Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रयान १ | Chandrayaan 1 | Mooncraft of India ISRO

चंद्रयान १ | Chandrayaan 1 | Mooncraft of India ISRO


चंद्रयान १, Chandrayaan 1, Mooncraft of India ISRO



"चंद्रयान -१"

जेव्हा कधी निवांत बसला असाल तर विचार करा की तुम्ही किती भाग्यवान आहात.... !

कशाबद्दल भाग्यवान आहात माहीत आहे .. विचार करा... !

मी सांगतो, मी, तुम्ही आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की आपण जगातल्या सर्वात समृध्द आणि सुसंस्कृत अश्या भारतीय संस्कृतीत जन्मला आलो. आपल्या भारतीय संस्कृती सारखी सुंदर संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही. भारतीय संस्कृतीत मानव, दानव, पशू, पक्षी , प्रकृती, निसर्ग ह्या सर्वांना किती छान महत्त्व दिले आहे. अशी संस्कृती जगात क्वचितच सापडेल. आपल्या पंचागात कित्येक वर्षांपूर्वी सर्व ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून ठेवला आहे. कित्येक वर्षांनंतर येणारे ग्रहण, अमावस्या, पौर्णिमा पण आपल्या पंचांगात अगोदरच नोंदवले गेल्या आहेत. 

तर अश्या या भारतीय संस्कृतीत सर्व ग्रह तारे यांना मानाचे स्थान आहे. त्यातल्या त्यात सूर्य आणि चंद्र.
 
चंद्रा बद्दल जितके लिहिणार तेवढे थोडेच ! 
छोट्या छोट्या मुलांचा सगळ्यात पहिला मामा म्हणजे "चांदोमामा" ! 

प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराला आपल्या प्रेयसीचा चेहरा सुद्धा "चंद्रा" समानच भासतो, भले प्रेयसीच्या चेहऱ्यावर नायट्रोजन सारखा मेकअप चा थर असला तरी ! 

संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्राचे दर्शन न घेता सोडलात तर तुमचा उपवास व्यर्थ आहे ! 
चंद्राच्या पुर्णाकृती स्थिती च्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपले किती तरी सण साजरे केले जातात. 

आपले सगळेच गीतकार, संगीतकार चंद्रमाच्या किती प्रेमात आहेत हे तर सर्वश्रुत आहे. "चांदोमामा , चांदोमामा भागलास का" पासून ते "चांद मातला ..." पर्यंत किती तरी गीतकार, संगीतकारांनी चंद्राला भारतीय संगीतात अढळ स्थान दिले आहे. 

अशा या चंद्रावर सगळेच प्रेम करतात मग शास्त्रज्ञ कसे मागे राहतील. त्यांना ही चंद्रमाचे प्रचंड आकर्षण आहेच. आणि त्या आकर्षणापोटी आख्या जगातून निघतात  त्या "चांद्रमोहिमा". 

अमेरिकेने ई. स. १९५८ पासून चंद्र गाठायचा प्रयत्न सुरू केला. तब्बल 13 असफल यात्रांनंतर अमेरिकेच्या १९६४ साली "लूनार 7" ह्या अंतरीक्ष यानाने  चंद्रावर कोसळण्यापुर्वी चंद्राचे तब्बल ४३०० फोटो पृथ्वी वर पाठवले. पण चंद्रावर यशस्वीपणें उतरण्यात रशियाच्या " लूना 2" चा मान आहे. ही घटना आहे १३ जुन १९५९ ची. 

त्या नंतर रशिया आणि अमेरिकेत चंद्रावर जाण्यासाठी जणु कुस्तीच लागली. १९६८ ते १९७२ या चार वर्षात अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवायचे ठाणले. त्याला  Crewed mission म्हणतात. "अपोलो प्रोग्राम " नावाने ही मोहीम राबवली गेली. त्याचाच परिणाम असा झाला कि जुलै १९६९ मध्ये नासाच्या "अपोलो ११" या अंतराळ यानातून गेलेल्या "निल आर्मस्ट्राँग' ह्या मनुष्याने चंद्राच्या पावन भूमीवर आपले पाय ठेऊन इतिहास घडवला.  त्याच्या मागोमाग अजून ११ जणांनी चंद्रावर चालायचा बहुमान मिळवला आहे . त्यांची नावे पुढीलप्रमाणे - Astronauts who stepped on the Moon

बरं, ही झाली जगाची कामगिरी. भारताने चंद्रावर जाण्यासाठी काय काय प्रयत्न केले माहित आहेत का ?

१५ ऑगस्ट २००३ च्या स्वातंत्र्यदिनाच्या समारोहात तत्कालीन पंतप्रधान दिवंगत भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात "चंद्रयान -१" ची घोषणा केली. खरं तर ही कल्पना १९९९ पासून विचारात होती.  १९९९ च्या इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्स च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. इस्रो चे तेव्हाचे प्रमुख डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली ही कल्पना पुढे आली. तोपर्यंत भारत अंतराळात उपग्रह सोडण्यात तरबेज झाला होता. १९९९ ते २००३ पर्यंत पाठपुरवठा केल्यानंतर अखेर २००३ मध्ये भारत सरकारने ह्या "चांद्र मोहिमेला" हिरवा सिग्नल दाखवला. भारताच्या महासत्ता बनण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे पाऊल होते. 

चंद्रयानाचे महाकाय शिवधनुष्य इस्रो ने आपल्या खांद्यावर घेतले. २००३ मध्ये इस्रो ने लुनार टास्क फोर्स ची बांधणी केली. देशभरातील तब्बल १०० शास्त्रज्ञ ह्या टास्क फोर्स मध्ये समाविष्ट केले गेले. देशभरातील अंतराळ संशोधक, भू शास्त्रज्ञ, भौतिक, रसायन, दूरसंचार, अभियांत्रिकी अश्या सर्व क्षेत्रातले शास्त्रज्ञ एकजुटीने उभे राहिले आणि भारताच्या "चंद्रयान" मोहिमेला प्रारंभ झाला. 

इस्रो ने तोपर्यंत उपग्रह लाँच करण्यात यश मिळवलं होते. पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे satelite बनवणे इस्रो च्या डाव्या हाताचा मळ होता त्या द्वारे खूप सारे इंधन अंतराळात पाठवता आले असते. भारताकडे पिएसएलव्ही रॉकेट सुद्धा तयार होते. फक्त भारताला चंद्राच्या कक्षेत जाऊन शिरता येईल आणि चंद्राची ऑरबिट पकडता येईल यासाठी प्रयत्न करायचा होता. 

अखेर सर्व शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने २२ ऑक्टोबर २००८ रोजी PSLV - XL च्या साहाय्याने "चंद्रयान -१" चंद्राच्या दिशेने सरसावले. श्रीहरीकोटा  ह्या इस्रो च्या पंढरीतून सतिश धवन अंतराळ केंद्रातून भारताचे "चंद्रयान १" चांदोमामा च्या भेटीला निघाले. चंद्राच्या कक्षेत शिरणे आणि चंद्राला फेऱ्या मारत मारत चंद्राचा अभ्यास करणे, त्याच बरोबर एक इम्पॅक्टर चंद्राच्या भूमीवर उतरणार आणि तिथल्या पाणी आणि बाकी मिनरल्सचा अभ्यास करणार हे चंद्रयान १ चे प्रमुख उद्दिष्ट होते. ह्या मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते डॉ. मायलस्वामी अण्णादुराई ज्यांना "Moon Man of India" म्हणुन ओळखले जाते. चंद्रयान बरोबरच त्यांनी "मंगलयान" मोहिमेचे सुद्धा नेतृत्व केले. "मिशन मंगल" चित्रपटात अक्षय कुमारने जी व्यक्तिरेखा साकारली ती अण्णादुराई सरांचीच होती.  तर हया प्रोजेक्ट चे इन्चार्ज होते " श्रीनिवास हेगडे". 

भारताच्या चंद्रयान ने यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि १४ नोव्हेंबर २००८ चंद्रयान चा इंपॅक्टर यानापासून वेगळा होऊन चंद्रावर जाऊन पडला. आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन पोहोचणारा "भारत" जगात पाचवा देश ठरला. चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे सबळ पुरावे शोधले. त्यामुळे जगाच्या चंद्रज्ञानात "चंद्रयान १" चा हा शोध हा मैलाचा दगड ठरला. 

चंद्रयान १ चा कार्यकाळ खर तर दोन वर्षाचा निर्धारित केला होता. पण २८ ऑगस्ट २००९ रोजी चंद्रयान १ चा रेडिओ संपर्क तुटला आणि चंद्रयान -१ इस्रो च्या संपर्क क्षेत्रातून गायब झाले. पण त्याअगोदर चंद्रयान १ ने इस्रो आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मानाचा तुरा रोवला. 

१८ सप्टेंबर २००८ रोजी युनियन कॅबिनेट च्या झालेल्या झालेल्या बैठकीत "चंद्रयान -२" ल मंजुरी देण्यात आली. त्या बैठकीचे अध्यक्ष होते तत्कालीन पंतप्रधान मा. मनमोहन सिंग. "चंद्रयान -२" साठी भारत आणि रशिया दोघांनी हाथ मिळवणी केली. चंद्रयान २ चे ऑर्बिटर, आणि रोव्हर भारत बनवणार आणि लॅंडर रशिया बनवणार असा करार झाला. इस्रोने २००९ पर्यंत अंतराळयान बनवले सुद्धा पण तरीही मोहीम पुढे ढकलण्यात आली . कारण रशिया चे लॅंडर तयार नव्हते. विषय एवढ्यावरच थांबला नाही, रशिया ने सांगितले की ते २०१५ पर्यंत लॅंडर बनवू शकत नाहीत कारण त्याच्या Fobos - Grunt ह्या मंगळस्वारीचे अपयश. रशियाच्या मंगळयानात जे तंत्रज्ञान वापरले होते त्यात काही त्रुटी आढळल्या. हेच तंत्रज्ञान चंद्रयान -२ च्या लॅंडर मध्ये रशिया वापरणार होती. पण त्यात गडबड झाल्याने रशिया ने lander द्यायला असमर्थता दाखवली. 

पण इस्रोने हाय खाल्ली नाही. खांदे पाडले नाहीत. इस्रोने घेतला एक ऐतिहासिक निर्णय. लॅंडर सुद्धा स्वतः बनवायचा. पण त्यामुळे चंद्रमोहिम चा विलंब वाढला. २०१८ पर्यंत मोहीम पुढे ढकलली. पण चंद्रयान मध्ये कराव्या लागणाऱ्या बदलांमुळे चंद्रयान २ चे वजन हळू हळू वाढू लागले.  यानात काही फेरबदल करत असल्याने आणि लँडिंग सिक्वेंस बदलत असल्याने चंद्रयान बनण्यासाठी विलंब होऊ लागला. 

सर्व अडचणींवर इस्रोने कशी मात केली ? एवढं मोठा कार्यभार आहे की एका भागात संपणार नाही. चंद्रयान 2 आणि 3 चे पुढे काय झालं हे सर्व वाचा पुढील भागात ...


महत्वाचे : भारताचे चंद्रयान ३ नुकतेच चंद्राकडे रवाना झाले आहे. ते नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी सुखरूप उतरेल यासाठी सर्वांनी प्रार्थना करुया !

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या