह्या सर्व नात्यापेक्षा जे नातं सगळ्यात
जास्त अनुभवतो ते म्हणजे ह्या सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट आणि अतूट अस
"मैत्री" चे नाते.
कोणत्याही व्याख्येत
, संज्ञेत न बसणारी गोष्ट म्हणजे "मैत्री". जर तुमची मैत्री कोणत्याही व्याख्येत
बसणारी असेल तर ती मैत्री असूच शकत नाही. जगात फार कमी लोक असे भेटतील ज्यांना मित्र
नाही. कारण आयुष्यात हीच एक संपत्ती अशी आहे जी माणसाला सहज कमवता येते. अगदी निर्धन
माणसाला ही मैत्र कमवता येतात आणि अगदी सधन माणसाला सुध्धा. खुद्द देवालाही ज्या नात्याचा
लोभ नाकारता आला नाही ते नाते म्हणजे मैत्रीचे. किसन देवांनी कित्ती सवंगडी मिळवले
होते. सुदामा, पेंद्या, लंगड्या कित्तीतरी. केवळ मित्रासाठी मित्र चुकीचं असूनही कर्णाने
आपले प्राण पणाला लावले.
मैत्रीचे अत्युच्च
उदाहरण म्हणजे शिवरायांचे मावळे ! बाजी पासलकर, तानाजी मालुसरे , सूर्याजी मालुसरे,
येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या मित्रांसोबत
महाराजांनी "स्वराज्याचे स्वप्न" पाहीले. आणि त्या मित्रांनी ते स्वप्न अस्तित्वात
उतरवले. कोवळ्या वयात रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली महाराजांनी तेव्हा
त्यांच्यासोबत कोण होते ? हे वर सांगितलेले १५ -१६ वर्षाचे पोरसवदा मित्र. त्यांच्या इतक्या असीम निष्ठेची
, त्यागाची, समर्पणाची मैत्री खचितच जगाच्या इतिहासात पाहायला मिळेल. आणि महाराजांचं तरी
काय ! आपल्या मित्राला मुलाचं लग्न सोडून मोहिमेवर पाठवायला नको म्हणून तानाजींना कळू न देता कोंढाण्याची मोहीम आखणारे महाराज , शिवा काशिद, बाजीप्रभू यांना मरणाच्या
दारात सोडून जाणार नाही म्हणून निक्षून सांगणारे महाराज म्हणजे मैत्रीचे अत्युच्च शिखर
जणू!
" तुम्ही
जात पाहून मैत्री करत असाल तर
ती तुमची मैत्री च्या नावावर धब्बा
आहे. कारण मैत्री हि स्वतःच्यातच एक जात आहे, एक धर्म आहे.
हिथे समाजाच्या मान्यताप्राप्त जाती धर्माला काही
थारा नाही. विठ्ठलाला जशी त्याची सर्व
लेकरं सारखी तशी मैत्रीमध्ये सर्व
मित्र सारखे !"
देवाने ह्या
संपत्तीच्या बाबतीत मला कोट्यधीश करून ठेवले आहे हे मात्र खरं. कधीच आयुष्यात मला देवाने
एकटं पडू दिलं नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मला एक सो एक मित्र मिळत गेले आणि
माझी पुंजी वाढतच गेली.
माझे बालपणीचे
मित्र, शाळेतले मित्र अजूनही एकमेकाशी संपर्कात आहोत. खूप साऱ्या कांडांचे सहआरोपी.
आजच्या भाषेत क्राईम पार्टनर. शाळेत जाता येता कुचळक्या करणे, पावसाळ्यात चढणीच्या
माशांचा पाठलाग करणे, क्रिकेट साठी शाळेतल्या बेंच ची फळी चोरणे, काजू, आटकी पाडून
खाणे, नदीच्या पाण्यात उगीचच बांधण घालणे, बांधावरच्या लाव्यांच्या पाठी पडणे असली
एक ना अनेक कर्मकांड आम्ही जातीने केलीत. नित्या, बापू, जन्या, दादू, राज, सच्या, विनू,
प्रवीण, विश्वास, शैल्या, राक्या , कोकम, इम्रान , राजू जाम मोठी गँग असायची
आमची. सगळे साले एकजात अवली. मोठे झाल्यावर सर्व एकमेकांपासून दुरावले पण काही वर्षांनी
आमच्या काही जिद्दी मित्रांनी खूप मेहनतीने सर्वांना एकत्र आणले. फेसबुक, आणि व्हॉट्सॲप
मुळे आज परत सर्व एकत्र जोडले गेले आहोत. मे महिन्यातच आम्ही शाळेत गेट टुगेदर सुध्धा
केलं.
बालमित्र म्हणजे
पण एक खजिनाच असतात. कारण त्या सुवर्णकाळाचे सोबती असतात ते. त्यांच्याकडे अशी अशी
गुपिते असतात की तुमच्या भावी काळात कधीही मोठा स्फोट घडवून आणू शकतात. म्हणून अश्या
मित्रांना कधी सोडायचं नाही काय माहित कधी तुमची पुडी सोडून देतील.
कॉलेज ला पण खूप छान मित्र मिळाले. पण दुर्दैव माझं की त्यातले फक्त दोनच मित्र सध्या माझ्या संपर्कात आहेत. बाकी सर्व कुठे असतात काहीच कल्पना नाही. पण विक्रांत माझा जिवाभावाचा मित्र मला कॉलेजलाच भेटला. एकदा कॉलेज वरून म्हणजे सावर्ड्यातून असूर्ड्या पर्यंत ७ ते ८ किलोमीटर चा रस्ता आम्ही चालत प्रवास केला होता. आणि पायी प्रवासात अखंड वायफळ गप्पा. एकदा आमच्या कडे पालखीसाठी आम्ही कॉलेजचे मित्र मंडळ १६ -१७ किमी चक्क सायकल ने गावापर्यंत आलेलो. आणि रात्रभर घराच्या अंगणात मोकळ्या आभाळखाली आम्ही खूप आभाळ हेपलले होते.
विक्की, संत्या,
प्रशांत, डोंग्र्या, सुन्या अशी आमची कॉलेजची गँग पण मोठी होती. चिपळूण च्या पद्मा
टॉकीज ला पहिला सिनेमा मी पोरांसोबत बंक मारून पहिला, तो पण "The
mummy".
शाळा कॉलेजचे
मित्र म्हणजे एक अल्लड वयाचे सोबती. फार जबाबदारी नसल्याने तेव्हा मैत्रीची निर्भेळ
मजा घेता येते. पण शाळा
कॉलेज नंतर चे मित्र
म्हणजे तुमच्या व्यवहारी जगताचे मित्र. आणि खरं तर
हेच मित्र तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यभराचे सोबती असतात. मी गाव सोडून
कामासाठी चिपळूण, इस्लामपूर , मुंबई असा फिरलो. सर्वच
ठिकाणी परत देवाचे हे
"मित्रदान" पुन्हा पुन्हा माझ्या पदरात पडत राहील. इस्लामपूर
ला मी " हॉटेल
अक्षय' ला कामाला होतो.
त्या हॉटेल च्या समोरच कॉलेज
होत आणि त्या कॉलेजची
"कॉम्पुटर सायन्स" ची मुलं माझी
मित्र झाली. सिद्धू, रावल्या , गौऱ्या , अमित , धीरज असे भारी
भारी मित्र मला लाभले. केवळ
सिद्ध्या ला भूक लागायची
म्हणून तो मला घेऊन
दुसऱ्या हॉटेल ला खादडायला जायचा.
मी तिथे हॉटेल ला
मॅनेजर होतो. पण रावल्या ( राहुल
चिटणीस ) कधी मला डॅमेजर
शिवाय काही बोलला नाही.
भयानक वेगाने गाडी चालवणे काय
असत हे मी सिद्ध्या
( सिद्धार्थ वाळवेकर) च्या गाडीवर मागे
बसल्यावर अनुभवलं. दादागिरी , मारामारी कशी असते हे
अमितच्या मारामाऱ्या बघून शिकलो. सारकास्टिक
बोलणं कस असते हे
गौर्याच्या (गौरव कुलकर्णी) बोलण्यातून
कळायचं.
हिथेच इस्लामपूरला ( वाळवा तालुका) माझा एक जीवश्च कंठश्च मित्र आहे " संतोष " उर्फ पिंट्या. खरं तर तो माझा मानलेला मामा पण आम्ही मित्रच जास्त होतो. घरी शिव्या पडण्यासारखी जेवढी काम मी केली ती सर्व पिंट्यासोबतच केली. त्याच्यावर एक विस्तृत लेख लिहावा लागेल. पण हा पिंट्या मोठा जिद्दी माणूस , आज पुण्या सारख्या शहरात स्वतःचा व्यवसाय उभा करून खंबीर आहे. पण माझ्या सर्व अडचणीच्या काळात नेहमी माझ्या सोबत उभा राहिला.
मुंबईत
आल्यावर माझे "फ्रेंड्स" ढिगभराने वाढले. घाटकोपर भटवाडीचे अख्खे "मोदविनायक मंदिर मंडळ" माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये सामावले, त्या पाठोपाठ जिथे
जिथे कामाला लागत गेलो तिथे
तिथे हे मित्ररूपी मोती
माझ्या पदरात पडत गेले. अजय
जोशी, गौरांग जोशी हे राजस्थानी
नमुने हे माझे मुंबईतले
पहिले मित्र ! अजय , अभिजित, गौरांग ह्यांची इनिशिअल्स घेऊन आमचा आग
(AAG) ग्रुप तयार झाला. घाटकोपर
पूर्वेला कितीतरी संध्याकाळी आम्ही राजस्थानी कडक चहा ढोसत ढोसत भविष्याची
निरर्थक चित्रं रंगवली.
मग मी एका अश्या
कंपनीत कामाला लागलो जिथे एम्प्लॉईज चा
सुकाळच सुकाळ होता. एकापेक्षा एक तऱ्हेची व्यक्तिमत्व
होती तिथे. मग
कालांतराने त्याच्यातुनच आमच्या "गॉगल
गॅंग" ची स्थापना झाली.
हि गॅंग म्हणजे नुसती
धमाल होती त्या वेळी
, सगळे नवतरुण , उन्मुक्त , हॅपी गो
लकी टाईप. ऑफिस होतं नरिमन
पॉईंट ला . मुंबईच खरं युथ
कल्चर मी ह्या गॅंग
सोबत जगलो. फ्रेंडशिप डे पहिल्यांदा साजरा
केला. बऱ्याच जणांची सूतं ह्या ग्रुप
मध्ये जुळली. माझ्या
आयुष्यातल्या ज्या हरणीने माझी
शिकार केली आणि माझी मालकीण झाली ती सुद्धा
मला ह्या ग्रुप मध्येच
भेटली. आज सर्वजण आपापल्या
आयुष्यात व्यग्र झालेत पण आमचे तेव्हा
बांधले गेलेले मनोमनीचे बंध अजूनही कायम
राहिलेत आणि यापुढे हि
राहतील.
माझ्या
मित्रांच्या कथा हिथेच संपणाऱ्या
नाहीत . पुढच्या भागात अजून इरसाल नमुन्याची
ओळख करून देईन. तो
पर्यंत ह्या लेखाच्या प्रतिक्रिया
कळवा. लेख आवडला तर
तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
- अव्यक्त
अभिजीत
4 टिप्पण्या
झक्कास...
उत्तर द्याहटवाफारच सुंदर, वाचून माझ्या पण लहानपणी च्या मित्रांची आठवण झाली. सुदैवाने सर्व जण अजुनही एकमेकांच्या संपर्कात आहोत.
उत्तर द्याहटवा- स्मरणीय अवी
मस्त
उत्तर द्याहटवाअभिजित भाऊ खूपच सुंदर
उत्तर द्याहटवा