" २६/११ ची काळरात्र "
२६ नोव्हेंबर २००८
हा दिवस कोणत्या भारतीयाच्या लक्षात नाही ? प्रत्येक मुंबईकरांच्या च्या काळजावर अतिशय वेदनादायक घाव घालणारा तो दिवस. कधी कोणाच्या स्वप्नात पण नसेल असा नरसंहार त्या दिवशी झाला. कितीतरी निरागस आणि निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. लेकरं पोरगी झाली. आई बाप निःसंतान झाले. कित्ती साहसी पोलीस आणि जवानांच्या नररत्नांची हानी झाली. केवळ आतंकवाद्याच्या फालतू धर्मांध हट्टाने मुंबई रक्तबंबाळ झाली. मोठ्या मिरवणारे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रक्ताच्या लाल सड्यात रंगले. कधीही न थांबणारी मुंबई थांबली.
परत उभी राहिली मुंबई , चालायला नाही धावायला लागली. मुंबई स्पिरिट च्या गोंडस नावाखाली रक्ताचे डाग लपले. पण ती काळरात्र आजही मनात दुखरी आठवण घेऊन सलत राहते आणि नेहमीच राहील. त्या रात्री मी सुद्धा त्याच परिसरात होतो. त्या रात्रीच्या आठवणी ह्या ब्लॉग मधून मांडायचा प्रयत्न करतोय.
"२६/११/२००८"
भारताच्या आणि मुंबईच्या इतिहासातली एक “काळरात्र”. त्या वेळी मी आणि वैभव शिर्के चर्चगेट ला कामाला होतो. विधान भवनाच्या बाजूला मित्तल टॉवर ला. आणि २ पैसे जास्त कमावण्यासाठी ओव्हरटाईम करत होतो. आमच्याच ऑफिस ला कुलाब्याच्या कोळीवाड्यातल्या काही मुली कामाला होत्या. रात्री १० ला आम्ही ऑफिस वरून निघायचो. पण १० च्या अगोदरच त्या मुलींच्या घरातून फोन आला . “ताबडतोब निघा त्या एरियात फायरिंग झालय “ . आम्ही गडबडलो. नक्की काय झालाय कळलं नसल्याने आम्हाला त्या घटनेचं गांभीर्य कळलं नाही. आम्हाला वाटलं कि गॅंगवार चालू असेल. बातम्या बघितल्या नसल्याने नेमकं काय झालय आणि परिस्थिती कितपत गंभीर आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. तरीही ताबडतोब त्या मुलींना निघायला सांगून आम्ही सुद्धा निघालो ऑफिस वरून . चालत चालत अर्ध्या रस्त्यात पोचलो असू अंदाजे त्याच दरम्यान पोलसांची गाडी घेऊन पळलेल्या त्या आतंकयानी आमच्या बिल्डिंग च्या खाली एका निष्पाप कुत्र्याला गोळी मारली . अर्थात हे आम्हाला नंतर कळलं. जर त्या दहशतवाद्यांच्या गाडी समोर आम्ही चुकून आलो असतो तर काय झालं असत ह्या विचाराने आता काळजात चर्रर्र होतं .
चर्चगेट ला पोचल्यावर परिस्थितीच गांभीर्य लक्षात आलं. चर्चगेट ला पोलिसांची लगबग चालू होती. ती बघितल्यावर थोडा पोटात गोळा आला. काहीतरी अघटित घडत आहे याची मनाला जाणीव झाली. चर्चगेट वरून दादर पर्यंत पोह्चायच होत तिथून सेंट्रल लाइन चालू होती. सीएसटी ला अगोदरच गदारोळ झालेला . आम्ही चर्चगेट हुन निघालो आणि काही वेळाने तीच पोलीस व्हॅन घेऊन त्यानी चर्चगेट स्टेशन ला गोळीबार केला. आम्ही “काळा”च्या थोडेसेच पुढे चाललेलो. दोनदा अगदी मागावर असल्या सारखा पाठोपाठ आलेला. पण आम्ही वाचलो.
दादर ला पोचलो तेव्हा परिस्थिती अगदीच वेगळी होती . दादर हुन कल्याण , कसारा, कर्जत अश्या गाड्या सोडत होते . ब्रिज वर तुफान गर्दी आणि एक गंभीर अनामिक दडपण जाणवत होत. दादरचा दोन नंबर प्लॅटफॉर्म च्या तुडुंब भरलेल्या ट्रेन मध्ये आम्ही घुसलो. अर्थातच गाडीचा काही टायमिंग नव्हता . ठराविक वेळेने गाडी सुरु होत होती. पण एरवी कोणाचा चुकून धक्का लागला तरी हंगामा करणारे मुंबईकर प्रचंड सहनशीलतेने सगळ्यांना आत यायला जागा देत होते. मर्यादेपेक्षा किती तरी पटीने माणसे कोंबलेली होती गाडीत पण कोणीही हू कि चू करत नव्हते. सर्व जण काळजी आणि सहिष्णूतेणे एकमेकांशी बोलत होते. झालेल्या घटनेची चर्चा करत होते. कोणालाच सत्य परिस्थिती माहित नव्हती. त्यामुळे सर्व जण ऐकीव माहिती एकमेकाला सांगत होते. घशाला कोरड पडली होती. एका तरुणाने त्याच्या जवळ चे पाणी आम्हाला प्यायला दिले.
थोड्या वेळाने गाडी दादरहून निघाली तेव्हा सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला . कारण गाडी किती वेळ थांबेल, दादर स्टेशन किती सुरक्षित आहे, अश्या खूप साऱ्या गोष्टी मनात येत होत्या. गाडी मजल दरमजल करत शिव (सायन) स्थानकात पोहचली.
पण तिथून निघाल्यावर शिव आणि कुर्ल्याच्या मध्ये गाडी थांबली जवळपास १५ मिनटे. पुन्हा सर्वांची पाचावर धारण बसली. एरवी ट्रेन अशीच थांबते. पण त्या दिवशी एक एक मिनटाचा विलंब हृदयाची धडधड वाढवणारा होता. अचानक कोणत्यातरी डब्यातून लांबुन “भारत माता कि “ असा आवाज आला. विचार करा इतक्या कोंबून भरलेल्या गाडीतल्या प्रत्येक माणसाने “ जय” चा नारा दिला. केवढा जबरदस्त आवाज झाला असेल . आणि पाठोपाठ “ छत्रपती शिवाजी महाराज कि “ ची शिवगर्जना आली. मघाच्या आवाजाच्या दुप्पट क्षमतेचा “जय” घुमला काळोखात. मग ते वादळ एका डब्यातून दुसऱ्या डब्यात पोहोचले. आणि मग जवळ जवळ ५ मिनीट हे चालू होत. आठवलं तर तेव्हा अंगावर आलेला काटा आजही तसाच ताकतीने येतो.
एवढ्या आणीबाणी च्या क्षणी "छत्रपती शिवाजी महाराज" आणि " भारतमाता" यांचा जयघोष त्या भरगच्च ट्रेन मधल्या प्रत्येक माणसाला हुरूप देणारा होता. त्याक्षणी जरी एखादा शत्रू समोर आला असता तर नुसत्या त्या शिवगर्जनेच्या आवाजाने जागेवर थरथर कापला असता. शिवरायांच्या काळात मुघली कुत्री फक्त " हर हर महादेव " गर्जनेने चळाचळा का कापायची हे मला त्या दिवशी प्रकर्षाने उमगले.
एका वेगळ्या मुंबईची ओळख मला दिली त्या दिवशी. महाराजांच्या नावाने वातावरण हलकं झालं. ट्रेन सुखरूप पोचली आम्ही घरी सुखरूप पोचलो. वैभव च्या आईचा वाढलेला बीपी नॉर्मल झाला . आज १५ वर्षांनी हि तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो आणि कानात “ छत्रपती शिवाजी महाराज कि जय!” “ भारत मारता कि जय” “ वंदे मातरम !” गुंजत राहतं .
- अव्यक्त अभिजीत
🙏🏻२६/११ च्या हल्ल्यात आपला जीव गमावणारया सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
अजून वाचा : मुंबईचे गणपती !
3 टिप्पण्या
अंगावर काटा आला वाचताना . छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
उत्तर द्याहटवाखुप छान. 26/11 ही तारीख आठवली की खूप काही आठवणी ताज्या होतात.
उत्तर द्याहटवाअतिशय मनाला हेलावून टाकणारी दुःखत घटना घडली होती.
उत्तर द्याहटवा