" सरदार वल्लभभाई पटेल "
भारताच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी मौल्यवान योगदान दिले. पण भारत स्वतंत्र झाल्यावर अस्थिर झालेल्या भारताला एकसंध करून अखंड भारत निर्माण करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे भारताचे "लोहपुरुष" सरदार वल्लभभाई पटेल हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते " सरदार वल्लभ भाई पटेल". आज भारतात गुजरात ला नर्मदा नदीच्या काठावर प्रचंड मोठे " स्टॅच्यू ऑफ युनिटी" उभे आहे. हा पुतळा जेवढा भक्कमपणे उभा आहे. त्याही पेक्षा जास्त भक्कमपणे सरदार वल्लभ भाई पटेल यांनी स्वतंत्र भारताला एकत्रित देश म्हणून जोडून ठेवले. अन्यथा आज भारत या एका देश ऐवजी खूप सारे छोटे छोटे देश अस्तित्वात असते.
भारताचे " लोहपुरुष" सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ राजी गुजरातमधील नादीयाड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई आणि आईचे नाव लाडबा असे होते. वल्लभभाई लहानपणा पासून अगदी प्रगल्भ बुद्धीचे होते. पण त्यांचा सर्वात उठून दिसणारा गुण होता " अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि नेतृत्व करणे" त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात झाले. एकदा शाळेत शिक्षकांनी नियम बनवला कि पुस्तके शाळेतूनच खरेदी केली पाहिजेत. आणि त्याचे मनाला वाटेल तेवढे पैसे घेऊ लागले. वल्लभ भाईंना हि गोष्ट खटकली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संघटित केले आणि सांगितले कि आपण सर्व ह्या नियमाचा विरोध करायचा. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतून पुस्तके विकत घ्यायला विरोध केला. त्या सर्व प्रकारामुळे शाळा ५-६ दिवस बंद राहिली अखेर शिक्षकांनी माघार घेतली आणि जाचक नियम हटवून टाकला.
वल्लभ भाई पटेल याना आपल्या कुटुंबाबद्दल खूप प्रेम होते. लहानपणा पासून त्यांची इंग्लंडला जाऊन वकिलीचे शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती. त्याच वेळी त्यांचे मोठे भाऊ विठ्ठल भाई याना सुद्धा परदेशात शिक्षणाला जायचे होते. तेव्हा वल्लभ भाई पटेल यांनी प्रथम मोठ्या भावाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले ते पण आपल्या खर्चाने मग ते परदेशात जाऊन बॅरिस्टर बनून आले. तासनतास ते लायब्ररीत बसून पुस्तके वाचत , अभ्यास करत. वकिली सुरु केल्यावर सुद्धा त्यांनी अश्या लोकांचे खटले घेतले ज्यांना खोट्या आरोपात अडकण्यात आले होते.
1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले नवे पर्व सुरु झाले. सरदार पटेल यांना सुरुवातीला गांधींचे विचार पटले नाहीत पण चंपारण्य सत्याग्रहात त्यांना गांधीजींच्या व्यक्तिमत्वची ओळख झाली आणि पुढे ते गांधीजींचे कट्टर समर्थक आणि सहयोगी बनले.
खेडा गावात इंग्रज सरकारने शेतकऱ्यांकडून जबरदस्ती लगान वसुली चालवली होती. दुष्काळ असून पण शेतकऱ्यांकडून जास्तीचा लगान घेतला जात होता. वल्लभ भाई यांना हे कळले तसें त्यांनी गांधीजी च्या सोबत ह्या जाचक लगान विरुद्ध सत्याग्रह सुरु केला. सरदार पटेल यांनी ह्या सत्याग्रहाचे नेतृत्व छान केले आणि सरकारला शेतकऱ्यापुढे झूकावे लागले.
त्यानंतर सरदार पटेल गुजरात मधल्या स्वातंत्र्य लढ्याचा चेहरा बनले. त्यांच्या भाषणाने लोग प्रभावित होत म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या भाषण करण्यावर बंदी घातली पण पटेल थांबले नाहीत. विविध ठिकाणी त्यांनी सरकाविरुध्द आंदोलन सुरूच ठेवले. परिणामी त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगावास भोगावा लागला. अनेक आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे लोक त्यांना सेनापती म्हणजे "सरदार" म्हणू लागले.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून "सरदार वल्लभभाई पटेल" यांची नियुक्ती झाली. भारत पाकिस्तान फाळणी नंतर हैदराबाद संस्थान चा राजा निजाम याने भारतात विलीन व्हायला नकार दिला. रझाकार संघटनेने तिथल्या हिंदू जनतेवर खूप अत्याचार केले. भारत देश अस्थिर होऊ लागला. तेव्हा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम आणि रझाकार यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबाद मध्ये घुसवले. एका आठवड्यात भारतीय सैन्यासमोर रझाकार सैन्याने गुडघे टेकले आणि निजामाने हैदराबाद भारतात विलीन केले. काश्मीर मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली तिथे कबाली लुटारूंनी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने आक्रमण सुरु केले. राजा हरिसिंग यांनी भारताकडे मदतीची विनंती केली आणि सरदार पटेल यांनी अजिबात वेळ न घालवता जम्मू काश्मीर भारतात विलीन केले आणि कबाली आणि पाकिस्तानी सैन्याला तिथून भारतीय सैन्याने हुसकावून लावले. सरदार पटेल ह्यांच्या अश्या भक्कम आणि न डगमगणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांना " लोहपुरुष" म्हणू लागले .
अश्या ह्या महान नेत्याचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि भारताची अखंडता कायम राखणारा अनमोल पुत्र भारत मातेने गमावला अश्या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम !
अजून मराठी भाषण : - शहीद भगत सिंग
0 टिप्पण्या