"छोटेसे बहीण भाऊ , उदयाला मोठाले होऊ ,
उद्याच्या जगाला , उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ "
वसंत बापट यांनी आपल्या ह्या कवितेत छोट्याश्या बहीण भावंडांच आणि त्यांच्या स्वप्नांचं किती सुरेख वर्णन केले आहे. बापटांना नवीन युगाच्या बदलांची अपेक्षा होती. ती त्यांनी कवितेत मांडली.
माझ्या लहानपणी हि कविता मी खुप वेळा ऐकली. वाटायचं कि आम्ही भाऊ बहीण सुद्धा उद्याच्या जगाला नवीन आकार देऊ पण जगानेच आम्हाला नवीन आकार दिला. आमच्या जगण्याला नवीन दिशा दिली.
साधारणतः सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भाऊ बहिणीचं नातं हे सगळीकडे सारखं असत. त्यात "प्राणीप्रेम" जास्त असत. म्हणजे प्रत्येक भावाला आपली बहीण कितीही देखणी असली , सुंदर असली तरी ती म्हैसच वाटते. आणि प्रत्येक बहिणीला आपला भाऊ कितीही हुशार असला , रुबाबदार असला तरी तो तिला तो " गाढव , कुत्रा , रेडाच वाटतो. अर्थात तिला असं वाटतं कि आपला भाऊ गाढव सारखा मेहनती, कुत्र्या सारखा इमानदार आणि रेड्यासारखा ताकतवान आहे. भाऊ मोठा आणि बहीण लहान असेल तर भावाचा दरारा जरा जास्त असतो. आणि बहीण मोठी आणि भाऊ लहान असेल तर भावाचा आगाऊपणा जरा जास्त असतो.
भाऊ बहिणीचं नातं म्हणजे टॉम अँड जेरी सारखा असत म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. बहिणीची खोड काढल्याशिवाय भावाचा दिवस जात नाही आणि भावाची चुगली केल्याशिवाय बहिणीच्या घश्याखाली घास उतरत नाही. आम्ही ३ भावंडं आहोत. मी मोठा , २ नंबर बहीण आणि ३ नंबर भाऊ. माझं आणि माझ्या बहिणीचं एकदम घट्ट बॉण्डिंग होत. पण बहिणीचं आणि धाकट्या भावाचं विळ्या भोपळ्याच सख्य होते. पण तेव्हा आमच्या तिघांची एकजूट जबरदस्त होती. दिन्याच्या ( धाकट्या भावाच्या) खोड्या शेंडेफळाला साजेश्या असायच्या आणि मग रूपाच्या ( बहिणीच्या) तक्रारी त्या अनुसरून असायच्या.
मे महिन्यात आमच्यात आंबे गोळा करायची स्पर्धा लागायची. आंब्याची "साठी" जास्त कोणाची होणार यावर शर्यत लागायची. झाडावरून पडलेले आंबे आम्ही गोळा करायचो. ह्याच्या त्याच्या परसातले आंबे सुद्धा आम्ही गोळा करून आणायचो. पण आमचा दिन्या महा चॅप्टर . रूपाच्या ढिगातले आंबे चोरून स्वतःच्या ढिगात आणून टाकायचा. रूपा पण काही कमी नव्हती. आई ने काही खाऊ दिला कि आम्ही दोघे २ मिनटात फस्त करून टाकत असू. पण रूपा मात्र अगदी चवीचवीने खात असे. मग आम्ही तिच्या तोंडाकडे बघत बसायचो आणि संधी मिळाली कि तिच्या प्लेट मध्ये हात मारून पळून जायचो.
भावंडांमध्ये माझी भूमिका हि नेमही "जज" सारखी असायची. रूपा आणि दिन्याची खटले माझ्या कोर्टात चालायचे. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मी खटल्याचा निकाल ९५% वेळा बहिणीच्या बाजूने द्यायचो. आणि दिन्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा सुनवायचो. माझ्या कोर्टात निकाल न लागलेल्या केसेस मम्मी च्या सुप्रीम कोर्टात जायच्या आणि सुप्रीम कोर्टाची शिक्षा महाभयानक असायची. वेताच्या छडीचे फटके, पायावर चटका , एक वेळ उपाशी राहणे अश्या काळ्या पाण्याच्या शिक्षा आमच्या भावाने खूप भोगल्या.
भाऊ बहिणीच्या नात्यातल्या खोड्या पण फार अतरंगी असतात. कधी मोठा भाऊ लहान बहिणीला कपाटात बंद करून ठेवतो. तर कधी मोठी बहीण लहान भावाला सांगते की तुला कचऱ्याच्या डब्ब्यातून उचलून आणलं आहे. भाऊ बहिणीच्या भांडणात आपल्याला "राई चा पर्वत करणे" ह्या म्हणीचा अर्थ समजू शकतो. भाऊ कधी बहिणीला हलकी चापट मारतो पण बहीण आई वडिलांना सांगताना त्या चापटीच रूपांतर सणसणीत चपराक मध्ये होते आणि मग भावाला दे दणादण ! बहुतांश वेळा बहीण अभ्यासात हुशार असते आणि मग तिच्या मार्क्स च्या दडपणाखाली भाऊ दबून जातो. " ती बघ कसा अभ्यास करते, नंबर काढते , घरात काम पण करते आणि तुला उनाडक्या करायला टाईम असतो फक्त." हे पालुपद ऐकण्यात भावाच बालपण जातं. पण भाऊ पण काही सुधारत नाही.
जसं जसं मोठे होऊ लागतात भाऊ बहिणीच नातं थोड बदलत जातं. ज्या भावंडांचे चांगले पटते त्यांच्यात मग एकमेकांशी गोष्टी शेअर केल्या जातात. ह्याच्या गर्लफ्रेंड बद्दल तिला बित्तंबातमी असते. आडवळणाने चिडवणे, मस्करी करणे, चालू असते. बाहेरून कांड करून आलेल्या भावाला बहीण कव्हर अप देत असते. "बाबा, तुझं शर्ट च खिसा तपासताहेत, लवकर ये" अश्या खुपिया जाणकारी भावाला पुरवते. काही प्रसंगी त्याच्या प्रेयसीला मेसेज पोहचवायचे काम सुध्धा करते. भावाच्या नुसत्या डोळ्यांकडे पाहून तिला त्याच ब्रेकअप झाल्याचं कळत. तो कधी "घेऊन" आलाय, सिगरेट फुंकून आलाय हे आई वडीलान अगोदर बहिणीला कळतं.
भावाच मात्र वेगळं असतं. बहिणीला आपल्या भावाची गर्लफ्रेंड चालते पण बहुतांश भावाला आपल्या बहिणीचा बॉयफ्रेंड हा जेवणात सापडलेला खडा वाटतो. त्याला उचलून बाहेर टाकायचा एवढाच हेतू मनात असतो. सगळेच भाऊ असे नसतात. पण बहुतांश भावांना बहिणीचा बॉयफ्रेंड खपत नाही. त्या मागे प्रमुख कारण हे मुलांची "टाईमपास" वाली मानसिकता. आपल्या बहिणीला कोणी "टाईमपास" म्हणून बघत असेल ह्या विचारानेच भावाच्या डोक्यात किडा उठतो. भले तो स्वतः दुसऱ्या कोणाच्या तरी बहिणीला "टाईमपास" म्हणूनच बघत असतो. बहिणी ला कोणी काही बोलले, छेड काढली तर बहीण पहिली भावालाच येऊन सांगणार. मग पुढचा राडारॉक्स करायची जिम्मेदारी भावाची ! जशी आई घरी नसली तर करमत नाही तशीच बहीण घरात नसली तर भाऊ तिची सतरांदा चौकशी करत बसणार. ह्या सर्वांच्या मागे त्याची बहिणी बद्दलची काळजी असते. पण अर्थात तो मुलगा असल्याने त्याची काळजी दाखवायची पद्धत वेगळी असते.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट असतो. बहीण भावाच्या नात्याची समीकरण सुध्धा लग्नानंतर बदलतात. भावाच्या लग्नात बहीण खूप नटून, थटून, मिरवून घेते. भाऊ मात्र बहिणीच्या लग्नात हिरा ठाकूर सारखा राब राब राबतो. बहिणीच्या पाठवणीला घश्यापर्यंत आलेले आवंढे गिळत हसत राहतो. सतत इरीटेट करणारी व्यक्ती आता आपल्या नजरेसमोर नसणार ह्या भावनेने दोघेही अस्वस्थ होत असतात.
लग्नानंतर दोघांचं विश्व बदलत तिला सासरच्या उठाठेवी तून वेळ नसतो. त्याला सुध्धा आयुष्याच्या रहाटगाड्यातून वेळ नसतो. एकेकाळी एकमेकाची तोंड बघून उठणारी भावंडे मग महिना महिना एकमेकाशी फोन वर सुध्धा बोलत नाहीत. आई बाबांकडून एकमेकाची खुशाली कळत राहते.
मग ह्या भावंडांची भेट होते रक्षा बंधन आणि भाऊबीजेला ! हिंदू सणांची हीच खासियत आहे. ह्यामध्ये आपल्या परिवाराला, समाजाला जोडून ठेण्यासाठी नेमके आयोजन करून ठेवलेले आहे. आमच्या कोकणात बहिणीच्या हरतालिकेच्या उपासाला भाऊ शहाळे घेऊन बहिणीकडे जातो ही प्रथा अजूनही काही जण पाळतात. आपापल्या आयुष्यात बिझी होऊन गेलेली भावंडं ह्या सणांना एकत्र येतात. लहानपणी एकमेकांना पाहून तोंड वेंगाडणारी भावंडे आतुरतेने मग ह्या दिवसांची वाट पाहत असतात. जसे जसे कालचक्र पुढं जात जातं तसे तसे मग भावंडांची मुले बाळे वाढत जातात. मग रक्षाबंधन चं अप्रूप लहान मुलांचं राहतं. मग भाचे कंपनी आणि पुतणे कंपनी यांच्या कौतुकाचे सोहळे होतात. पण ह्या सना निमित्त बहीण भावाची भेट होते हे हि नसे थोडके.
लहानपणी रक्षाबंधनला आई वडिलांनी दिलेल्या पैशाची ओवाळणी टाकायचो. आज स्वतःच्या पैशाने ओवळणीच्या ताटात पैसे टाकू शकतो. पण त्यापेक्षा बहीण घरी येईल ही भावना जास्त सुखावणारी असते.
लहानपणी माझी सख्खी बहीण मला राखी बांधायचीच. पण माझ्या मावस बहिणी आणि चुलत बहिणी सुद्धा जिथे असतील तिथून रक्षाबंधन अगोदर राख्या पाठवायच्या. त्यामुळे हाथात ५-६ राख्यांपेक्षा कमी राख्या नसायच्या. बदलत्या काळानुसार आता फक्त व्हाट्सएप वर रक्षाबंधनच्या शुभेच्छा येतात. सोशल मीडिया वर फोटो टॅग केले जातात पण राख्या येत नाहीत. अर्थात यात कोणाची चुकी नाही. जमाना बदलतो तसे सर्व बदलते पण म्हणून भाऊ बहिणींचे प्रेम बदलत नाही.
शाळेतले रक्षाबंधन हा सुध्धा एक चमत्कारिक विषय असतो. नेमकी तीच मुलगी राखी बांधायला येते जीच्यासोबत मुलांनी धूम मधल्या उदय चोप्रा सारखी भविष्याची स्वप्न पाहिलेली असतात. माझ्या कॉलेजला एक मित्र त्याची क्रश राखी बांधायला आली तेव्हा अख्ख्या कॉलेजभर पळत होता. आणि त्याची क्रश त्यांच्या मागे.. माझे एक दोन मित्र रक्षाबंधन ला हमखास सुट्टी मारायचे.
सख्ख्या नात्याबरोबरच मानलेले नातं हे सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मानलेला भाऊ - बहीण असते. काही वेळा तर रक्ताच्या नात्यापेक्षा हे मानलेले बंधच जास्त जवळचे होऊन जातात. मी ह्या गोष्टीचा फार वेळा अनुभव घेतला आहे.
ह्या हातात बांधलेल्या राख्यांची पण फार गंमत असते. माझ्या लहानपणी मोठ्या मोठ्या फुलवाल्या, स्पंज वाल्या राख्यांची चलती होती. मग गोंडेवाल्या राख्यांच्या जमाना होता. मग मण्या मण्यांच्या राख्या आल्या. आजकाल लहान मुलांच्या लाईटवाल्या राख्यांची क्रेझ आहे. त्यावर छोटा भीम, बाल गणेश, मोटू पतलू, पेपा पिग ह्यांची चित्रे असतात. माझी आई सांगायची की गोंडेवाली राखी खरी राखी बाकी सर्व फक्त फॅशन. पण तो गोंडा भिजला की त्याचा रंग कपड्याला राखी जिथे जिथे चिकटेल तिथे आपला रंग सोडायचा. राख्यांचे लोंबनारे धागे सांभाळत जेवायचं हा एक सेप्रेट टास्क असतो. पण तरीही प्रत्येक भाऊ राखी गणपती पर्यंत तरी राखी सांभाळतोच. गणपती विसर्जन ला गणपती सोबत राखी विसर्जन करायची प्रथा आहे.
"माहेरची साडी" ह्या चित्रपटाला एक सिन मला खूपच भावत आलाय. अजिंक्य देवच्या हातावरून टॅक्टर जातो आणि एक हाथ गमावतो. आशा लता त्याला म्हणतात की अलका कुबल कडून राखी बांधून घेतली म्हणून तुझा हाथ गेला. त्यावर अजिंक्य देव च उत्तर असतं "ताई ने ज्या हातात राखी बांधली तो हाथ शाबूत आहे. मला अगोदर माहीत असतं तर दोन्ही हातांवर ताईला राखी बांधायला सांगितलं असतं" तो सिन माझ्या मनावर खूप खोलवर कोरून राहिला आहे.
रक्षाबंधन झाले की मग भावंडे पुन्हा आपापल्या बिझी आयुष्यात परत जातात. आणि मग वाट बघतात भाऊबीज ची …
पुन्हा भाऊ बहिणीच्या नात्याची मधुरता जपण्याची…..
- अव्यक्त अभिजित
अजून वाचा मैत्रीदिन चिरायू होवो
3 टिप्पण्या
Khup chhan. Mala pan 4 bahini aani me ekta asalya mule aamach ghar bharalel asaych. Tyamule maramari, bhandan aani majja मन भरून Asaychi. Ha lekh vachun lahan panichy khup goshti athavlya.
उत्तर द्याहटवाधन्यवाद कल्पेश. त्या दिवसाच्या आठवणी भन्नाट आहेत.
हटवामस्त , बहीण भावाच्या नात्याचे अचूक वर्णन !
उत्तर द्याहटवा